युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

देश उभारणीत अधिकाधिक युवकांनी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी; सर्व स्वयंसेवकांमध्ये संपर्क वाढवण्यासाठी डिजिटलीकरण मोहीम राबवली जावी- केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्र्यांचे आवाहन

Posted On: 25 JUN 2022 9:07PM by PIB Mumbai

 

राष्ट्र उभारणीत तरुणांचा सहभाग अधिकाधिक वाढावा, यासाठी नेहरू युवा केंद्र संघटना (NYKS) आणि राष्ट्रीय सामाजिक सेवा (NSS) कार्यक्रमांमध्ये युवा स्वयंसेवकांची नोंदणी वाढवण्याचे आवाहन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केले आहे. गुजरातच्या केवडिया इथे, देशभरातल्या विविध राज्यांच्या क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्र्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. आजच्या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेही उपस्थित होते.

कोविड महामारीच्या काळात, समाजाची सेवा करण्यात युवा स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती असं सांगत, अनुराग ठाकूर म्हणाले की राज्यांनी भारतातील युवा क्षमतांचा लाभ  घ्यायला हवा. तसेचराष्ट्र-निर्मितीच्या प्रकल्पांमध्ये त्यांचा सहभाग वाढवायला हवा. देशातील तरुणांना एकत्र आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आणि देशभरातील युवा स्वयंसेवकांची संपर्क व्यवस्था साखळी तयार करण्यासाठी  एक मोबाइल अॅप विकसित करण्याची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला.

या दोन दिवसीय परिषदेत , 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींसह विविध राज्यांतील 15 युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री सहभागी झाले होते.  भारताला क्रीडाक्षेत्रात एक अव्वल राष्ट्र बनवण्याविषयी या राष्ट्रीय व्यासपीठावर सखोल चर्चा झाली.

या विषयावर, सर्व राज्यांची एक सामायिक माहिती बँक विकसित करण्याची गरज आहे. या बँकेद्वारे,   विविध राज्यांमधल्या पायाभूत सुविधा आणि क्रीडा शाखा, प्रशिक्षकांची संख्या, उपकरणे सुविधा यांची माहिती मिळू शकेल जेणेकरून भविष्यातील नियोजन करतांना त्याचा इतरांनाही उपयोग होईल अशी सूचना ठाकूर यांनी केली.

"आम्हाला आपल्या भविष्यातील नियोजनासाठी शास्त्रीय दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे.  खेळांमध्ये उत्तम कामगिरी करणारी काही राज्ये आहेत, त्यांच्याकडे चांगले प्रशिक्षक आणि चांगल्या पायाभूत सुविधा आहेत ज्यांचा उपयोग इतर राज्यांतील खेळाडूंनाही करता येईल." असे ते पुढे म्हणाले.

क्रीडाक्षेत्रात भारताला जगातील, पहिल्या दहा देशांमध्ये स्थान मिळावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी, एकमेकांमध्ये समन्वय महत्त्वाचा ठरेल. आपली धोरणे आखताना, खेळाडूंना नेहमीच केंद्रस्थानी ठेवले पाहिजे आणि त्यांना सर्व सोयी सुविधा सहज उपलब्ध होतील, याची व्यवस्था केली पाहिजे, असे ठाकूर यांनी सांगितले.

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1837009) Visitor Counter : 144


Read this release in: English , Punjabi