विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सीएसआयआर-समुद्रविज्ञान संस्थेकडून जागतिक महासागर दिन साजरा
Posted On:
08 JUN 2022 7:10PM by PIB Mumbai
गोवा, 8 जून 2022
सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था, दोनापावल येथे आज जागतिक महासागर दिन साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी सीएसआयआर-एनआयओ संचालक प्रो. सुनील कुमार सिंग यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी समुद्र/सागरांचे मानवी आयुष्यातील तसेच वसुंधरा रक्षणासाठी असलेले महत्त्व विशद केले. सागरी संपदा आपल्या पारिस्थितीकिचा एक महत्त्वाचा भाग आहे कारण ते पृथ्वीचे ग्रहाचे फुफ्फुस आणि अन्न आणि औषधांचे प्रमुख स्त्रोत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
समुद्र/महासागराने 70% पेक्षा जास्त जागा व्यापली आहे. महासागर आपले जीवन स्त्रोत आहे, जे मानवाच्या आणि पृथ्वीवरील इतर सर्व जीवांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. महासागर पृथ्वीवरील बहुतांश जैवविविधतेचे आगार आहे आणि जगभरातील एक अब्जाहून अधिक लोकांसाठी प्रथिनांचा मुख्य स्त्रोत आहे.

समुद्र पर्यावरण संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावतात तसेच ते आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कणा असल्याचेही डॉ.सावंत म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी विनाशकारी मासेमारी, सागरी प्रदूषण, महासागराचे आम्लीकरण यामुळे आपल्या महासागरांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या घटकांबद्दल चिंता व्यक्त केली.
सीएसआयआर-एनआयओद्वारे कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित ग्रीन शिंपले संवर्धन कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी स्थानिक मच्छिमार आणि शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

सीएसआयआर-एनआयओचे संचालक प्रो. सुनील कुमार सिंग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. स्वच्छ भारत मोहीम, जिज्ञासा (विद्यार्थी-शास्त्रज्ञ जोडणी कार्यक्रम), आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा या मोहिमांमध्ये संस्थेच्या योगदानाविषयी सांगितले.
उल्लेखनीय शास्त्रीय संशोधन, कविता-निबंध, छायाचित्र कौशल्य यावर आधारीत समुद्रमंथन मासिकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
* * *
PIB Panaji | S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1832316)
Visitor Counter : 172