माहिती आणि प्रसारण मंत्रालय

#मिफ्फ 2022 मध्ये आज 'फोर्जिंग फ्युचर', 'घर का पता', 'रिटर्न ऑफ द होली ग्रेन' आणि 'ब्रदर ट्रोल' या चार चित्रपटांच्या दिग्दर्शकांची तसेच 'विकल्प' या चित्रपटाच्‍या पटकथाकाराची प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी चर्चा


लोहारकामाच्या व्यवसायाचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपविण्यातील अनिश्चितता दर्शविणारा ‘फोर्जिंग फ्युचर’, लोकांना आपल्या मूळ स्थानापासून जबरदस्तीने विस्थापित होण्यास भाग पाडल्यानंतर स्वतःची ओळखच पुसली गेल्याची त्यांची वेदना व्यक्त करणारा ‘घर का पता’, आदिवासी समुदायांच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असणाऱ्या भरड धान्यांच्या पुनरुज्जीवनाची कहाणी सांगणारा ‘रिटर्न ऑफ होली ग्रेन’ आणि दोन भावांमधील नात्यांच्या प्रवासाचे वर्णन करणारा ‘ब्रदर ट्रोल’ यांच्याविषयी आजच्या संवादात माहिती देण्यात आली

Posted On: 03 JUN 2022 5:15PM by PIB Mumbai

मुंबई, 3 जून 2022

 

मुंबई येथे सध्या सुरु असलेल्या मिफ्फ 2022 अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आज 'फोर्जिंग फ्युचर', 'घर का पता', 'रिटर्न ऑफ द होली ग्रेन' आणि 'ब्रदर ट्रोल' या चार चित्रपटांच्या दिग्दर्शकांची प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी चर्चा आणि संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

फोर्जिंग अर्थात लोहारकाम ही मानवी इतिहासाइतकीच जुनी कला आहे. ‘फोर्जिंग फ्युचर’ हा दिग्दर्शक दीप चौधरी यांचा इंग्रजी माहितीपट आसामच्या ग्रामीण भागातील एका लोहाराचा मुख्य व्यवसाय असणाऱ्या गावात पिढ्यानपिढ्या होत असलेला बदल दाखवतो; आपल्या मुलांनी खोटेपणाचा मार्ग चालू ठेवावा अशी वडिलांची इच्छा नाही आणि मुलांचीही तशी इच्छा नाही. अधिक चांगल्या दर्जाचे जीवन जगण्यासाठीच्या या संघर्षात, परंपरागत वारसा अनिश्चिततेसह कसा दोलायमान होतो याचे चित्रण या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळते.

या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक-दिग्दर्शक दीप चौधरी या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले की हा चित्रपट लोहारकाम करणाऱ्या समाजाविषयीचा आहे. या समाजाच्या लोहारकलेचा परंपरागत वारसा मोठा असला तरी हे कष्टाचे काम मुलांनी करू नये अशी वडिलांची इच्छा आणि नव्या पिढीमध्ये हा परंपरागत व्यवसाय पुढे सुरु ठेवावा की ठेवू नये अशी संभ्रमावस्था, अशा प्रकारच्या दोलायमान परिस्थितीचे वर्णन या माहितीपटात केले आहे.

'घर का पता' या माहितीपटाच्या दिग्दर्शिका मधुलिका जलाली या सहा वर्षांच्या असताना, 1990 साली काश्मीरमध्ये झालेल्या सशस्त्र बंडखोरीच्या काळात कुटुंबासह त्यांना काश्मीर खोरे सोडून जावे लागले. स्वतःवर ओढवलेल्या या प्रसंगाचे वर्णन करणाऱ्या या माहितीपटात ज्या घरात जन्म घेतला त्याच्या पुनर्बांधणीच्या माध्यमातून त्यांनी त्या काळी झालेले व्यक्तिगत नुकसान आणि स्वतःची ओळख हरविल्याची जाणीव व्यक्त केली आहे. काश्मीर खोरे सोडून गेल्यानंतर चोवीस वर्षांनी परत आल्यावर त्यांचे कुटुंब जेव्हा श्रीनगरच्या रैनावारी या उपनगराच्या रस्त्यांना पुन्हा भेट देते तेव्हा कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या एकत्रित आठवणींचा अल्बम म्हणजे हा चित्रपट. या माहितीपटाच्या निर्मितीविषयी चर्चा करताना दिग्दर्शिका मधुलिका जलाली म्हणाल्या, की त्या मूळच्या काश्मिरी पंडित असून लहानपणीच्या घराविषयीच्या आठवणी त्यांच्याकडे नाहीत. म्हणून त्यांनी चोवीस वर्षांनतर कुटुंबियांना तिथे नेले आणि त्यांच्या कुटुंबाच्या घराच्या आठवणी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कुटुंबाकडे त्या घराचे छायाचित्र देखील नव्हते. तर अशा प्रकारे जबरदस्तीने हुसकावून लावलेल्या कुटुंबांची मनस्थिती, मुळची ओळख पुसून टाकली गेल्याची भावना या चित्रपटातून व्यक्त होते. तसेच अशा प्रकारे स्वतःच्या मूळ प्रदेशापासून दूर, वेगळ्याच ठिकाणी वास्तव्य करावे लागलेल्या सर्व लोकांच्या स्वतःच्या मनातील वेदना या चित्रपटातून व्यक्त झाल्यामुळे ते या माहितीपटाशी स्वतःला जोडून घेऊ शकतील असे त्या म्हणाल्या.

सुमारे पाच दशकांपूर्वी, भरड धान्ये ही भारतात  प्रामुख्याने घेण्यात येणारी पिके होती. भारत हा भरड धान्यांचा जगातील अग्रगण्य उत्पादक देश म्हणून प्रसिद्ध आहे तरीही, हरित क्रांती तसेच तांदूळ आणि गहू यांना अनुकूल असणाऱ्या खाद्यविषयक सरकारी धोरणांनी भरड धान्यांकडे दुर्लक्ष झाले. परिणामी या धान्यांचे उत्पादन आणि वापर अशा दोन्हीत मोठी घट झाली. ‘रिटर्न ऑफ होली ग्रेन’ हा मल्याळम भाषेतील माहितीपट नेमक्या याच समस्येवर भाष्य करतो आणि भारतातील आदिवासी जमातींमधील नागरिकांचे पोषण आणि सुरक्षिततेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून भरड धान्यांचे महत्त्व विषद करतो. या माहितीपटाचे निर्माता-दिग्दर्शक जी.एस.उन्नीकृष्णन नायर यांनी चित्रपटाविषयी बोलताना सांगितले, 1980 च्या सुमारास केरळमध्ये भरड धान्ये ही प्रमुख पिके होती पण 1990 च्या सुरवातीला कापूस उत्पादकांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना भरड धान्यांऐवजी कापूस लागवड करण्याचा आग्रह केला. त्यामुळे 1994 सालापर्यंत सर्व भरड धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी ही धान्ये सोडून कापूस लागवड करण्याची सुरुवात केली. भरड धान्ये हा तेथील आदिवासी जमातींचे मुख्य अन्न होते. त्याचे उत्पादन थांबल्यामुळे, या जमातींमध्ये गंभीर आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या. पत्रकारांनी याबाबतची जागृती केल्यानंतर सरकारने देखील भरड धान्यांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मिलेट व्हिलेज’ सारखे अनेक उपक्रम हाती घेतले. सरकारच्या प्रयत्नांमुळे आता आदिवासी पुन्हा त्यांच्या पूर्वीच्या खाद्यसंस्कृतीकडे वळत आहेत. 2018 ते 21 या कालावधीत कापूस लागवडीखालील जवळपास 81% जमीन आता पुन्हा भरड धान्यांच्या लागवडीखाली आणण्यात आली आहे. या माहितीपटाच्या माध्यमातून आम्ही पारंपारिक खाद्यसवयी जतन करण्याचे महत्व अधोरेखित केले आहे असे जी.एस.उन्नीकृष्णन नायर यांनी सांगितले.

  

कोणे एके काळी, सर्वात मोठ्या भावाच्या आकस्मिक मृत्यूमुळे फारो बेटांवर एकट्या पडलेल्या दोन भावांनी त्यांच्यातील नाजूक नाते जपण्यासाठी केलेली धडपड ‘ब्रदर ट्रोल’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येते. या चित्रपटाविषयी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक गुडमंड हेम्सडल म्हणाले, हा चित्रपट 1800 च्या उत्तरार्धातील काळ आपल्यासमोर उभा करतो. उजाड जमिनी आणि अतिधार्मिक लोकांच्या या देशात मोठ्या भावाच्या मृत्युनंतर दोन भावांमधील मतभेदांविषयी आणि नंतरच्या काळात हे मतभेद सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची कथा म्हणजे हा चित्रपट आहे असे गुडमंड हेम्सडल यांनी सांगितले. 

पटकथाकार सुदीप निगम हे देखील या चर्चात्मक कार्यक्रमाला उपस्थित होते. मिफ्फ मध्ये सादर होणाऱ्या 'विकल्प' या त्यांच्या लघुपटाबद्दल बोलताना ते म्हणाले या चित्रपटाच्या शीर्षकाचा अर्थ निवडीचा पर्याय किंवा निर्णय असा होतो. या चित्रपटात एका छोट्या शहरातून मुंबईसारख्या शहरात येऊन राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या एका मुलीची कथा चित्रित करण्यात आली आहे. एका रात्री या मुलीच्या कार्यालयात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे तिला, उद्या त्याच कार्यालयात जाऊन काम करणे सुरु ठेवावे की नाही याचा निर्णय घ्यावा लागतो ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. मानवी वर्तणुकीच्या विविध पैलूंमुळे योग्य आणि अयोग्य यामधून नेहमीच योग्य पर्यायाची निवड करणे शक्य होत नाही याची जाणीव हा चित्रपट करून देतो असे सुदीप निगम यांनी सांगितले.

 

* * *

PIB MIFF Team | S.Patil/S.Chitnis/Darshana/MIFF-57

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1830843) Visitor Counter : 187


Read this release in: English