महिला आणि बालविकास मंत्रालय
पंतप्रधानांनी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत लाभ जारी केले
"प्रत्येक देशवासीय अत्यंत संवेदनशीलतेसह तुमच्यासोबत आहे या वस्तुस्थितीचे पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजना हे प्रतिबिंब आहे" - पंतप्रधान
महाराष्ट्रातील मुलांनाही केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत लाभ जारी
Posted On:
30 MAY 2022 2:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई | 30 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लाभ जारी करण्यात आले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मंत्रिमंडळाचे इतर अनेक सदस्य, मुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुलांसाठी गेल्यावर्षी सुरू केलेल्या पी एम केअर्स योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यावेळी संवाद साधला.

कोरोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या मुलांना आयुष्यात भेडसावत असलेल्या अडचणींबद्दल पंतप्रधानांनी यावेळी सहानुभूती व्यक्त केली. “दररोज नवा संघर्ष, दररोज नवी आव्हाने, आज ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होत आहे, त्या आपल्यासोबत असलेल्या मुलांचे दुःख शब्दात मांडणे खूप कठीण आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. मी पंतप्रधान म्हणून नव्हे तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून बोलत असल्याचे ते म्हणाले.
अशा परिस्थितीत, “आई आणि वडील दोघांचेही छत्र गमावलेल्या अशा कोरोनाग्रस्त मुलांच्या अडचणी कमी करण्यासाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन हा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक देशवासीय अत्यंत संवेदनशीलतेसह तुमच्या पाठीशी आहे या वस्तुस्थितीचेही पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन हे एक प्रतिबिंब आहे " असे पंतप्रधान म्हणाले. जर कुणाला व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज हवे असेल तर त्यासाठी देखील पीएम-केअर्स मदत करेल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. इतर दैनंदिन गरजांसाठी अन्य योजनांद्वारे दरमहा 4 हजार रुपयांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. वयाच्या 23 व्या वर्षी 10 लाख रुपयांव्यतिरिक्त आयुष्मान कार्डद्वारे आरोग्य सुरक्षा आणि मानसिक आणि भावनिक मदतीसाठी संवाद हेल्पलाइनद्वारे भावनिक समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महामारीच्या सर्वात वेदनादायक परिणामांना इतक्या धैर्याने तोंड दिल्याबद्दल पंतप्रधानांनी मुलांना सलाम केला आणि सांगितले की पालकांच्या प्रेमाची भरपाई कशानेही होऊ शकत नाही. या कठीण काळात भारतमाता तुम्हा सर्व मुलांसोबत आहे. पीएम केअर फॉर चिल्ड्रेनच्या माध्यमातून देश आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.
केंद्र व राज्याच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्रातूनही, नागपूर, मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, चंद्रपूर, नाशिक जिल्ह्यात केंद्रीय मंत्र्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत बालकांना पीएम केअर्स योजनेसंदर्भातील दस्तऐवज देण्यात आले.
नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत, कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलामुलींना पीएम केअर्स योजने अंतर्गत प्रमाणपत्र देण्यात आले. या मुलांनी या योजनांचा लाभ घेत स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी केले.

नागपूरमध्ये 10 हजार मृत्यु करोनामुळे झाले, यात काही बालकांचे आई वडील सुद्धा मरण पावले. अशा अनाथ बालकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदार अंत:करणातून सुरु केलल्या पीएम केअर्स योजनेमुळे आरोग्य विमा, मासिक स्टायपेंड तसेच इतर अनेक लाभ यातून मिळणार असल्याने या संकटातून ही मुले बाहेर पडून पुन्हा नव्या उमेदीने आपले भविष्य घडवू शकतील असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी अनाथ मुलांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या कुटुंबातील सदस्यासारखा आधार देण्याची ग्वाही दिली असून या मुलांना आयुष्यात पुढे जाण्याचे आवाहन केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी केले. मुंबई शहरात, 18 मुलांना त्यांच्या पीएमकेयर्स साठीची पासबुके, पीएम-जेएवाय आरोग्य कार्ड, शिष्यवृत्ती यांच्यासह योजनेशी संबंधित कागदपत्रे आणि या मुलांना उद्देशून पंतप्रधानांनी लिहिलेले पत्र यांचा समावेश असलेली किट्स केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीही कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेल्या पाल्यांना मदतीचा हात देण्याच्या केंद्र सरकारच्या विशेष कार्यक्रमात चंद्रपूरहून प्रत्यक्ष सहभागी होत पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील 11 पाल्यांना या योजनेचा लाभ दिला.

कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 18 बालकांना लाभ आणि सेवा बाबतच्या किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये 18 वर्षा खालील 14 आणि 18 पुढील 4 अशा 18 अनाथ बालकांचा समावेश आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील रायगड येथून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सहभागी झाले आणि रायगड परिसरात कोविड महामारीमुळे पालक गमावलेल्या 9 अनाथ मुलांना त्यांनी मुलांसाठीच्या पीएम केयर्स लाभार्थी किट्सचे वाटप केले.

कोविड महामारीमुळे पालक गमावलेल्या रत्नागिरी येथील 26 अनाथ मुलांना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेच्या माध्यमातून लाभाचे वाटप केले.

MD/ST/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829406)
Visitor Counter : 180