पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ख्रिश्चन कलेच्या सुधारित संग्रहालयाचे उद्‌घाटन


संग्रहालयात मांडलेल्या वस्तू म्हणजे इंडो-युरोपीय सांस्कृतिक मिलाफाचे उत्कृष्ट उदाहरण- श्रीपाद नाईक

Posted On: 23 MAY 2022 10:31PM by PIB Mumbai

पणजी, 23 मे 2022

कॉन्व्हेंट ऑफ सांता मोनिका, ओल्ड गोवा येथे ख्रिश्चन कलेच्या सुधारित संग्रहालयाचे आज केंद्रीय पर्यटन तथा बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी निलेश काब्राल, सार्वजनिक कार्य मंत्री (गोवा सरकार),  पोर्तुगालचे भारतातील राजदूत डॉ.कार्लोस परेरा मार्किस, गोवा आणि दमणचे आर्चबिशप फिलिप नेरी फेराओ यावेळी उपस्थित होते.

मौल्यवान आणि अद्वितीय अशा कलावस्तू जपणारे ख्रिश्चन कला संग्रहालय म्हणजे एकमेवाद्वितीय कलाकारीचे उत्कृष्ट उदाहरण असून, भारतीय आणि युरोपीय संस्कृतींचा अचूक संगम आहे, असे उदगार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी काढले.

आज ज्या कलाप्रकाराला इंडो-पोर्तुगीज म्हणून ओळखले जाते, तो खरे म्हणजे अत्यंत कुशल अशा स्थानिक कलाकारांनी गेल्या काही शतकांपासून निर्माण केलेला ठेवा आहे. त्यांनी चर्च आणि कॉन्व्हेंटच्या वास्तूंमध्ये लागणारे लाकूडसामान तयार करताना कळत-नकळत त्यांच्या स्वतःच्या भारतीय कलाशैलीचा अमीट ठसा त्यावर उमटवून, त्या वस्तूंना एक अनोखे भारतीय रूप दिले, असे श्रीपाद नाईक म्हणाले. यावेळी, 'One Hundred Iconic Art Objects from The Museum of Christian Art' (ख्रिश्चन कला संग्रहालयातील शंभर विलक्षण देखण्या कलावस्तू) नावाचे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून मिळालेल्या निधीतून हे संग्रहालयातील सुधारणांचे काम करण्यात आले आहे. केंद्रीय संकसृतिक व्यवहार मंत्रालयाने कालुस्ते गुलबेनकिअन फाउंडेशन आणि  INTACH अर्थात भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा न्यास यांच्या सहयोगाने 2017-20 या काळात संग्रहालयातील सुधारणांचे मोठे काम हाती घेतले. संग्रहालयशास्त्रातील सध्याचे जागतिक मापदंड लक्षात घेऊन संग्रहालयाला भेट देण्यासाठी येणाऱ्यांच्या अनुभवाची उंची वाढविण्याच्या उद्देशाने हे काम करण्यात आले आहे.

S.Patil/J.Waishampayan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 1827782) Visitor Counter : 167


Read this release in: English