अर्थ मंत्रालय
भारतीय उद्योजक जेवढ्या लवकर कोविडोत्तर काळातील वास्तव समजून त्यानुसार बदल करतील, त्यावर त्यांचे यश अवलंबून असेल : रिझर्व बँकेचे गव्हर्नर
उद्योगांनी तात्कालिक लाभ शोधणाऱ्या संस्कृतीपासून दूर राहावे- शक्तिकांत दास यांचा भारतीय उद्योजकांना सल्ला
Posted On:
09 JUN 2022 6:14PM by PIB Mumbai
मुंबई, 9 जून 2022
कोविडोत्तर काळातील नव्या जगाचे वास्तव समजून घेत, त्यानुसार, स्वतःला बदलण्याची क्षमता भारतातील उद्योजक जेवढ्या लवकर स्वीकारतील, त्यावरच या उद्योगांचे यश अवलंबून असेल, असे मत भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले. “व्यवसाय करतांना धोका पत्करावाच लागतो. मात्र, हा धोका पत्करण्याआधी,व्यवसायाशी संबंधित खाचाखोचा आणि फायदेतोटे यांचा काळजीपूर्वक अभ्यास करायला हवा.“ असा सल्ला दास यांनी दिला. ‘भारतीय व्यवसाय: काल, आज आणि उद्या’ या विषयावर मुंबईत आयोजित व्याख्यानमालेत त्यांनी आज बीजभाषण केले. आझादी का अमृत महोत्सव आयकॉनिक वीकनिमित्त, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क (CBIC) विभागाने देशउभारणी या विषयावर सार्वजनिक व्याख्यानमाला आयोजित केली आहे, त्यातील पहिले भाषण आज शक्तिकांत दास यांचे होते.
उद्योगांनी तात्कालिक लाभ मिळवण्याच्या संस्कृतीपासून दूर राहायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला. कोणत्याही उद्योग व्यवसायातील फायदे-तोटे समजून घेत, त्यांचा विचार करुन मग आपल्या व्यवसायाचे स्वरूप काय असावे याचा निर्णय घ्यायला हवा, असाही सल्ला त्यांनी दिला. “निधी मिळण्याची अयोग्य व्यवस्था, आपल्याकडे असलेली मालमत्ता आणि दायित्व/कर्ज यांच्यातला असमतोल, अवास्तव अंदाज आणि धोक्याकडे दुर्लक्ष करुन व्यवसायावरच लक्ष केंद्रित करणे अशी सगळी व्यवसायाच्या अयोग्य स्वरूपामागची वैशिष्ट्ये नेहमीच आढळली आहेत” असे त्यांनी सांगितले.
याच संदर्भात, उद्योग व्यावसायिकांमध्ये विश्वास आणि जबाबदारीचे वातावरण निर्माण करणे, ही एका उत्तम कॉर्पोरेट प्रशासनाचे उद्दिष्ट असायला हवे, असे ते म्हणाले. “उत्तम प्रशासनाचे उद्दिष्ट, उद्योजकांच्या मनात विश्वास निर्माण करणे आणि धोका पत्करण्यासाठीची संस्कृती आणि नैतिक वर्तनासाठीचे वातावरण निर्माण करणे हे असले पाहिजे.”
स्टार्ट-अप्सबाबत बोलताना, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले, जुने तंत्रज्ञाना ऐवजी नवे तंत्रज्ञान आणू पाहणारे कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे तंत्रज्ञान तरुण उद्योजकांना नवीन संधी देत आहे आणि परिणामी, युनिकॉर्नची संख्या खूप वेगाने वाढत आहे. तरुण उद्योजक आणि स्टार्ट-अप यांनी त्यांच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी जोखीम आणि असुरक्षिततेचे सातत्याने परीक्षण करायला हवे असा सल्ला त्यांनी दिला.
अलिकडच्या काळातील धोरणात्मक सुधारणा आणि भारतीय उद्योग
गेल्या काही वर्षांत अनेक धोरणात्मक सुधारणा झाल्या, ज्यामुळे उद्योगांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, असे गव्हर्नर म्हणाले. जीएसटीचे मोठ्या प्रमाणात संकलन प्रशासकीय आणि प्रक्रियात्मक सुधारणा आणि जीएसटी प्रणालीचे अंतर्निहित सामर्थ्य दर्शवते. उद्योगांसाठी ही प्रणाली पूरक ठरते. त्यामुळे उद्योग आणि केंद्र व राज्य सरकार दोघांसाठी ते लाभदायक आहे. “बर्याच देशांमध्ये जीएसटी व्यवस्था स्थिरस्थावर व्हायला बराच वेळ लागला. आपण जीएसटीची 5 वर्षे पूर्ण करणार आहोत आणि हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे, इतर अनेक देशांपेक्षा कार्यक्षमतेच्या बाबतीत आपला अनुभव खूपच चांगला आहे”, असे ते म्हणाले.
"व्यवसाय सुलभता, कर प्रक्रिया सुलभ करणे आणि नियामक क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे". विविध प्रोत्साहने - मेक इन इंडिया आणि उत्पादन संलग्न प्रोत्साहनामुळे व्यवसायांना मोठी झेप घेता आली आहे, असे दास यांनी सांगितले. या संदर्भात, गव्हर्नर दास यांनी दिवाळखोरी आणि नादारी संहिता, 2016 चा संदर्भ दिला, ते म्हणाले की भांडवल ओघ वाढवण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी ही महत्त्वपूर्ण सुधारणा आहे. "राष्ट्रीय पायाभूत सुविधा योजना आणि राष्ट्रीय मुद्रीकरण योजना आणि पंतप्रधान गति शक्ती सर्व उद्योगांसाठी एक अनुकूल धोरण परिसंस्था निर्माण करतील," असे दास म्हणाले.
महसूल सचिव तरुण बजाज म्हणाले की, "भारतीय रिझर्व्ह बँक आणि सरकार या दोघांनीही काही उपाययोजना केल्या आहेत आणि मला आशा आहे की या प्रयत्नांना फळ मिळेल आणि आगामी काळात आपल्या आर्थिक निर्देशकांमध्ये स्थैर्य पाहायला मिळेल." भारताने 11% कर -जीडीपीचे गुणोत्तर गाठले आहे आणि वाढीव कराची अतिशय उत्तम पातळी अस्तित्वात आहे, असे ते म्हणाले. “मी आशावादी आहे आणि मला वाटते की या वर्षी देखील आपण सुरुवातीला अर्थसंकल्प बनवताना ठरवले त्यापेक्षा खूप चांगले काम करू शकू”, असे महसूल सचिव म्हणाले.
* * *
PIB Mumbai | S.Kakade/S.Kane/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1832686)
Visitor Counter : 198