रेल्वे मंत्रालय
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : रेल्वे पोलीस दल, पश्चिम विभागाच्या वतीने हिरवा झेंडा दाखवून दुचाकी रॅली साबरमतीकडे रवाना
18,600 किमी पेक्षा जास्त अंतर कापून रेल्वे पोलीस दलाचे 6500 कर्मचारी 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभागी
Posted On:
19 JUL 2022 6:37PM by PIB Mumbai
मुंबई, 19 जुलै 2022
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, पश्चिम रेल्वेने आज, 19 जुलै 2022 रोजी पश्चिम रेल्वे मुख्यालयातून हिरवा झेंडा दाखवत मोटरसायकल रॅली आणि ‘रन फॉर युनिटी’ मोहिमेला प्रारंभ केला. या रॅलीमध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, भावनगर आणि राजकोट या सर्व सहा विभागातील रेल्वे पोलीस दलाच्या (आरपीएफ ) कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

(नरेश लालवानी, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, पी.सी . सिन्हा, पश्चिम रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयातून मोटरसायकल रॅली आणि रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवताना)
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक नरेश ललवानी आणि पश्चिम रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, पी.सी . सिन्हा यांनी रेल्वे पोलीस दलाच्या मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. महात्मा गांधी यांनी ज्या साबरमती आश्रमापासून प्रसिद्ध दांडी यात्रेला सुरुवात केली होती त्या ऐतिहासिक साबरमती आश्रमापर्यंत या रॅलीला पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयातून हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
25 दुचाकींवर पश्चिम रेल्वेच्या रेल्वे पोलीस दलातील(आरपीएफ) 50 कर्मचारी स्वार झाले असून या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. ही रॅली संजन, वलसाड, बिलीमोरा, नवसारी, सुरत, अंकलेश्वर, वडोदरा मार्गे साबरमती आश्रमात पोहोचेल.1 जुलै 2022 रोजी, पश्चिम रेल्वेच्या सर्व विभागीय मुख्यालयातून मोटार सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, यात मुंबई, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील पश्चिम रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील 75 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा समावेश होता. त्यानंतर ही रॅली पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात पोहोचली.
पश्चिम रेल्वेच्या रेल्वे पोलीस दलातील 6500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी सर्व विभागांमध्ये ‘रन फॉर युनिटी’ मध्ये सहभाग घेतला असून त्यांनी 18,600 किमी पेक्षा जास्त अंतर कापले आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. 1 ऑगस्ट 2022 रोजी साबरमती आश्रमामधून पुढे ही दुचाकी रॅली निघेल आणि या मार्गावरील महत्त्वाच्या शहरांमधून ही रॅली 14 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पोलीस स्मारकात पोहोचेल आणि समारोप समारंभात सहभागी होईल., असे पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘स्वातंत्र्याची रेल्वेगाडी आणि स्थानके ’हा आयकॉनिक सप्ताह
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, भारतीय रेल्वे 18 ते 23 जुलै 2022 या कालावधीत 75 स्थानके आणि 27 रेल्वेगाड्यांमध्ये "स्वातंत्र्याची रेल्वेगाडी आणि स्थानके" हा आयकॉनिक सप्ताह साजरा करत आहे.या विशेष गाड्या आणि स्थानके भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासाशी संबंधित महत्त्वाची ठिकाणे आणि घटना दर्शवतात.या अनुषंगाने,पश्चिम रेल्वे या महोत्सवाच्या सप्ताहाच्या उत्सवात मोठ्या उत्साहात सहभागी होत आहे.भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विविध टप्प्यांमध्ये राष्ट्रीय महत्त्व असलेल्या पोरबंदर, साबरमती, नवसारी, अडस रोड आणि बारडोली या पश्चिम रेल्वेच्या स्थानकांची यासाठी निवड करण्यात आली आहे . त्याचप्रमाणे,पश्चिम रेल्वेच्या 9 गाडयांना उदा. लोकशक्ती एक्सप्रेस, आश्रम एक्सप्रेस, साबरमती एक्सप्रेस, अहिंसा एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस, शांती एक्सप्रेस, गुजरात मेल, अहमदाबाद - नवी दिल्ली स्वर्ण जयंती राजधानी एक्सप्रेस आणि वांद्रे टर्मिनस - सूरत इंटरसिटी एक्सप्रेसला स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य विविध स्थानकांवरून हिरवा झेंडा दाखवतील.
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1842787)
Visitor Counter : 178