माहिती आणि प्रसारण मंत्रालय

परदेशी चित्रपटांच्या भारतातल्या चित्रीकरणाला मिळाली चालना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषित केली महत्वपूर्ण प्रमाणित कार्यप्रणाली


अनुराग ठाकूर यांच्या हस्ते कान चित्रपट महोत्सवातल्या भारतीय दालनाचे उद्‌घाटन

गोवा इथं होणाऱ्या 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) पोस्टरचे केले अनावरण

Posted On: 18 MAY 2022 6:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई, 18 मे 2022

 

भारतात परदेशी चित्रपटांचं चित्रीकरण आणि सह निर्मिती ला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री  अनुराग ठाकूर यांनी दोन नवीन योजनांची घोषणा केल्याने भारतात परदेशी चित्रपटांच्या चित्रीकरणाला  आज नवी चालना मिळाली.

या दोन योजना अशा आहेत.

  • भारतात चित्रपटांच्या दृक श्राव्य सह निर्मिती साठी प्रोत्साहन योजना
  • भारतात परदेशी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी प्रोत्साहन योजना

याद्वारे  भारतीय माध्यमं  आणि मनोरंजन उद्योगाची क्षमता सिद्ध  करण्याचा उद्देश  आहे.

सध्या फ्रांस मध्ये सुरु असलेल्या कान चित्रपट महोत्सवातल्या भारतीय दालनाचे उद्‌घाटन केल्यानंतर मंत्र्यांनी या योजना घोषित केल्या.

या प्रोत्साहन योजनांच्या  पैलूंबद्दल माहिती देताना श्री ठाकूर यांनी सांगितले की, चित्रपटांच्या अधिकृत सह-निर्मितीसाठी, आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती कंपन्या भारतातील पात्रता  खर्चाच्या 30% पर्यंत परतावा मागू   शकतात याची कमाल मर्यादा  2 कोटी रुपये इतकी असेल.

भारतात चित्रीकरण  करणाऱ्या परदेशी चित्रपटांनी भारतातल्या  15% किंवा त्याहून अधिक मनुष्यबळाचा वापर  केल्यास त्यांना अतिरिक्त परतावा  म्हणून कमाल  50 लाख  रुपये (USD 65,000) पर्यंत अतिरिक्त 5% बोनस मिळू शकतो.

या योजना भारतासोबत जागतिक सहकार्याला चालना देतील आणि परदेशी चित्रपट निर्मात्यांकडून भारतात गुंतवणूक आकर्षित करतील. त्याचप्रमाणे  भारताला चित्रीकरणाचे केंद्र  म्हणून उदयाला येण्यासाठी  सहाय्य करतील , असं  मंत्री म्हणाले.

भारतीय चित्रपटसृष्टीची  खोलवर रुजलेली  सामाजिक पाळंमुळं   स्पष्ट करताना  अनुराग ठाकूर म्हणाले की, "भारतीय चित्रपटासृष्टीने सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्ट्या  महत्त्वाच्या विषयांना संवेदनशीलतेने हाताळून  आपल्यातील  सर्जनशीलता, उत्कृष्टता आणि अभिनवता विकसित केली आहे. भारतीय संस्कृतीत आपली पाळंमुळं घट्ट रोवलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीने एक वैश्विक ओळख प्राप्त करण्याच्या दिशेनं  स्वतःचा विस्तार केला आहे. आणि आपल्या जुन्या मूल्यांचे  जतन करताना, भारतीय चित्रपट निर्माते तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे कथाकथनाच्या कलेमध्ये नवनवीन शोध घेत आहेत,

भारतीय चित्रपटांचे मोठ्या प्रमाणावर जतन आणि संवर्धन केले जात असून केंद्र सरकारने राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत जगातील सर्वात मोठा चित्रपट जतन प्रकल्प हाती घेतला आहे आणि या मोहिमेचा एक भाग म्हणून, विविध भाषा आणि शैलींमधील 2200 चित्रपटांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळवून दिले जाईल.

शेखर कपूर, ए आर रहमान, दीपिका पदुकोण, आर माधवन, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि प्रसून जोशी या प्रसिद्ध कलाकारांसमवेत केंद्रीय मंत्री  अनुराग ठाकूर यांनी इंडिया पॅव्हेलियन येथे 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अधिकृत पोस्टरचे अनावरण केले.

यावेळी राजस्थानी लोककलाकार मामे खान, माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव अपूर्व चंद्रा आणि फ्रान्समधील भारताचे राजदूत जावेद अश्रफ हे देखील उपस्थित होते.

 

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1826423

S.Thakur/S.Tupe/B.Sontakke/S.Kane/PM

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1826436) Visitor Counter : 140


Read this release in: English