संरक्षण मंत्रालय
सशस्त्र दलांमध्ये युवावर्गाच्या भरतीसाठी 'अग्निपथ' योजना
Posted On:
15 JUN 2022 8:16PM by PIB Mumbai
पुणे, 15 जून 2022
सशस्त्र दलांमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘अग्निपथ’ योजनेची माहिती, दक्षिण कमांड मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी आज पुण्यात दिली. युवकांना सशस्त्र दलांमध्ये सेवा बजावता यावी यासाठीच्या या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने 14 जून 2022 रोजी मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत निवडलेल्या युवकांना अग्निवीर म्हणून ओळखले जाईल.
“अग्निपथ योजना ही लष्कर आणि देशासाठी एक परिवर्तनात्मक सुधारणा असून भारतीय लष्कराच्या मनुष्यबळ व्यवस्थापनात आदर्श बदल घडवून आणण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेची संकल्पना युवा पिढीमध्ये राष्ट्रभक्तीला चालना देणे, समाजाला कुशल मनुष्यबळ पुरवणे आणि लष्करात अधिकाधिक तरुणांचा सहभाग सुनिश्चित करणे, ही आहे. राष्ट्रभक्तीने प्रेरित तरुणांना 4 वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलांमध्ये सेवा बजावण्याची अनुमती अग्निपथ योजना देते. ”असे जनरल वालिया यांनी सांगितले.
"युवावर्गाच्या अधिक समावेशामुळे लष्करात नवे चैतन्य निर्माण होईल आणि सशस्त्र दले अधिक तंत्रस्नेही होऊन परिवर्तन घडेल, जी काळाची गरज आहे", असे त्यांनी सांगितले.
जनरल ऑफिसरनी आश्वासन दिले की नव्या भरतीमध्ये किमान शारीरिक, वैद्यकीय आणि व्यावसायिक निकष सुनिश्चित करण्यासाठी सशस्त्र दल लागू असलेल्या मानकांशी कोणतीही तडजोड करणार नाही, हे जनरल वालिया यांनी स्पष्ट केले. योजनेची अंमलबजावणी आणि स्थायीकरणादरम्यान लष्कराची परिचालन क्षमता आणि सुसज्जता पूर्णपणे राखली जाईल, असेही त्यांनी आश्वस्त केले.
“मी ठामपणे सांगू इच्छितो की लष्कर आपली संस्कृती टिकवून ठेवेल - 'नाम, नमक और निशान' या आपल्या धर्मावर आणि एकसंधता, सौहार्द व संघभावना यावर आधारित तत्त्वांवरची आपली संस्कृती आणि लष्करी मूल्ये, आपला समृद्ध वारसा, इतिहास, परंपरा यांची जोपासना लष्कर कायम करेल, '' असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
या योजनेच्या अंमलबजावणीमुळे भारतीय सशस्त्र दले सरासरी 4-5 वर्ष तरुण होतील, असा अंदाज आहे. देशाला, समाजाला आणि देशातील युवा वर्गाला अल्प लष्करी सेवेचा मोठा लाभ होईल. यामध्ये देशभक्ती, सांघिक कार्य, शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे, देशाप्रती दृढ निष्ठा आणि बाह्य धोके, अंतर्गत धोके आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा वाढवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची उपलब्धता यांचा समावेश होतो.
अग्निवीरांना तिन्ही सेवांमध्ये लागू असलेल्या जोखीम आणि हालअपेष्टांसाठी दिल्या जाणाऱ्या भत्त्यांसह आकर्षक मासिक पॅकेज दिले जाईल. "चार वर्षांचा प्रतिबद्धता कालावधी पूर्ण झाल्यावर, अग्निवीरांना एककालिक 'सेवा निधी' पॅकेज दिले जाईल ज्यात त्यांचे योगदान त्यावरील जमा व्याज आणि व्याजासह त्यांच्या योगदानाच्या जमा झालेल्या रकमेशी सरकारकडून जुळणारे योगदान समाविष्ट असेल" अशी माहिती चीफ ऑफ स्टाफ जनरल वालिया यांनी दिली.
या योजनेमुळे सशस्त्र दलांमध्ये युवा वर्ग आणि अनुभवी कर्मचारी यांच्यात उत्तम संतुलन राखले जाऊन अधिक तरुण आणि तांत्रिकदृष्ट्या निपुण लढाऊ दलाला चालना मिळेल.
S.Patil/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1834369)
Visitor Counter : 288