माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मिफ्फ 2022 च्या मिफ्फ संवादमध्ये आज 'इनाम', 'राधा' आणि 'स्क्रीमिंग बटरफ्लाईज' या तीन चित्रपटांच्या दिग्दर्शकांची माध्यम प्रतिनिधींशी बातचीत
राधा-कृष्ण कथेचे रूपक वापरून अॅनिमेशन तंत्राने साकारलेला ‘राधा’, दगड भिरकावणारी तरुण काश्मिरी मुले आणि त्यांच्या या साहसी खेळावर अभिनव उपाय करणारा लष्करी अधिकारी यांची कथा सांगणारा ‘इनाम’ आणि आसाममधील भीषण आपत्तीचे दर्शन घडविणारा ‘स्क्रीमिंग बटरफ्लाईज’ हे तिन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या संवेदनांना स्पर्श करणारे
प्रविष्टि तिथि:
01 JUN 2022 6:09PM by PIB Mumbai
मुंबई, 1 जून 2022
मुंबई येथे सुरु असलेल्या मिफ्फ 2022 अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आज इनाम, राधा आणि स्क्रीमिंग बटरफ्लाईज या तीन चित्रपटांच्या दिग्दर्शकांची प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी चर्चा आणि संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिग्दर्शक बिमल पोद्दार यांचा ‘राधा’ हा बंगाली भाषेतील चित्रपट अॅनिमेशन तंत्राचा वापर करून निर्माण करण्यात आला आहे. कोलकाता येथे वास्तव्य करणारी राधा नामक वृद्धा आणि तिने अत्यंत प्रेमाने ज्याचा सांभाळ केला आहे असा एक लहान मुलगा यांच्यातील नातेसंबंधांचे दर्शन हा चित्रपट घडवितो. नशिबाने वेगळे व्हावे लागल्यानंतर या राधेला त्या मुलाच्या भेटीची कशी आस लागते याचे चित्रण प्रेक्षकांना बघायला मिळते.

एका अर्थी, आपल्या पुराणातील कथेमध्ये वर्णिलेल्या गोष्टीनुसार कृष्ण वृंदावनातून निघून गेल्यानंतर राधा त्याची कायम वाट पाहत राहिली, आणि ते दोघे एकमेकांशिवाय कायम अपूर्णच राहिले या कथेचे प्रतीकात्मक चित्रण म्हणजे हा चित्रपट होय. या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक बिमल पोद्दार म्हणाले की, अॅनिमेशन चित्रपट म्हणजे केवळ मुलांसाठीचे कार्टूनपट हा रूढ समज खोडून काढून अधिक विस्तारित प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचणे हे आमचे मुख्य ध्येय होते.

शाहनवाज बकाल दिग्दर्शित ‘इनाम’ हा काश्मिरी भाषेतील चित्रपट आपल्याला क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्या मनोव्यापाराचे दर्शन घडवितो. जेव्हा हे खेळाडू त्यांची प्रतिभा क्रिकेटखेरीज इतर ठिकाणी वापरु लागतात, तेव्हा त्यांच्या या विचित्र साहसी प्रयोगाचे कोणते परिणाम त्यांना भोगावे लागतात हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहता येईल. या चित्रपटात एकही संवाद नाही आणि हेच खरे आव्हानात्मक कार्य होते, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक शाहनवाज बक्वाल यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरमध्ये सैनिकांवर किंवा कार्यक्रमात दगड भिरकावणाऱ्या तरुण काश्मिरी मुलांची वृत्ती आणि अशा घटनांना तोंड देऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी चाकोरीबाहेरील उपक्रम हाती घेणारा लष्करी अधिकारी यांच्या दरम्यानचे नातेसंबध यांचे चित्रण या चित्रपटात केले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कलाकारांऐवजी खऱ्या व्यक्ती, खऱ्या जागा वापरण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

दिग्दर्शिका अॅमी बरुआ यांचा ‘स्क्रीमिंग बटरफ्लाईज’ हा आसामी भाषेतील माहितीपट, आसाम मधील भयानक पुरानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करतो. जेव्हा आपल्या नेहमीच्या परिचयातील नद्यांच्या लाटांचे स्वरूप बदलते तेव्हा आपल्याला हा बदल ठळकपणे जाणवतो. टेकड्यांच्या शिखरावर पडलेले ओरखडे आपल्याला दिसतात, जणू काही त्या टेकड्यांनी स्वतःचेच जीवन, श्वास आणि स्वप्ने ओरबाडून टाकून दिली आहेत असा भकासपणा आपण बघू शकतो. भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, आसाम राज्याने नुकताच हा भीषण अनुभव घेतला.

या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकाने प्रेक्षकांचे विचार आणि तर्कशुद्ध आकलनशक्तीसमोर हे वास्तव उभे केले आहे. या प्रसंगी बोलताना चित्रपटाच्या दिग्दर्शिका अॅमी बरुआ म्हणाल्या, हा माहितीपट म्हणजे माझ्यासाठी केवळ एक कामाचा विषय नाही. मी माझ्या निवासस्थानाजवळ असलेल्या आपत्तीग्रस्तांच्या वेदना जवळून पाहिल्या. या सर्व पीडितांच्या मुलाखती घेऊन त्यांचे सत्य अनुभव या माहितीपटात दर्शविले आहेत. या लोकांवर कोसळलेल्या संकटांना सर्वांसमोर आणणे आणि या परिस्थितीत ज्यांची मदत आपण घेऊ शकतो त्यांच्या मुलाखती घेणे यातून हा चित्रपट साकारला आहे असे त्या म्हणाल्या.
* * *
PIB MIFF Team | R.Aghor/S.Chitnis/Darshana/MIFF-39
|
चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !
|
|
#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?
|
|
जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.
|
|
कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर बघता येतील.
|
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1830160)
आगंतुक पटल : 196
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English