अर्थ मंत्रालय

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्याचा  भाग म्हणून गोव्यातील पणजी येथे वित्तीय साक्षरता परिषदेचे आयोजन


‘क्रिएटिंग वेल्थ थ्रू मार्केट्स’ वरील परिषदेत लोकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्याचे आवाहन करण्यात आले

Posted On: 10 JUN 2022 10:15PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने  (DIPAM)  आज (शुक्रवार 10 जून 2022) पणजी येथील पणजी  कन्व्हेन्शन सेंटर येथे विभागाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्याचा  भाग म्हणून क्रिएटिंग वेल्थ थ्रू मार्केट्स अर्थात भांडवली बाजाराद्वारे संपत्तीची निर्मिती या विषयावर एका परिषदेचे आयोजन करण्यात आले  होते.

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने देशभरातील 75 ठिकाणी   अशाच प्रकारच्या परिषदेचे आयोजन केले होते. केंद्रीय वित्त आणि कंपनी  व्यवहार मंत्री  निर्मला सीतारामन यांनी बंगळुरु येथे परिषदेचे उद्घाटन केले, ज्याचे सर्व 75 कार्यक्रमांमध्ये थेट प्रसारण करण्यात आले.

पणजी येथे, उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी  मामू हेग, भारतीय प्रशासकीय अधिकारी, यांनी परिषदेचे उद्घाटन केले. परिषदेला संबोधित करताना हेग यांनी गोवा सरकार, राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे हरबीर सिंग मेहरोलिया म्हणाले की शेअर बाजारातील गुंतवणुकीचा सार्वजनिक हिस्सा वाढल्यामुळे  अर्थव्यवस्थेचा वेग वाढायला मदत होऊ शकते. सध्या उत्पन्नापैकी केवळ सहा टक्के हिस्सा शेअर बाजारात गुंतवला जातो. जर तो आपण 50 टक्के करू शकलो तर भारतीय अर्थव्यवस्था मोठी झेप घेईल. त्यासाठी जनतेमध्ये आर्थिक साक्षरता खूप महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.

वित्तीय बाजारातील  लैंगिक असमानतेकडे लक्ष वेधत आर्थिक साक्षरता सल्लागार डॉ. सुवर्णा सुर्यवंशी यांनी सांगितले की, महिला संपत्ती निर्मितीचा भाग आहेत परंतु मालमत्तेची मालकी त्यांना नाही.  मालमत्तेच्या मालकीमध्ये स्त्री-पुरुष अशी मोठी तफावत आहे. त्यावर मात करण्यासाठी महिलांना उत्पन्नाचे स्रोत, बँक खाते, शेअर बाजारात  गुंतवणूक असणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेला  आर्थिक दृष्ट्या  साक्षर केल्याशिवाय ते शक्य नाही, असे डॉ सूर्यवंशी म्हणाल्या .

परिषदेत  इतर वक्त्यांमध्ये सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस (इंडिया) लिमिटेड सीडीएसएलचे  संजय नूनेसअसोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे बाळकृष्ण किणी आणि आर्थिक साक्षरता सल्लागार  वर्षा नेर्लेकर यांचा समावेश होता.

तत्पूर्वी बंगळुरूमध्ये, देशव्यापी परिषदेचे उद्घाटन करताना, केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री  निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आता ज्या विचाराने निर्गुंतवणूक होत आहे, त्यामागे कंपनी  बंद करणे नव्हे तर ती  कार्यक्षमतेने चालवणे हा विचार आहे.  अधिक रोजगार निर्माण करण्याबरोबरच  त्या कंपन्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारला व्यावसायिक मनुष्यबळ  हवे आहे . धोरणात्मकरित्या निर्गुंतवणूक केलेल्या कंपन्या आता इक्विटीच्या बाबतीत चांगला  परतावा देत आहेत, भागधारकांना चांगला नफा देत आहेत, असे त्या म्हणाल्या.

तरुण उद्योजक हे असे लोक आहेत जे बाजारात भरपूर मूल्य निर्माण करत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये अधिक चांगले काय केले जाऊ शकते हे सांगण्यात त्यांनी रुची दाखवली तर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून  देशाचे अधिक हित साधले   जाऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1833065) Visitor Counter : 109


Read this release in: English