युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

पहिल्यावहिल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिलेचे गोव्यात जोरदार स्वागत


देशात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली क्रीडा संस्कृती तळागाळात झिरपत आहे- क्रीडामंत्री गोविंद गावडे

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत- अ संघात सहभागी असलेल्या भक्ती कुलकर्णीला गोवेकरांकडून स्पर्धेसाठी शुभेच्छा

Posted On: 03 JUL 2022 3:22PM by PIB Mumbai

 

पहिल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड टॉर्च रिलेचे गोव्यात आज गोव्यात जोरदार स्वागत करण्यात आले. गोव्याची पहिली महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी हिच्या उपस्थितीत ग्रँडमास्टर अनुराग महामलने बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्याकडे सोपवली. राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक संचालक श्रीमती सुष्मिता जोत्सी, क्रीडा खात्याचे संचालक अजय गावडे यांच्यासह क्रीडा पदाधिकाऱ्यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशातील 75 शहरांमध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल नेण्यात येत आहे. यात गोव्याचा समावेश केला ही गोवेकरांसाठी अभिमानाची बाब आहे, असे क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले. खेलो इंडियाउपक्रमातून देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिभावंत खेळाडूंचा शोध होण्यास मदत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात क्रीडासंस्कृती रुजत आहे. या बुद्धिबळ मशालीमुळे गावा-गावांमध्ये बुद्धिबळ खेळाविषयी जागृती होण्यास मदत होईल, असा विश्वास क्रीडामंत्र्यांनी व्यक्त केला.

राज्यातून भक्ती कुलकर्णी, अनुराग महामल, लिओन मेंडोसा या बुद्धिबळपटूंनी देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर रोशन केले आहे. भक्ती कुलकर्णी हिच्यापासून प्रेरणा घेऊन राज्यात मुलींमध्ये जागृती निर्माण होईल, असे गोविंद गावडे म्हणाले.

गोवेकर भक्ती कुलकर्णी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत-अ संघात सहभागी आहे. तिला याप्रसंगी क्रीडा मंत्र्यांनी राज्यातील जनतेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

ग्रँडमास्टर अनुराग महामल आज सकाळी मुंबईहून बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल घेऊन गोव्यात दाखल झाला. त्यानंतर ही मशाल फोंडा येथील क्रांती मैदानावर आणण्यात आली. क्रांती मैदानावरुन पारंपरिक घोडे मोडणी आणि दिवली नृत्याच्या साथीने मशाल राजीव गांधी कला मंदिर येथे आणण्यात आली. याप्रसंगी विविध शाळा-महाविद्यांलयातील विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी कॅडेटस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोव्याहून बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल मध्य प्रदेशाकडे घेऊन जाण्याचाही मान अनुराग महामल याला मिळाला.

बुद्धिबळ ऑलिम्पिक मशाल रॅली

या ऐतिहासिक मशाल रॅलीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी  स्टेडियमवर करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त, या रिलेमध्ये एकूण 75 शहरांचा समावेश असेल.

19 जून रोजी नवी दिल्ली येथे मशाल रिलेच्या ऐतिहासिक आरंभ दिनी, फिडे या  आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संस्थेचे  अध्यक्ष आर्कडी ड्वोरकोविच यांनी माननीय पंतप्रधान मोदी यांच्याकडे ही मशाल दिली त्यानंतर  त्यांनी ती भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या हातात  सुपूर्द केली.

स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असल्यामुळे 44 व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत 20 खेळाडूंना स्पर्धेत  उतरवणार आहे भारताचा हा  आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू आहे. भारत खुल्या आणि महिला गटात प्रत्येकी 2 संघ उतरवण्यासाठी पात्र  आहे. 188 देशांमधून  2000 हून अधिक स्पर्धक या स्पर्धेत प्रतिनिधित्व करतील, बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या इतिहासातील ही सर्वोच्च संख्या आहे. 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत चेन्नई येथे 44 वी फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड होणार आहे.

बुद्धिबळ, जे आज आपल्याला माहित आहे, त्याचे मूळ चतुरंग या भारतीय खेळापासून आहे, जे 6 व्या शतकातील आहे.  पुढील शतकांमध्ये हा खेळ संपूर्ण आशिया आणि युरोपमध्ये पसरला आणि शेवटी 16 व्या शतकाच्या आसपास बुद्धिबळ म्हणून ओळखला जाणारा हा खेळ विकसित झाला.

***

S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1838954) Visitor Counter : 141


Read this release in: English