वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी सिप्झ-सेझ येथील महा-सामायिक सुविधा केंद्र आणि मानक डिझाईन कारखान्याच्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला
महा-सामायिक सुविधा केंद्र आणि मानक डिझाईन कारखाने 1 मे 2023 पर्यंत कार्यान्वित होतील
सिप्झला ‘जागतिक बाजारांकडे नेणारे सुवर्णद्वार’म्हणून पुनर्स्थापित करण्यासाठी उपक्रम राबविणार
Posted On:
14 JUL 2022 5:07PM by PIB Mumbai
मुंबई, 14 जुलै 2022
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबईतील सिप्झ-सेझ परिसराला भेट देऊन तेथे सुरु असलेल्या मेगा सीएफसी अर्थात महा-सामायिक सुविधा केंद्र तसेच एसडीएफ अर्थात मानक डिझाईन कारखाने (एसडीएफ-9 आणि एसडीएफ-10) यांच्या उभारणी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. सिप्झ-सेझचे विकास आयुक्त श्याम जगन्नाथन आणि सह विकास आयुक्त सीपीएस चौहान यांनी यावेळी या प्रकल्पांच्या कामाच्या सद्यस्थितीबाबत केंद्रीय मंत्र्यांना माहिती दिली.
महा-सामायिक सुविधा केंद्राकरिता 82 कोटी रुपयांचा निधी – हे केंद्र म्हणजे व्यापारी आस्थापना नसून सामाजिक प्रकल्प आहे
मौल्यवान रत्ने आणि दागिने यांचे आरेखन आणि निर्मिती करण्यास पाठबळ पुरविणे हे मेगा सीएफसी चे उद्दिष्ट आहे. या केंद्रामुळे रत्ने आणि दागिने निर्मिती कामाचा सध्याचा दर्जा, उत्पादकता, मनुष्यबळाचे कौशल्य, देशांतर्गत संशोधन आणि विकास कार्य, तंत्रज्ञानासंदर्भातील आधुनिकता आणि किमतीच्या बाबतीतील स्पर्धात्मकता यांच्यात सुधारणा होईल. या केंद्रामध्ये कौशल्यविकास अभ्यासक्रमात सहभागी होण्याच्या तसेच या उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण केंद्राचा देखील समावेश करण्यात आला आहे.
मेगा सीएफसी केंद्राला संकल्पनेतून निर्मिती अवस्थेत आणण्यासाठीचा एकूण खर्च करण्यासाठी 82 कोटी 31 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हे केंद्र 1 मे 2023 पर्यंत कार्यान्वित करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.
लघु आणि मध्यम उद्योगांसह दागिने प्रक्रिया केंद्रांची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने मेगा सीएफसी केंद्राच्या निर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे. अनेक सामायिक सुविधांसाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज असल्यामुळे या क्षेत्रातील उद्योगांना स्वतंत्रपणे या सुविधा उपलब्ध करून देता येत नाहीत, त्या सुविधा या केंद्रामध्ये उपलब्ध असतील. हे मेगा सीएफसी केंद्र मन्जे व्यापारी आस्थापना नसून सामाजिक प्रकल्प असणार आहे.
दोन मानक डिझाईन कारखाने मे 2023 पर्यंत कार्यान्वित होतील
एसडीएफ-I मधील कारखाने एसडीएफ-9 आणि एसडीएफ-10 मध्ये स्थलांतरित करण्यासाठी सिप्झ-सेझ मध्ये दोन नवे एसडीएफ उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. एसडीएफ-I मधील इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकके एसडीएफ-9 तर एसडीएफ-I मधील मौल्यवान रत्ने आणि दागिने यांचे कारखाने एसडीएफ-10 मध्ये स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. हे दोन नवे एसडीएफ या उद्योगांना आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा पुरवू शकतील. सिप्झ-सेझ परिसराचा कायापालट करण्याची सुरुवात या दोन नव्या एसडीएफ च्या उभारणीने होईल. हे दोन कारखाने 1 मे 2023 पर्यंत सुरु होतील.
सध्या सुरु असलेल्या कारखान्यांचे नव्या जागी स्थलांतर केल्यानंतर 47 वर्ष जुनी इमारत पाडण्यात येईल अनि त्या जागी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येतील. ही प्रक्रिया पुढील एसडीएफसाठी देखील अशाच पद्धतीने सुरु राहील.
सिप्झ-सेझ 2.0 च्या संकल्पनेची सुरुवात झाल्यामुळे या परिसराचा कायापालट व्हायला सुरुवात झाली आहे. येथील परिचालनाचा खर्च आणि विजेचा वापर कमीतकमी ठेवणे, कार्बन पदचिन्हांचे प्रमाण कमी करणे आणि सौर ऊर्जेसारख्या नवीकरणीय उर्जा स्रोतांचा अधिक वापर करणे यावर या प्रकल्पातअधिक लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच एकात्मिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, ग्रे-वॉटरचा पुनर्वापर आणि पर्जन्य जल संधारण यंत्रणा यांच्यासह या कारखान्यांमध्ये जवळजवळ शून्य कचरा निर्मितीचे उद्दिष्ट गाठण्याची सुनिश्चिती केलेली असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम मानकांची पूर्तता करणाऱ्या पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यापार करण्यातील सुलभता यांच्यासह सिप्झ-सेझ परिसराला “जागतिक बाजारांकडे नेणारे सुवर्णद्वार” म्हणून स्थापित करणे हा या प्रकल्पांच्या कामांमागील एकंदर उद्देश आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जीजेईपीसीचे कार्यकारी संचालक आणि सिप्झ-सेझचे व्यापारी सदस्य या आढावा बैठकीला उपस्थित होते.
S.Patil/S.Chitnis /P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1841561)
Visitor Counter : 148