माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मिफ्फ-2022 च्या स्टुडंट्स फिल्म विभागात अहमदाबादच्या एनआयडी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले सात चित्रपट


सतराव्या मिफ्फ च्या राष्ट्रीय स्पर्धा विभागात सेतू रामलिंगम यांचा ‘अमंग द स्टार्स’ हा विज्ञान कथा अॅनिमेशनपट

‘क्षण’ लघुपटाच्या माध्यमातून दिग्दर्शिका साक्षी सिंग यांनी हाताळला मनोविकारांसारखा संवेदनशील विषय

Posted On: 30 MAY 2022 7:57PM by PIB Mumbai

मुंबई, 30 मे 2022

 

माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपटांसारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपट निर्मितीत तरुणांची रुचि दिवसेंदिवस वाढते आहे, याचा प्रत्यय सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वारंवार येतो आहे. या महोत्सवाच्या स्टुडंट्स फिल्म विभागात, यावेळी जगभरातल्या विविध चित्रपट निर्मिती संस्थांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले अनेक लघुपट, माहितीपट आणि अॅनिमेशनपट दाखवले जात आहेत.  अहमदाबादच्या एनआयडी म्हणजे, ‘नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाईन’ च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले सात चित्रपट या महोत्सवात आहेत.या  संस्थेत व्याख्याते म्हणून कार्यरत असलेले हितेश चौरसिया यांनी आज मिफ्फ डायलॉग अंतर्गत झालेल्या पत्रकार परिषदेत या चित्रपटांविषयी माहिती दिली. त्याशिवाय ‘क्षण’ या हिन्दी लघुपटाच्या दिग्दर्शिका साक्षी सिंग आणि ‘अमंग द स्टार्स’ या विज्ञान कथा अॅनिमेशनपटांचे दिग्दर्शक सेतू रामलिंगन या दोन युवा दिग्दर्शकांनी देखील या पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. 

या महोत्सवात, एनआयडीचे सातही चित्रपट वेगवेगळ्या विषयांशी संबंधित आहेत. ‘अॅन अर्लि स्प्रिंग’, ही प्रमती आनंद यांची कथा हिमालयातल्या गावात आधुनिक विचारांची शहरी मुलगी आल्यावर, इतर समवयस्क मुलींवर झालेल्या परिणामांचे वर्णन करणारी आहे,’कावळा शिवला’ ही मासिक पाळीसारख्या संवेदनशील विषयावरची आई-मुलामधला बंध उलगडणारी कथा आहे, ‘यहुदीम’गुजरातमधल्या ज्यू लोकांचे जीवन वर्णन करणारी कथा आहे, बली ही हिमालयातील बळीप्रथेवरची कथा आहे, तर ‘जनानम’ही सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा प्रवास सांगणारी कथा आहे, तर ‘रिजक रोटी’ हा भारताच्या पारंपरिक संगीत परंपरेविषयीचा माहितीपट आहे, अशी माहिती चौरसिया यांनी दिली. 

सेतू रामलिंगम हे व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत, मात्र तारे नक्षत्र हा त्यांच्या आवडीचा विषय. लहानपणापासूनच त्यांना नक्षत्रे आणि तारे बघण्याची हौस आहे. पृथ्वीच्या पलीकडे अवकाशात काही आयुष्य असेल का, असेल तर ते कसे असेल, हा प्रश्न त्यांना सतत भेडसावत असतो. यातूनच त्यांनी ‘अमंग द स्टार्स’ हा अॅनिमेशनपट बनवला. यासाठी ते स्वतः अॅनिमेशनचे तंत्र आणि कला शिकले. या अनिमेशनपटाची नायिका, छोटी नक्षत्रा इंटरस्टेलर च्या माध्यमातून नव्या अनोळखी ग्रहावर प्रवास करते, मात्र हा प्रवास सुरु करण्याआधी ती पृथ्वीवर घालवलेल्या आपल्या सगळ्या काळाचे स्मरण करते. साक्षी सिंग यांचा ‘क्षण’हा लघुपट, मनोवैज्ञानिक मुलगी आणि तिचे वडील यांच्या नात्याच्या माध्यमातून मनोविकारांवर भाष्य करतो. विशेषतः, मध्यमवयीन पुरुषांना भेडसावणाऱ्या समस्येला चित्रपट वाचा फोडतो. कोविड महामारीच्या काळात लोकांना खूप मोठ्या मानसिक ताणतणावांचा सामना करावा लागतो आहे. त्याचं परिणाम नातेसंबंधांवरही होतो आहे. त्यामुळे सगळ्यांनी या प्रश्नावर मोकळेपणाने बोलायला हवं असा विचार या लघुपटातून मांडण्यात आला आहे, असं साक्षी सिंग यांनी सांगितले.


* * *

PIB MIFF Team | R.Aghor/Darshana/MIFF-22

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms / #FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवातचित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील.  ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829568) Visitor Counter : 178


Read this release in: English