शिक्षण मंत्रालय
एक भारत श्रेष्ठ भारत आझादी का अमृतमहोत्सव विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रमाअंतर्गत ओदिशातील 50 विद्यार्थ्याचा महाराष्ट्राचा दौरा पूर्ण
Posted On:
03 JUL 2022 9:04PM by PIB Mumbai
ओडिशातील 50 विद्यार्थ्यांनी आज त्यांचा 5 दिवसांचा महाराष्ट्र दौरा पूर्ण केला. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ आणि आझादी का अमृत महोत्सव विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थी 29 जून रोजी मुंबईत पोहोचले. एआयसीटीई म्हणजेच भारतीय तंत्र शिक्षण परिषद आणि शिक्षण मंत्रालयाद्वारे हा उपक्रम आयोजित केला होता.


या तुकडीचे प्रायोजकत्व ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने ॲण्ड टेक्नॉलॉजी, मुंबई ने घेतले होते. गेल्या पाच दिवसांत त्यांना महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, परंपरा, संगीत, खाद्य याविषयी माहिती जाणून घ्यायची संधी या महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली.


महाराष्ट्र भेटीचा एक भाग म्हणून, विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेली ठिकाणे पाहिली. त्यांनी प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टला भेट दिली. पूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संग्रहालयात मुघल साम्राज्य काळातील अनेक अवशेष, कलाकृती आहेत. सिंधू संस्कृती आणि मुंबईच्या इतर खंडांशी असलेल्या

व्यापार संबंधांचं प्रदर्शनही त्यांनी पाहिलं.
भारताची मनोरंजन राजधानी आणि बॉलीवूडचे केंद्र असलेल्या मुंबईतील, नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा या महालक्ष्मी येथे असलेल्या ठिकाणाला विद्यार्थ्यांनी भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांनी वरळीतील नेहरू विज्ञान केंद्र आणि गिरगाव व्ह्यूइंग डेक याठिकाणी जाऊन त्यांचीही माहिती घेतली. तत्पूर्वी, विद्यार्थ्यांनी ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी येथील एआर व्हीआर तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला तसेच ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटला भेट दिली.

भेटीच्या शेवटच्या दिवशी, ओडिशातील विद्यार्थ्यांनी टीसीईटीच्या (TCET) स्वयंसेवकांसह नवी मुंबईतील ग्लोबल विपश्यना पॅगोडाला भेट दिली.यावेळी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते; त्यात संभलपुरी आणि भरतनाट्यम नृत्य सादर करून आज या उपक्रमाची सांगता झाली.

या मुक्कामादरम्यान, वेगवेगळे अंतर्गत आणि बाह्य उपक्रम,मजेदार खेळ आणि मैत्रीपूर्ण सामने आयोजित करण्यात आले होते ज्यातून, दोन्ही राज्यातील विद्यार्थ्यांना एकमेकांच्या परंपरा, संस्कृती, जीवनशैली, शिक्षण इत्यादींबद्दल विचार विनिमय करण्याची संधी मिळाली.

'एक भारत श्रेष्ठ भारत' कार्यक्रमाचा उद्देश अशा संकल्पनांद्वारे विविध राज्य/केंद्रशासित प्रदेश एकमेकांशी जोडण्यासोबत, विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील लोकांमधील परस्पर सामंजस्य वाढवणे आणि परस्परांमधील जिज्ञासा जागृत करणे हा आहे. भाषा शिक्षण, संस्कृती, परंपरा आणि संगीत, पर्यटन आणि पाककृती, खेळ अशा सर्व पद्धतींची देवाणघेवाण करत विविध क्षेत्रातील शाश्वत आणि संरचित सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक राज्ये हा उपक्रम राबवत आहेत.

*************
Radhika.A/Prajana/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1839012)
Visitor Counter : 233