माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मिफ्फ- 2022 मध्ये ‘‘फ्रेंडस् टू एलिफंट‘‘ चे दिग्दर्शक कृपाल कलिता, ‘अरूणा वासुदेव- मदर ऑफ एशियन सिनेमा’’ या माहितीपटाच्या दिग्दर्शिका सुप्रिया सुरी आणि ‘फूटबॉल चांगथांग’’ या तीन माहितीपटाच्या दिग्दर्शकांनी साधला संवाद
‘‘माहितीपटाच्या निर्मितीसाठी विषयाचा सखोल अभ्यास, संशोधन करण्याची गरज’’
‘‘मानव आणि हत्ती यांच्यातला संघर्षामुळे निसर्गावर घाला, हे जाणण्याची आवश्यकता’’
‘‘कोणत्याही खेळाला अगदी छोट्या गावातून मिळणारा पाठिंबा तितकाच महत्वाचा’’
प्रविष्टि तिथि:
01 JUN 2022 4:19PM by PIB Mumbai
मुंबई, 1 जून 2022
17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आज दुपारी तीन वेगवेगळ्या माहितीपटाच्या दिग्दर्शकांनी ‘‘मिफ्फ संवाद’’ मध्ये प्रसार माध्यमे आणि उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधला. यामध्ये ‘‘ फ्रेंडस् टू एलिफंट‘‘ चे दिग्दर्शक कृपाल कलिता, ‘अरूणा वासुदेव- मदर ऑफ एशियन सिनेमा’’ या माहितीपटाच्या दिग्दर्शिका सुप्रिया सुरी आणि ‘फूटबॉल चांगथंग’’ चे लेखक, निर्माता स्टॅन्झिन जिंगमेट सहभागी झाले होते. यापैकी ‘अरूणा वासुदेव‘‘ यांच्यावरील माहितीपटाचे महोत्सवात 30 मे रोजी प्रदर्शन झाले तर उर्वरित दोन्ही माहितीपटांचे आज दुपारी प्रदर्शन झाले.
यावेळी माहितीपटांच्या निर्मितीची कल्पना आपल्याला कशी सुचली, तो बनवताना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले, याविषयी तीनही चित्रपटकर्त्यांनी सांगितले. एखाद्या क्षेत्रात खूप मोठे काम करून ठेवलेल्या व्यक्तीचे काम चरित्रपटासारख्या माहितीपटाच्या माध्यमातून लोकांपुढे आणताना त्याविषयी अगदी सखोल अभ्यास, संशोधन करण्याची गरज असते, असे नमूद करून ‘अरूणा वासूदेव’ यांच्यावर आपण एक वर्षभर संशोधन करून सगळी माहिती जमा केली, असे सुप्रिया सुरी यांनी सांगितले.

चित्रसृष्टीच्या इतिहासामध्ये सुवर्णपान लिहिणारे अनेक कलाकार होवून गेले, त्या सर्वांनाच लोकप्रियता मिळाली असे नाही. त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी अरूणा वासुदेव यांनी खूप मोठे काम केले आहे. या कलाकारांच्या कामाचे दस्तावेजीकरण अरूणा यांनी केले. त्या चित्रपट समीक्षकही होत्या, देशविदेशातल्या चित्रपट महोत्सवाला उपस्थित राहून त्याविषयी लेखन करण्याबरोबरच महत्वपूर्ण नोंदी करण्याचे मोठे काम त्यांनी केले. अरूणा वासुदेव यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकांच्या, कलाकारांच्या, मुलाखती घेतल्या, त्यांच्या कार्याचा विस्तृत परिचय सुप्रिया सुरी यांनी आपल्या चरित्र-माहितीपटामध्ये करून दिला आहे.

आजमितीला आसामात सहा हजारांपेक्षा जास्त हत्ती आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे देशात सगळीकडे हत्तींच्या अधिवासाचे क्षेत्र कमी होत चालले आहे. त्यामुळे हत्तींना पुरेसे अन्न, पाणी मिळत नाही. अशावेळी हे हत्ती, अन्नाच्या शोधात मानवी वसाहतींमध्ये येतात. इथूनच मग माणूस आणि हत्ती असा संघर्ष निर्माण होतो. वास्तविक हत्ती अतिशय शिस्तप्रिय, कोणालाही त्रास न देणारा प्राणी आहे. त्यांच्या अन्नाची व्यवस्था केली तर तो माणसांची खूप पटकन आणि छान मैत्री करतो. तरीही लोक हत्तींना त्रास देतात, अशी व्यथा ‘हत्तीबंधू’ कृपाल कलिता यांनी ‘‘मिफ्फ संवाद’’ मध्ये व्यक्त केली.

आपल्या या तासापेक्षाही कमी अवधीच्या माहितीपटासाठी तीन वर्षाचा काळ लागला. याचे कारण म्हणजे, हत्ती ठराविक काळातच विशिष्ट ठिकाणी येतात, ते आल्यानंतरच चित्रीकरण होवू शकत होते, असे सांगून हत्तींना केळींची झाडे, भाताचे तूस खायला ठेवून चित्रीकरण केल्याची माहिती कलिता यांनी दिली. आपण प्राण्यांचा आदर केला, त्यांना त्रास नाही दिला तर ते आपल्याला काहीही करीत नाहीत, याचा अनुभव या चित्राची निर्मिती करताना घेतला, असे सांगून मानव आणि हत्ती यांच्यातला संघर्ष म्हणजे निसर्गावर घाला आहे, हे आपण जाणले पाहिजे, त्याचे गांभीर्य ओळखले पाहिजे, असे कलिता म्हणाले.

यंदाच्या मिफमध्ये अतिशय कमी अवधीचा ‘कथापट’ प्रदर्शित झाला, तो म्हणजे, ‘‘फूटबॉल चांगथंग’’. या चित्रपटाचे दिग्दर्शक स्टॅन्झिन जिगमेट यांनी आजी आणि नातवाच्या फूटबॉलप्रेमाची कथा त्यांच्या छोट्या लघुपटातून सादर केली आहे. अगदी दोन मिनिटांपेक्षाही कमी अवधीचा हा कथापट लडाखमध्ये 14 हजार फूट उंचीवर उणे 15, उणे 20 अशा तापमानामध्ये चित्रित केला आहे.

ज्या गावामध्ये टी.व्ही, सिनेमा, अशा साधनांचा अभाव असतानाही घरातल्या आजीला फूटबॉलविषयी प्रेम असते. त्यामुळे नातवालाही फूटबॉलचे आकर्षण वाटायला लागते. त्यातच शेजारच्या गावामध्ये फूटबॉलचे सामने होणार असल्याचे पत्रक गावात वाटले जाते. आणि त्या सामन्यांचा आनंद आजी आणि नातू लूटतात. कोणत्याही खेळाला अगदी लहान लहान ठिकाणाहून मिळणारा पाठिंबाही खूप महत्वाचा आहे, हे अधोरेखित करणारा हा लघुपट आहे.
या चित्रपटाचे चित्रीकरण करताना पडणारा बर्फ आणि सर्वत्र जमा झालेला बर्फ हेच मोठे आव्हान होते, असे स्टॅन्झिन जिगमेट यांनी सांगितले.
आशय समृद्ध माहितीपटांना मिफ्फने दिलेल्या मंचाबद्दल तीनही दिग्दर्शकांनी ‘मिफ्फ’ संयोजकांचे आभार मानले.
* * *
PIB MIFF Team | R.Aghor/S.Bedekar/Darshana/MIFF-38
|
चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !
|
|
#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?
|
|
जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.
|
|
कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर बघता येतील.
|
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1830110)
आगंतुक पटल : 215
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English