विशेष सेवा आणि लेख
भायखळा रेल्वे स्थानकाला त्याचे गतवैभव पुन्हा मिळाले
Posted On:
07 JUL 2022 4:39PM by PIB Mumbai
- श्रीयांका चॅटर्जी
मुंबई, 7 जुलै 2022
16 एप्रिल 1853 च्या ऐतिहासिक दिवशी, जेव्हा साहिब, सुलतान आणि सिंध या तीन दिमाखदार वाफेच्या इंजिनांनी बोरी बंदर (मुंबई) ते तन्ना (ठाणे) हे 34 किमी चे अंतर कापले आणि भारतातील रेल्वेचा औपचारिक जन्म झाला. याच दिवशी दक्षिण मुंबईतील आणखी एक सुप्रसिद्ध परिसर - भायखळानेही इतिहासात कायमस्वरूपी स्थान मिळवले. भायखळा येथे लाकडाच्या उंच प्लॅटफॉर्मवरून जेव्हा ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या 200 मजुरांनी वाफेचे इंजिन खेचले तेव्हा गाडी हळू हळू थांबली आणि उत्तम कपडे परिधान केलेले गोरे साहेब रुबाबात प्रथम श्रेणीच्या डब्यात चढले. अशा प्रकारे भायखळा (किंवा भायकला) हे देशातील पहिले रेल्वे स्थानक बनले.
बोरी बंदर, म्हणजे सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे , त्याकाळी एका छोट्याशा झोपडीवजा लाकडी इमारतीत एक छोटेसे कार्यालय होते. प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केवळ भायखळा स्थानकातूनच गाडीत चढावे किंवा उतरावे लागायचे.
भायखळा रेल्वे स्थानक असलेली इमारत आता प्रथम श्रेणीची वारसा वास्तू आहे आणि मुंबई शहरातील अशा पाच इमारतींपैकी सर्वात जुनी इमारत आहे. या इमारतीच्या छतावरील टाइल्सना सुंदर, रंगीत काचांची नक्षी आणि लोखंडी खांब आहेत तसेच जुने सिग्नल केबिन आणि बुकिंग काउंटरचे आकर्षक नमुने एका गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देतात.
भायखळा आणि स्थानकाचे ऐतिहासिक महत्त्व
1853 मध्ये भायखळा स्थानक सामान्य प्रवाशांसाठी खुले करण्यात आले तेव्हा ते लाकडी इमारतीत वसलेले होते. . त्याच वर्षी कंपनी बहादूरने या ‘सर्वात महत्त्वाच्या स्थानकात’ प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन स्थानकात मुख्य मार्गावर छत उभारण्याची शिफारस केली. द ग्रेट इंडियन पेनिन्सुला (GIP) रेल्वेचे वाहतूक व्यवस्थापक श्री. रोचे यांनी याला मान्यता दिली , तर मुख्य निवासी अभियंता श्री बार्कले यांनी ते अनावश्यक आहे असे मत नोंदवले आणि त्यानुसार संचालक समितीने हा प्रस्ताव राखून ठेवला.
एक काळ असा होता (1860) जेव्हा भायखळ्याने देशात सर्वाधिक सीझन तिकिटांची (पास ) विक्री केली होती!
भायखळा परिसर हा 19 व्या शतकाच्या सुरुवातीपासून एक महत्त्वाचे व्यावसायिक ठिकाण आहे. 1886 मध्ये भायखळा पूल बांधण्यात आला आणि 1920 मध्ये तो पुन्हा बांधण्यात आला. तो भायखळ्याच्या पश्चिम भागाला वीरमाता जिजाबाई उद्यानाशी जोडतो.
जिथे हे स्थानक आहे ते ठिकाण 1784 मध्ये समुद्राजवळ होते. इथे जस-जसे कारखाने उभे राहायला सुरुवात झाली, तस- तसे युरोपीय लोकही हळूहळू भायखळ्यात येऊ लागले. एक रेस-कोर्स आणि नंतर 1800 मध्ये सुरू झालेला टर्फ क्लब ही शहराची प्रसिद्ध ठिकाणे बनली. मुंबईतील पहिला निवासी क्लब - भायखळा क्लब 1833 मध्ये सुरू झाला. त्यानंतर या भागात एका भव्य चर्चची स्थापना झाली, ज्याने दूरदूरच्या ख्रिस्ती भाविकांना आकर्षित करायला सुरुवात केली. 19 व्या शतकात, हा परिसर ख्रिश्चन आणि पारशी लोकांचा एक उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला होता. 19 व्या शतकाच्या शेवटच्या पाच वर्षांत जेव्हा मुंबईत प्लेगची साथ आली तेव्हा लागण झालेले प्रवासी भायखळा स्थानकात बंदिस्त तृतीय श्रेणीच्या डब्यांमध्ये येत असत, तेथून त्यांना पुढे विलगीकरण शिबिरांमध्ये पाठवले जात असे.
1878 मध्ये महालक्ष्मी रेस-कोसच्या स्थापनेनंतर, उच्चभ्रू रहिवाशांमधले भायखळ्याचे आकर्षण कमी होऊ लागले. हळुहळू तेथून युरोपीय लोक बाहेर पडू लागले. 1890 मध्ये टर्फ क्लब बंद झाला. भायखळा क्लबनेही आपला गाशा गुंडाळला. आणि नंतर, पहिल्या महायुद्धाच्या काळात, भायखळा इन्फर्मरी नावाने एक रुग्णालय त्याच्या आवारात उभारण्यात आले. पुढे ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय म्हणून ओळखले जाऊ लागले.
भायखळा स्थानकात प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे,जवळच हाकेच्या अंतरावर मोठे स्थानक बांधण्याची गरज भासू लागली. लंडनस्थित जीआयपी रेल्वे बोर्डाच्या इच्छेनुसार 1885 ते 1886 या काळात नवीन स्थानकाच्या रचनेत अनेक वेळा बदल करण्यात आला. शेवटी डिसेंबर 1887 रोजी तत्कालीन सरकारने एका डिझाइनला मंजुरी दिली. भायखळ्याची नवीन इमारत बांधण्याचे कंत्राट मे . बरजोर्जी रुस्तमजी आणि कंपनीला देण्यात आले होते, ज्यांनी पूर्वी तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनस स्थानक बांधले होते.
नवीन स्थानकाच्या बांधकामाचा करार जून, 1890 मध्ये झाला. शेवटी, 1 जुलै, 1892 रोजी भायखळा स्थानकाचा नवीन प्लॅटफॉर्म लोकांसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर शेड, कारखाना , साइडिंग आणि इंजिनसाठी अतिरिक्त शेड बांधण्यात आली. नवीन प्लॅटफॉर्मच्या बांधकामासाठी 2.53 लाख रुपये आणि गुड्स-इंजिन शेडसाठी 3.70 लाख रुपये खर्चाला त्याकाळी मंजुरी देण्यात आली होती.
येथे रेल्वेचे डागडुजी केंद्र (वर्कशॉप) देखील होते. 1891 मध्ये मुंबईच्या आसपासच्या रेल्वे स्थानकांवर नवीन सिग्नलिंग यंत्रणा सुरू झाली तेव्हा या केंद्रातून आवश्यक वस्तू आणि साहित्य पुरवण्यात आले. जून, 1892 ते डिसेंबर, 1893 दरम्यान, रेल्वे यार्डमधील नवीन रस्ते, टर्न-टेबल, शेड, टाकी , कोल -प्लॅटफॉर्म आणि इतर काही बांधकामे पूर्ण करण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी 1928 मध्ये व्हीटी ते भायखळा दरम्यान स्वयंचलित रंगीत सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली. 1934 मध्ये, महालक्ष्मी रेसकोर्सवर घोड्यांच्या शर्यती पाहण्यासाठी प्रवाशांना आणण्यासाठी पुणे ते भायखळा दरम्यान 12 डब्यांची विशेष गाडी सुरू करण्यात आली. भायखळ्यातील उच्चभ्रू प्रवाशांना घेऊन येण्याची जबाबदारी बेस्टकडे सोपवण्यात आली होती.
गेल्या 150 वर्षांत भायखळा परिसर आणि स्थानक मुंबईतील विविध ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार राहिले आहे.
भायखळा स्थानकाचा वारसा जतन करून त्याचे नूतनीकरण
2022 मध्ये, बजाज समूहाच्या सहकार्याने आय लव्ह मुंबई फाउंडेशनच्या पुढाकाराने ऐतिहासिक भायखळा रेल्वे स्थानकाला त्याचे मूळ, प्राचीन वैभव पुन्हा मिळवून देण्यात आले. वास्तुविशारद आभा नारायण लांबा असोसिएट्सकडे या स्थानकाचा वारसा जपण्याची जबाबदारी देण्यात आली.
दर्शनी भागाच्या नूतनीकरणात बेसाल्ट दगडाच्या दर्शनी भागाची साफसफाई, दरवाजे, खिडक्या, ग्रील्स आणि गेट्सचे मूळ स्वरूप तसेच ठेवून त्याच्या नूतनीकरणाचा समावेश होता. लाकडी छत , मंगलोर टाइल्स आणि दर्शनी भागाच्या बाजूने लहान झुकते छत पुनर्स्थापित केले आहे. स्थानकात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी रॅम्प, पायऱ्या इत्यादी वाढवण्यात आल्या.. इमारती लाकडाचे ट्रस रूफ, मंगलोर टाइल्स आणि दर्शनी भागाच्या बाजूने लहान झुकत्या छताचा पुनर्विकास करण्यात आला. स्थानकात सर्वांना सुलभरीत्या प्रवेश करता यावा यासाठी रॅम्प, पायऱ्या सारख्या सुविधा उभारण्यात आल्या.
नूतनीकरण कामादरम्यान या ठिकाणी सापडलेल्या मूळ साइनेज ब्रॅकेट डिझाइनचा वापर करून डिझाईनचा एक अतिशय महत्त्वाचा घटक असलेले साईनेज बसवण्यात आले . प्रत्यक्ष ठिकाणी सापडलेले ऐतिहासिक रंग वापरून ग्रील रंगवण्यात आले आणि एका मोठ्या तिकीट खिडकी सारख्या सागवान लाकडाच्या पॅनेलिंग स्टँडला टिंटेड ग्लास फॅनलाइटने सुशोभित करण्यात आले.
“आम्ही दर्शनी भागातले प्लॅस्टर केलेले रंग आणि सिमेंटचे थर खरवडून काढले. मूळ इमारत सुंदर दगडी रचना होती जिला सिमेंट आणि प्लास्टरचा मुलामा दिला होता. "
आज त्याला मूळ वैभव परत मिळाले आहे. दगड पुनर्स्थापित केला आहे. तात्पुरती कार्यालये निर्माण करण्यासाठी भिंतींनी बंदिस्त केलेले व्हरांडे आता खुले करण्यात आले आहेत. मूळ टेराकोटा टाइलचे छत पूर्ववत केले आहे. बर्मा सागवान लाकडी दारे आणि खिडक्या 19 व्या शतकातील मूळ स्वरूपात पुन्हा दिसू लागल्या आहेत. सर्व विद्युत वायरिंगचे काम पुन्हा नव्याने करण्यात आले आहे. मूळ लोखंडी ग्रिल्स, तिची ऐतिहासिक तिकीट खिडकी आणि तिची मूळ बेसाल्ट स्टोन फ्लोअरिंगसह इमारतीचा काळजीपूर्वक पुनर्विकास करण्यात आला आहे” असे आभा नारायण लांबा यांनी सांगितले.
नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर, मुंबईची ही गौरवशाली वास्तू पुन्हा एकदा त्याचे आकर्षक जुने रूप धारण करत आहे. आता मुंबईकरांवर मोठी जबाबदारी आली आहे. ते म्हणजे स्वच्छ भारत अभियानाची काटेकोर अंमलबजावणी आणि या स्थानकाचा परिसर नेहमी स्वच्छ राहील याकडे लक्ष देणे .
PIB Mum/Features/ SC/PM
*The author is a Media & Communication Officer in PIB Mumbai
Photo Courtesy: Central Railway
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1839866)
Visitor Counter : 185