सहकार मंत्रालय
पुण्याच्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेतील पीजीडीबीएम-एबीएम अभ्यासक्रमाच्या 2022-24 या कालावधीसाठी सुरु होणाऱ्या तुकडीचे उद्घाटन
कृषी तसेच सहकार या क्षेत्रांमध्ये पुरेशा संधी उपलब्ध आहेत आणि तरुणांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे - केंद्रीय सहकार राज्यमंत्री बीएल वर्मा
Posted On:
11 JUL 2022 9:39PM by PIB Mumbai
पुणे, 11 जुलै 2022
केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी एल वर्मा यांनी आज सांगितले की ग्रामीण अर्थव्यवस्था सशक्त करण्यात सहकार क्षेत्राने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. कृषी तसेच सहकार या क्षेत्रांमध्ये पुरेशा संधी उपलब्ध आहेत आणि ही क्षेत्रे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून तरुणांनी त्यात सहभागी झाले पाहिजे.
पुण्यातील वाम्निकॉम अर्थात वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या पीजीडीबीएम-एबीएम अभ्यासक्रमाच्या 2022-24 या कालावधीसाठी सुरु होणाऱ्या तुकडीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. आपल्या भाषणात राज्यमंत्री वर्मा यांनी देशाच्या समग्र विकासाच्या अजेंड्यामध्ये कृषी व्यवसाय आणि सहकारविषयक शिक्षणाला असलेल्या महत्त्वावर भर दिला. आगामी काळात कृषी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या पदवीधरांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाम्निकॉम संस्थेतर्फे करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना शेती आणि कृषी व्यवसायातील गुंतागुंतीच्या विषयांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी थेट शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास प्रोत्साहित केले.
केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेली पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था ही देशातील कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या अग्रगण्य संस्थांपैकी एक आहे. या संस्थेत 2022-24 या कालावधीसाठी सुरु होणाऱ्या अभ्यासक्रमाच्या तुकडीचे उद्घाटन आज 11 जुलै 2022 रोजी करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री बी एल वर्मा तसेच धानुका ॲग्रीटेकचे अध्यक्ष आरजी अग्रवाल यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा झाला.
आज सुरु करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाला केंद्र सरकारच्या अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण मंडळाची मान्यता मिळालेली आहे आणि भारतीय विद्यापीठ संघाकडून हा अभ्यासक्रम एमबीए या पदवीच्या समकक्ष आहे असे जाहीर करण्यात आले आहे. तसेच या अभ्यासक्रमाला नवी दिल्ली येथील राष्ट्रीय प्रमाणन मंडळाची देखील मान्यता मिळालेली आहे.
वाम्निकॉम संस्थेच्या संचालक डॉ.हेमा यादव यांनी उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेले सर्व अतिथी, पालक, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांनी संस्थेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या निबंधकांतर्फे आभारप्रदर्शन करण्यात आले.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1840831)
Visitor Counter : 252