संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ठाण्यात मुंब्रा येथे 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत लष्कर भर्ती मेळाव्याचे (अग्निपथ योजना)आयोजन

Posted On: 07 JUL 2022 5:38PM by PIB Mumbai

मुंबई, 7 जुलै 2022

 

मुंबईच्या लष्करी भर्ती कार्यालयातर्फे लष्करातील भर्तीसाठी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात कौसा व्हॅली संकुलातील माननीय श्री अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडीयम येथे 20 सप्टेंबर  ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील युवकांसाठी रोजगार संधी निर्माण करणे आणि त्याद्वारे त्यांना भारतीय लष्कराचा भाग होऊन मातृभूमीची सेवा करण्याची तसेच सन्माननीय जीवन जगण्याची संधी देणे हा या भर्ती मेळाव्याच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.

 या मेळाव्यामध्ये अग्निवीर सामान्य सेवा, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/ भांडार व्यवस्थापक तांत्रिक,अग्निवीर कुशल कारागीर (दहावी उत्तीर्ण), अग्निवीर कुशल कारागीर (आठवी उत्तीर्ण) या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.

अर्ज कोणी करावा?:

महाराष्ट्र राज्यातील, पुढील आठ जिल्ह्यांतील कायम निवासी असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येईल.

1.मुंबई शहर,

2.मुंबई उपनगर,

3.नाशिक,

4.रायगड,

5.पालघर,

6.ठाणे,

7.नंदुरबार

8.धुळे

अर्ज कसा करावा?:

इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या  www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन पद्धतीने यशस्वीपणे नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या इमेल आयडीवर प्रवेश पत्र पाठविण्यात येईल.

प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तारखेनुसार जिल्हा आणि तहसील पातळीवर संभाव्य उमेदवारांची छाननी करण्यात येईल. बायोमेट्रिक पद्धतीने त्यांना सत्यापित केले जाईल आणि प्रत्यक्ष निवड चाचण्या होण्यापूर्वी त्यांना मेळाव्यासाठी दिलेले प्रवेशपत्र तपासण्यात येईल. भर्तीसाठी पुढील तीन टप्प्यांमध्ये चाचण्या होतील – शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि सामायिक प्रवेश परीक्षा (लेखी परीक्षा - सीईई). शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोव्हेंबर 2022 मध्ये होणारी लेखी परीक्षा द्यावी लागेल. अंतिम चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना देशसेवेसाठी अग्निवीर म्हणून भारतीय लष्करात भर्ती होण्याबाबतचे पत्र देण्यात येईल.

या भर्तीसाठी इंटरनेटवरून नोंदणी करताना योग्य प्रक्रियेचे कसोशीने पालन करण्याचे आवाहन उमेदवारांना करण्यात आले आहे. उमेदवारांनी त्यांचे तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि मेळाव्याच्या ठिकाणी येताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि मूळ प्रमाणपत्रे तसेच सर्व कागदपत्रांच्या प्रमाणित फोटोप्रती आणि अधिकृत सूचनेमध्ये दिलेल्या सूचनांनुसार रीतसर नोटरी केलेले अनिवार्य प्रतिज्ञापत्र सोबत आणावेत. उमेदवारांनी स्वहितासाठी त्यांनी केलेल्या मूलभूत वैद्यकीय पूर्व-परीक्षणाची प्रत सोबत बाळगावी. या सर्व गोष्टींमुळे युवकांचा मेळाव्यातील अधिक सुरळीत सहभाग शक्य होईल आणि लष्करी अधिकाऱ्यांना देखील मेळाव्यातील कार्ये अधिक उत्तम प्रकारे पार पाडता येतील.

ही संपूर्ण भर्ती प्रक्रिया अत्यंत न्याय्य, पारदर्शक, मुक्त आणि स्वयंचलित पद्धतीने होत असून इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थीला बळी पडू नये असे आवाहन लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. कोणत्याही उमेदवाराकडे अशा प्रकारे कोणी दलाल अथवा मध्यस्थ आला असेल तर ही घटना त्वरित लष्करी अधिकारी किंवा पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी. यासंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी उमेदवारांनी   www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर लॉगीन करावे अथवा 022-22153510 या क्रमांकावर थेट संपर्क साधावा.

S.Tupe /S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1839889) Visitor Counter : 303


Read this release in: English