सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
“उमेद जागर” या उपजीविका-आधारित कौशल्य प्रशिक्षणाद्वारे कोविड प्रभावित महिलांचे सक्षमीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे "नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे व्हावे" ही गोष्ट उमेद जागर कार्यक्रमामुळे वास्तवात येत आहे - डॉ. वीरेंद्र कुमार, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री
Posted On:
06 MAY 2022 5:01PM by PIB Mumbai
पुणे, 6 मे 2022
उमेद जागर या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांतर्गत उपजीविका आधारित कौशल्य प्रशिक्षणाद्वारे कुटुंबाचा आधार गमावलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने एक उत्तम पुढाकार घेतला आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी व्यक्त केले.
उमेद जागर या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांतर्गत उपजीविका आधारित कौशल्य प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते आज पुण्यात प्रमाणपत्र देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या महिलांनी आपले कौशल्य केवळ स्वयंरोजगारापुरतेच मर्यादित न ठेवता इतरांनाही रोजगार दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे "नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे व्हावे" ही गोष्ट वास्तवात आलेली दिसते, असे ते म्हणाले.
सिम्बॉयसीस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठ, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोनामुळे ज्यांच्या पतीचे निधन झाले आहे अशा कोरोना प्रभावित महिलांना 'उमेद जागर' कार्यक्रमाअंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत 150 हून अधिक महिलांना टेलरिंग, सौंदर्य तसेच निरोगीपणा आणि हर्बल उत्पादने बनवणे यासारख्या व्यवसायांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे त्या स्वावलंबी झाल्या आहेत आणि त्यांना आपले जीवन आत्मविश्वासाने आणि सन्मानाने जगण्यासाठी मदत होत आहे.
सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी हे महाराष्ट्रातील पहिले कौशल्य विकास विद्यापीठ आहे, ज्याची स्थापना सर्व वयोगटातील आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील तरुणांना रोजगारक्षम आणि स्वयंरोजगार करण्यायोग्य बनविण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. या विद्यापीठाने आपल्या कम्युनिटी कॉलेजच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये वाढवण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी मदत केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोविडमुळे पती गमावलेल्या महिलांना आधार देण्यासाठी ‘उमेद जागर’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत, पीसीएमसी मधील या महिलांना मोफत कौशल्य कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला अजय चाकणकर, उपायुक्त, नागरवस्ती प्रकल्प, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, डॉ. एस बी मुजुमदार, कुलपती, (एस.एस.पी.यू), डॉ. स्वाती मुजुमदार, प्रो-चान्सलर, (एस.एस.पी.यू ), आणि डॉ. अश्विनी कुमार शर्मा, कुलगुरू, (एस.एस.पी.यू ) हे देखील उपस्थित होते.
* * *
PIB Pune | S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1823262)
Visitor Counter : 168