माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सत्यजित रे चित्रपट महोत्सवाला देशभरात प्रारंभ
भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयालयातील सत्यजित रे दालनाचे श्याम बेनेगल यांच्या हस्ते उद्घाटन
या दालनात रे यांचे चित्रपट, पुस्तके आणि पोस्टर्स पाहायला मिळतील
Posted On:
02 MAY 2022 6:50PM by PIB Mumbai
मुंबई, 2 मे 2022
ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांनी आज मुंबईतील राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालय (NMIC) येथे सत्यजित रे यांच्या दालनाचे उद्घाटन केले आणि देशभरात तीन दिवसीय सत्यजित रे चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ झाला. या महोत्सवाचा एक भाग म्हणून, 'सत्यजित रे' यांनी बनवलेले आणि त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 2, 3 आणि 4 मे 2022 रोजी मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि पुणे येथे प्रदर्शित केले जात आहेत. सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या महोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे.
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, फिल्म्स डिव्हिजन , राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि दूरदर्शन यांच्या सहकार्याने तसेच पश्चिम बंगाल सरकार आणि अरोरा फिल्म कॉर्पोरेशन अँड फ्रेंडस कम्युनिकेशन यांच्या मदतीने हा चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे.
मला नाही वाटत की सत्यजित रे यांच्यासारखा कोणी यापूर्वी किंवा यानंतर असू शकेल : श्याम बेनेगल
प्रदर्शनाचे उद्घाटन करताना बेनेगल म्हणाले की, “प्रदर्शन अतिशय उत्तम प्रकारे आयोजित केले आहे आणि मला याची रचना अप्रतिम वाटली. प्रदर्शनाला भेट देणाऱ्याला रे हे कोणत्या प्रकारचे चित्रपट निर्माता होते याची कल्पना येईल.” प्रदर्शनाच्या माध्यमातून या प्रतिभावंतांच्या अनेक कलागुणांच्या चित्रणाची प्रशंसा करताना ते म्हणाले की, "ते केवळ एक चित्रपट निर्माता नव्हते, तर एक बहुआयामी प्रतिभावंत , ज्यांनी स्वतः पोस्टर्स, स्टोरी -बोर्ड, अगदी आपल्या चित्रपटांची शीर्षके देखील बनवली होती."
श्याम बेनेगल स्वतः ज्यांचे प्रशंसक आहेत आणि चित्रपट जगतासाठी प्रेरणास्थान आहेत अशा रे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “रे यांच्यामुळेच भारतीय सिनेमाला सर्वजण ओळखतात . जगात असा कोणी नाही ज्याला रे कोण हे माहीत नाही. तुम्ही कोणत्याही पश्चिम आफ्रिकन देशातही त्याचे नाव घ्या - ते त्यांना चांगले ओळखतील.”
सत्यजित रे दालनात त्यांचे चित्रपट, त्यांची पुस्तके आणि त्यांची चित्रे
इथे रे यांच्या कलाकृतीबाबत परस्परसंवादातून माहिती मिळतेच शिवाय त्यांच्या चित्रपटांमधील अनेक दृश्यांची प्रत्यक्ष झलक पाहायला मिळेल. या चित्रपट निर्मात्याबाबत संपूर्ण माहिती मिळवण्याबरोबरच, चित्रपटांमध्ये अभिजात साहित्याचा वापर करून, त्यांनी स्वत:ला कसे एक लेखक म्हणून स्थापित केले हे कौतुकास्पद आहे. या प्रदर्शनात त्यांचे चित्रपट, पुस्तके आणि चित्रकार म्हणून चमकदार कारकीर्दही सुंदररित्या मांडण्यात आली आहे.
रे यांनी त्यांच्या गुपी गायन बाघा बायन या चित्रपटात एक सायकेडेलिक घोस्ट - डान्स चित्रित केला आणि तुम्हाला ही भुते हवेत गुपी बाघाच्या जगाच्या शिखरावर तरंगताना दिसतात, जो तांत्रिक आणि कलात्मक चमत्कार तसेच राजकीय विडंबन आहे.
हे प्रदर्शन ३० वर्षांपूर्वी आपल्याला सोडून गेलेले रे म्हणजेच ‘माणिक दा’ यांचा नव्याने शोध घेण्यास मदत करते.
प्रदर्शनात प्रवेश करताच, कॅमेर्यातून जगाकडे भेदक नजरेने पाहण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मुद्रेतील रे यांचा पुतळा अभ्यागतांचे स्वागत करतो.
दिग्दर्शक अनिक दत्ता यांचा अपराजितो हा चित्रपट ज्याचा आज भारतीय प्रीमियर झाला तो महोत्सवाचा शुभारंभ चित्रपट होता. हा चित्रपट सत्यजित रे यांना दिलेली श्रद्धांजली आहे. हा चित्रपट ‘पाथेर पांचाली’ हा त्यांचा पहिला चित्रपट बनवताना दिग्गजांच्या उल्लेखनीय प्रयत्नांचे चित्रण करतो, जो प्रत्यक्षात बिभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या त्याच नावाच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे. या स्क्रिनिंगला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
135 मिनिटांच्या बंगाली चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर, दिग्दर्शक अनिक दत्ता, अभिनेता जीतू कमल यांच्यासह कलाकार आणि सहाय्यकांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.
Schedule of Film Festival
* * *
PIB Mumbai | S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1822089)
Visitor Counter : 210