महिला आणि बालविकास मंत्रालय
पंतप्रधानांनी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत लाभ जारी केले
गोव्यात सहा बालकांना पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन अंतर्गत मदतीचे वाटप
Posted On:
30 MAY 2022 6:52PM by PIB Mumbai
गोवा, 30 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लाभ जारी करण्यात आले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मंत्रिमंडळाचे इतर अनेक सदस्य, मुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुलांसाठी गेल्यावर्षी सुरू केलेल्या पी एम केअर्स योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यावेळी संवाद साधला.

गोव्यात कोरोना काळात अनाथ झालेल्या 6 बालकांना पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन अंतर्गत किटचे वाटप करण्यात आले. उत्तर गोव्यात आदिती कळंगूटकर हिला आरोग्य, नगर विकास आणि महिला व बालकल्याणमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते मदतीचे कीट सूपूर्द केले. तर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात 5 बालकांना (2 मुली, 3 मुले) यांना जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांच्या हस्ते मदत देण्यात आली. पीएम केअर्स किटमध्ये बालकांसाठी बँक पासबूक, आयुष्यमान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत हेल्थ कार्ड आहे.
कोरोनाचा फटका बसलेल्या या मुलांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा पीएमकेअर्स हा छोटा प्रयत्न आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनाथ मुलांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या कुटुंबातील सदस्यासारखा आधार देण्याची ग्वाही दिली असून या मुलांना आयुष्यात पुढे जाण्याचे आवाहन याप्रसंगी मान्यवरांनी केले.

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रनविषयी
11 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत कोविड-19 महामारीमुळे दोन्ही पालक किंवा कायदेशीर पालक/दत्तक पालक गमावलेल्या मुलांना आधार देण्यासाठी पंतप्रधानांनी 29 मे 2021 रोजी पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना सुरू केली होती. मुलांची सर्वसमावेशक काळजी आणि संरक्षण यासाठी शाश्वत पध्दतीने त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणे, शिक्षण आणि शिष्यवृत्तीद्वारे त्यांना सक्षम बनवणे, वयाची 23 वर्षे पूर्ण झाल्यावर 10 लाख रुपये आर्थिक सहाय्य पुरवून स्वयंपूर्ण अस्तित्वासाठी सुसज्ज बनवणे आणि आरोग्य विम्याद्वारे त्यांचे निरामय आरोग्य सुनिश्चित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. मुलांची नोंदणी करण्यासाठी pmcaresforchildren.in हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. पोर्टल ही सिंगल विंडो प्रणाली आहे जी मुलांसाठी मान्यता प्रक्रिया आणि इतर सर्व सहाय्य सुलभ करते.
SRT/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829546)
Visitor Counter : 199