माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन पटांसाठीच्या 17व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- मिफ्फ 2022 चे शानदार उद्घाटन
ज्येष्ठ माहितीपट निर्माते आणि सुप्रसिद्ध सिनेलेखक संजीत नार्वेकर यांना यंदाचा ‘डॉ व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
भारतात माहितीपट आणि अॅनिमेशनपट विकसित करण्याची प्रचंड क्षमता आणि कलागुण - पीयूष गोयल
‘माहितीपट हे विविध संस्कृती आणि सीमांच्या पलीकडे जाण्याचे, तसेच समाजपरिवर्तनाचे महत्वाचे साधन’ केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा महोत्सवात संदेश
भारतीय चित्रपटांना वैश्विक पातळीवर लोकप्रिय करण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु- राज्यमंत्री डॉ एल. मुरुगन
यंदाचा महोत्सव पहिल्यांदाच ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र स्वरुपात
Posted On:
29 MAY 2022 7:44PM by PIB Mumbai
मुंबई, 29 मे 2022
माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपटांच्या 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (MIFF-2022) आज, 29 मे, 2022 रोजी मुंबईतील नेहरू सेंटर, वरळी येथे रंगतदार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले.
डॉ व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ संजीत नार्वेकर यांना प्रदान
ज्येष्ठ माहितीपट निर्माते आणि सुप्रसिद्ध सिनेलेखक संजीत नार्वेकर यांना यंदाचा ‘डॉ व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार’, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. व्ही शांताराम यांचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते किरण शांताराम यावेळी उपस्थित होते. ज्यांच्या चित्रपटांचा अभ्यास करुन मी घडलो, ज्यांनी आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात मोठे बदल घडवले, त्या चित्रतपस्वी व्ही. शांताराम यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हा अत्यंत कृतज्ञतेचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया संजीत नार्वेकर यांनी व्यक्त केली.
संजीत नार्वेकर त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून सिनेसृष्टीत त्यांनी दिलेले योगदान, विशेषतः चित्रपटांचा इतिहास आणि माहितीपट निर्मिती चळवळीविषयी त्यांनी केलेल्या रंजक लिखाणाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांनी सिनेमा विषयाशी संबंधित 20 पेक्षा अधिक पुस्तकं लिहिली आणि संपादित केली आहेत. त्यांच्या “मराठी सिनेमा इन रेट्रॉस्पेक्ट’ सुवर्णकमळ पुरस्कारही मिळाला आहे.
माहितीपट आणि अॅनिमेशन उद्योग विकसित करण्याची भारतात प्रचंड क्षमता आणि कलागुण – पीयूष गोयल
भारतात अॅनिमेशन पटांचा उद्योग विकसित करण्याची प्रचंड क्षमता आहे, आपल्याकडे या क्षेत्रातले अनेक गुणवंत कलाकार आहे, त्यामुळे आपण भविष्यात या चित्रपट निर्मितीकडे लक्ष द्यायला हवे, यातून देशातल्या युवकांच्या कलागुणांना वाव मिळेल, तसेच मोठ्या रोजगारनिर्मितीलाही वाव मिळेल. असं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यावेळी म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी लता दीदी आणि व्ही शांताराम यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांच्या कथाकथनात प्रेक्षकांना मुख्य प्रवाहातील चित्रपटांइतकेच गुंतवून ठेवण्याची क्षमता आहे .माहितीपटांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याकडे काही प्रस्ताव आहेत आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी, त्यांना वाणिज्यिक आणि व्यापारी दृष्टीने चालना देण्याच्या दृष्टीने विविध मंत्रालयांना एकत्र आणून सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत, असं गोयल यांनी सांगितले.
माहितीपट – संस्कृती आणि सीमांच्या पलीकडे जाण्याचे साधन – अनुराग ठाकूर
“माहितीपटांचा प्रभाव मोठा असून समाजात बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणा देण्यासोबतच संस्कृती आणि सीमा ओलांडणारे ते एक साधन असल्याचे, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग ठाकूर यांनी महोत्सवादरम्यान एका व्हिडिओ संदेशात सांगितले. जगभरातील माहितीपट, लघुपट आणि ऍनिमेशनपट निर्मात्यांना परस्परांना भेटण्यासाठी, विचार जाणून घेण्यासाठी सहनिर्मिती, विपणन याबाबतच्या संधींची माहिती जाणून घेण्यासाठी आणि जागतिक चित्रपटांचा आवाका समजून आपला दृष्टिकोन अधिक व्यापक करण्याची संधी हा मंच पुरवत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी झाल्याबद्दल अनुराग ठाकूर यांनी पीयूष गोयल,इतर सर्व मंत्री आणि चित्रपट निर्माते शाजी करुण जी यांचे आभार मानले. काही कारणांनं या महोत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ एल. मुरुगन, यांनी आपल्या भाषणात, मराठीत उपस्थितांचे स्वागत करत प्रेक्षकांची दाद मिळवली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि डॉ आंबेडकर यांच्या या भूमीत हा महोत्सव होत असल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
भारतीय सिनेमा जागतिक पातळीवर लोकप्रिय करण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. कान चित्रपट महोत्सवात यंदा भारतीय सिनेमाचा विशेष गौरव झाल्याचं त्यांनी सांगितलं. शौनक सेन यांच्या ‘ऑल दॅट ब्रीदस’ या चित्रपटाला कानमध्ये सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार मिळाल्याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे, असे ते म्हणाले, भारतात चित्रपट निर्मिती करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते, माहितीपट, अॅनिमेशन पट निर्माते, वेबसिरिज निर्माते यांच्यासाठी असलेल्या विशेष सवलती आणि योजनांची त्यांनी माहिती दिली. सिनेमा निर्मिती अधिक सुलभ करण्याचं आपला प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.
मिफ्फ, आशियातील सर्वात जुना नॉन फिचर चित्रपट महोत्सव असून या महोत्सवाने चित्रपटप्रेमींसाठी भारतातील गावे आणि शहरांसोबतच जगभरातल्या विविध भागातल्या चित्रपटकलेची उत्कृष्टता सादर केली आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पंचायत राज राज्यमंत्री, कपिल मोरेश्वर पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड हे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. मुंबई ही चित्रपटसृष्टीची राजधानी आहे, असं राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. सिनेमा हे समाजातल्या सर्व स्तरातील लोकांचं प्रतिनिधित्व करणारं प्रभावी माध्यम आहे, असं ते म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि डॉ. भागवत कराड यांनीही महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. चित्रपटातून मिळणारा संदेश समाजासाठी महत्वाचा असतो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
ज्यूरी सदस्यांचा सत्कार :
सतराव्या मिफ्फच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटांसाठी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या सर्व मान्यवर ज्यूरी सदस्यांचा यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धा स्तरावरील चित्रपट परीक्षकांमध्ये भारत आणि परदेशातील नामवंत व्यक्तींचा समावेश आहे.आंतरराष्ट्रीय परीक्षक सदस्यांमध्ये एस. नालामुथू, अनंत विजय, मीना रॅड (फ्रान्स),जॉन पिएर सेरा (फ्रान्स),डॅन वॉलमन (इस्राएल) यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय परीक्षक सदस्यांमध्ये संजीत नार्वेकर (भारत), सुभाष सेहगल (भारत), जयश्री भट्टाचार्य (भारत),अॅश्ली रतनविभूषण तारीक एहमद (बांग्लादेश) यांचा समावेश असून सर्व परीक्षकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
मिफ्फ महोत्सवात स्पर्धा श्रेणीतल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाला दहा लाख रुपयांचे रोख पारितोषिक
सतरावा मिफ्फ अनेक अर्थांनी विशेष ठरणार आहे. या महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात, 119 चित्रपट दाखवले जातील, तसेच स्पर्धा क्षेत्रांत, 264 चित्रपट दाखवले जातील. महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणजे सुवर्ण शंख आणि 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल, हा पुरस्कार आशियाई क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक आहे, तर इतर पुरस्कारांमध्ये रौप्य शंख, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रांसह एक लाख ते पाच लाखांपर्यंतची रोख बक्षिसे यांचा समावेश आहे. याशिवाय मिफ्फ मध्ये सर्वोत्कृष्ट छायांकन, संपादन आणि ध्वनी डिझाइन श्रेणीतले पुरस्कारही दिले जाणार आहेत. यंदा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ‘India@75’.या संकल्पनेवर आधारित लघुपटाला विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
या मिफ्फ मध्येही, विशेष पॅकेजेस, रेट्रोस्पेक्टिव्ह, होमेज, बी-टू-बी, मास्टर क्लासेस यांच्यासह विविध कार्यशाळाही आयोजित केल्या जातील.
हा महोत्सव पहिल्यांदाच ऑनलाइन स्वरूपात सादर होत असून ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र स्वरूपात रसिकांना त्याचा आनंद घेता येईल. चित्रपट प्रेमींना स्पर्धा आणि प्रिझम श्रेणीतले चित्रपट त्यांच्या वैयक्तिक संगणकांवर पाहता येतील ऑनलाइन नोंदणी सर्वांसाठी विनाशुल्क आहे.
18 वर्षांखालील मुलांनाही विनाशुल्क नोंदणी करता येईल. महोत्सव सुरु असेपर्यंत नोंदणी सुरू असेल . https://miff.in/. या संकेतस्थळावर वॉक-इन नोंदणी उपलब्ध. आहे.
या वर्षी प्रथमच लहान मुले मुंबई अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असणार आहेत.
नेटफ्लिक्सची मूळ मालिका "मायटी लिटल भीम: आय लव्ह ताजमहाल" च्या भागाचा मिफ्फ 2022 मध्ये वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI )द्वारे पुनरुज्जीवित सत्यजित रे यांच्या 'सुकुमार रे' माहितीपटाचे विशेष प्रदर्शनही ह्या महोत्सवात होईल.
भारत आणि जपान यांनी एकत्रितपणे तयार केलेल्या 'रामायण: द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा' या पहिल्या अॅनिमेशन चित्रपटाचे मिफ्फ मधे विशेष सादरीकरण होणार आहे. हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित होऊन यंदा 30 वर्षे पूर्ण होत आहेत.
मिफ्फ महोत्सवात बांग्लादेशची ‘‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणून निवड, समीक्षकांनी गौरवलेल्या ‘हसीना-अ डॉटर्स टेल’ या चित्रपटाचाही या पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे.
ऑस्करच्या धर्तीवर या महोत्सवातही विशेष चित्रपट पॅकेजेस तयार करण्यात आली असून त्यात इटली आणि जपानमधील विशेष चित्रपट पॅकेज, इफ्फीच्या अलीकडील महोत्सवांमधील इंडियन पॅनोरमा यांचा समावेश आहे आणि हे खास चित्रपटांचे विभाग रसिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतील.
याबरोबरच म्यानमारमधील विद्यार्थ्यांचे अॅनिमेशन माहितीपट आणि ब्राझीलमधील विद्यार्थ्यांचे अॅनिमेशन चित्रपट या महोत्सवातील खास मेजवानी असेल.
मणिपूर, जपान आणि फ्रान्समधील चित्रपटांनी 17 व्या मिफ्फ महोत्सवाचा प्रारंभ
मणिपुरी माहितीपट 'मीरम- द फायरलाईन' (33 मिनिटे ), फ्रान्सचा अँनिमेशनपट 'कास्टअवे' (6 मिनिटे) आणि जपानचा, 'शाबु शाबु स्पिरिट' (10 मिनिटे )हा लघुपट यांनी महोत्सवाची सुरुवात झाली. यंदाच्या महोत्सवात जगभरातील 400 चित्रपट आहेत. चित्रपट महोत्सवासाठी प्रवेशिकांची सुरुवात फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झाली. यंदाच्या महोत्सवासाठी पात्र चित्रपट प्रक्रिया 1 सप्टेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत करण्यात आली.
मिफ्फचा उद्घाटन समारंभ पीआयबी इंडिया यू ट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आले.
महोत्सवाविषयी माहिती..
मुंबईतील पेडर रोड येथील चित्रपट विभागाच्या संकुलात 04 जून 2022 पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. महोत्सव यंदा हायब्रीड मोड म्हणजे मिश्र स्वरुपात होत असून ऑनलाइन पद्धतीने सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. (येथे नोंदणी करा https://miff.in/). युवा पिढीच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, प्रतिनिधी नोंदणी शुल्क रु. 300/- सर्व विद्यार्थ्यांसाठी माफ आहे.
1990 मध्ये सुरू झालेल्या या द्वैवार्षिक महोत्सवाचे आयोजन चित्रपट विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, करते. मिफ्फ, दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि प्रसिद्ध चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. माहितीपट, लघुपट आणि ऍनिमेशनपट या फारसा वाव न मिळणाऱ्या नॉन फिचर पटांना प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाची सुरुवात झाली.
* * *
PIB MIFF Team | JPS/Radhika/Sonali/Bhakti/Jai/Tushar/Darshana/MIFF-16
चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms / #FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !
|
#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?
|
जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.
|
कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर बघता येतील.
|
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829264)
Visitor Counter : 263