माहिती आणि प्रसारण मंत्रालय

तुमचे चित्रपट ऑस्कर पर्यंत कसे न्यायचे?


मिफ 2022 मास्टर क्लासमध्ये कार्टर पिल्चर यांची माहिती

“एक उत्तम लघुपट बनवणे एखादी गोष्ट सांगण्यासारखे आहे” – कार्टर पिल्चर

Posted On: 30 MAY 2022 9:20PM by PIB Mumbai

मुंबई, 30 मे 2022

 

अतिशय प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कारासाठी एखाद्याचा चित्रपट निवडला जाण्यासाठी काय करावे लागते? जगातल्या प्रत्येक उदयोन्मुख चित्रपट निर्मात्याच्या मनात हाच प्रश्न घोळत असतो. काही हरकत नाही. या प्रश्नाचे अगदी अचूक उत्तर तुम्हाला दिले आहे, 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या शॉर्ट मुव्ही एन्टरटेन्मेंट कंपनी शॉर्टस् टीव्हीचे संस्थापक आणि सीईओ कार्टर पिल्चर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मास्टर क्लासने. कार्टर पिल्चर हे ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या लघुपटांचे गेली 17 वर्षे वितरक देखील आहेत आणि बाफ्टा आणि अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्टस् ऍन्ड सायन्सेस(AMPAS)चे मताधिकार असलेले सदस्य आहेत.

2000 साली प्रारंभ झाल्यानंतर शॉर्टस् टीव्हीच्या आतापर्यंतच्या प्रदीर्घ प्रवासाची पिल्चर यांनी नेमकेपणाने माहिती दिली. लघुपटांचे विश्व खरोखरच अतिशय उत्साहवर्धक आहे आणि या क्षेत्रात अगणित संधी आहेत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्टस् ऍन्ड सायन्सेसकडून ऑस्कर नामांकित लघुपट निवडण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या प्रक्रियेची थोडक्यात माहिती दिली.  

  

ऑस्करला जाणारा मार्ग

ऑस्कर पुरस्काराच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमांची माहिती देताना ते म्हणाले की पात्रता ही गुरुकिल्ली आहे आणि ऑस्करसाठी अर्ज करताना पात्र ठरण्याचे तीन मार्ग आहेत. “ हा चित्रपट एकतर लॉस एन्जेलिस थिएटरमध्ये व्यावसायिक तत्वावर सात दिवसांसाठी प्रदर्शित झाला असला पाहिजे किंवा मान्यताप्राप्त चित्रपट महोत्सवात त्याला पात्रता पुरस्कार मिळाला पाहिजे. स्टुडंट अकॅडमी ऍवॉर्डस् मध्ये सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक मिळाल्यासही तो चित्रपट पात्र ठरू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

एखादा उत्तम लघुपट बनवणे खरे तर एखादी कथा सांगण्यासारखे आहे ही बाब देखील त्यांनी अधोरेखित केली.

“तुम्हाला ऑस्कर मिळवण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सांगावी लागेल किंवा एखाद्या अशा समस्येकडे लक्ष वेधावे लागेल जी सोडवण्याची नितांत गरज आहे. चित्रे, निष्कर्ष, पात्रे, व्हॉईस ओव्हर्स,अँनिमेशन आणि लाईव्ह ऍक्शन अशा अनेक घटकांचा वापर करून एखाद्याला आपली कथा रोचक बनवता येऊ शकते. पण विविध माध्यमांचे मिश्रण करताना चित्रपट निर्मात्यांनी सावध राहणे देखील गरजेचे आहे. तुम्ही चित्रपटात जे काही वापरणार आहात ते तुमच्या कथानकाशी सुसंगत असले पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ऑस्करसाठी नामांकन मिळवणे हेच चित्रपट निर्मात्यांचे अंतिम उद्दिष्ट असता कामा नये यावरही कार्टर पिल्चर यांनी भर दिला. आपले लक्ष्य आपल्या चित्रपटाची आणि चित्रपट निर्माता म्हणून आपली ओळख निर्माण करणे हे असले पाहिजे, असे ते म्हणाले. आपला चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यामुळे तो जास्त प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे चित्रपट निर्मितीच्या व्यापक विश्वामध्येही एखाद्याला एका वेगळ्याच पातळीवर जाता येते, असे त्यांनी सांगितले.

लघुपट उद्योगाच्या भवितव्याबाबत काही संकेत देत ते म्हणाले की भारतात आणि परदेशात लघुपट अधिक जास्त प्रमाणात कलेचा मुख्य प्रवाह बनू लागले आहेत. लघुपट ऑनलाईन प्रदर्शित करण्याला त्यांनी विरोध केला. असे केल्यामुळे  ऑस्कर नामांकनाच्या दिशेने होणाऱ्या प्रवासावर त्यांचा विपरित परिणाम होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. थेट प्रेक्षकांकडून निधी उभारण्याचा पर्याय देणाऱ्या वेब 3 सारख्या मंचाकडून सार्वजनिक निधी उभारण्याच्या विषयावर देखील त्यांनी माहिती दिली.


* * *

PIB MIFF Team | R.Aghor/S.Patil/Darshana/MIFF-23

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms / #FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवातचित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील.  ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk   या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829598) Visitor Counter : 151


Read this release in: English