पर्यटन मंत्रालय
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शैक्षणिक मेळाव्याचे उद्घाटन
Posted On:
22 MAY 2022 2:31PM by PIB Mumbai
पणजी, 22 मे 2022
केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज पणजी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शैक्षणिक मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. स्टडी ग्लोबल या संस्थेने आयोजित केलेले हा दुसरा शैक्षणिक मेळावा आहे.
श्रीपाद नाईक यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यामुळे गोव्यातील विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांची माहिती मिळेल. याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ होईल. गोवा सरकार परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्याजरहीत कर्जपुरवठा करत असल्याचे ते म्हणाले. याविषयी अधिक माहिती https://www.goa.gov.in/wp-content/uploads/2020/12/Interest-Free-Education-Loan-Scheme-.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सरकारने नवीन शैक्षणिक धोरण लागू आणले आहे. यामुळे आपली शैक्षणिक व्यवस्था बळकट होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी विविध संधी या माध्यमातून उपलब्ध होतील, असे श्रीपाद नाईक म्हणाले.
श्रीपाद नाईक यांनी कोविड महामारी काळात शैक्षणिक क्षेत्राने ऑनलाईन शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. आपले शैक्षणिक क्षेत्र जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी आपल्याला आपल्या अध्यन-अध्यापन प्रक्रियेची निरंतर पुनर्व्याख्या आणि पुनर्रचना करावी लागेल, असे ते म्हणाले.

अंग्लिया रस्किन युनिव्हर्सिटी (यूके), डी मॉन्टफोर्ट युनिव्हर्सिटी (यूके), बर्लिन स्कूल ऑफ बिझनेस अँड इनोव्हेशन (जर्मनी), एक्सेलिया ला रोशेल (फ्रान्स), एमएएचई (दुबई), हॉटेल आणि पर्यटन व्यवस्थापन संस्था (स्वित्झर्लंड), गॅनॉन युनिव्हर्सिटी (यूएसए), बीएचएमएस (स्वित्झर्लंड), युनिव्हर्सिटी ऑफ फिन्डले (यूएसए), नॉर्थहॅम्प्टन युनिव्हर्सिटी (यूके), युनिव्हर्सिटी ऑफ रोहॅम्प्टन (यूके), बीपीपी युनिव्हर्सिटी (यूके), ओरेगॉन युनिव्हर्सिटी आणि अरिझोना युनिव्हर्सिटी या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी या शैक्षणिक मेळाव्यात सहभाग घेतला.
* * *
PIB Panaji | S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1827382)
Visitor Counter : 202