युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
बंगळुरू इथे सुरु असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत मल्लखांबने क्रीडारसिकांचे लक्ष वेधून घेतले
मुंबई आणि पुणे विद्यापीठाच्या खेळाडूंनी पुरुष आणि महिला सांघिक स्पर्धेत पटकावले सुवर्ण आणि रौप्य पदक
Posted On:
27 APR 2022 5:02PM by PIB Mumbai
मुंबई/बंगळुरू, 27 एप्रिल 2022
चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलीवूडशी असलेले नाते आणि त्यासोबत येणारे ग्लॅमर यामुळे मुंबईचे वर्णन अनेकदा स्वप्ननगरी म्हणून केले जाते. खेळाच्या बाबतीत, क्रिकेट म्हणजे प्रत्येक मुंबईकराचा श्वास असतो. सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांमुळेही हे शहर क्रिकेटशी कायम जोडले गेले आहे.
मात्र, बेंगळुरू इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2021 मध्ये, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मल्लखांब खेळाडूंनी पुरुष आणि महिला दोन्ही गटात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकून या क्रीडाप्रकारात देखील आपला झेंडा रोवला आहे.
आज स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मुंबई विद्यापीठाने एकूण 86.45 गुणांसह महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकली, तर पुणे विद्यापीठाच्या संघाने 82.95 गुणांसह दुसरे स्थान पटकावले. कांस्यपदक उज्जैनच्या विक्रम विद्यापीठ संघाला मिळाले.

इतकेच नाही, तर पुरुष गटातही मुंबई विद्यापीठाने सांघिक विजेतेपद पटकावत सुवर्ण, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं रौप्यपदक मिळवले. झाशीच्या बुंदेलखंड विद्यापीठाने कांस्यपदक जिंकले.

मुंबई विद्यापीठाचा अजिंक्य मल्लखांबपटू दीपक शिंदे याने याधीही, मुलांच्या ऑल राऊंड (अष्टपैलू) वैयक्तिक अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत भाग घेतला होता आणि पोलमध्ये 9.6, रोपमध्ये 8.7 आणि हँगिंगमध्ये 9 गुणांसह एकूण 27.30 गुण मिळवले आणि या स्पर्धेत तो अव्वल खेळाडू ठरला आहे.

एम कॉम ला शिकत असलेल्या या 25 वर्षीय खेळाडूने आपल्या नेत्रदीपक कामगिरीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले, “खेलो इंडिया, हा मल्लखांब खेळाडूंसाठी सर्वात मोठा क्रीडा मंच ठरला आहे. तसेच स्पर्धा गटात मल्लखांबचा समावेश केल्याबद्दल त्याने, सरकारचे आभार मानले.” एका सर्वसामान्य कुटुंबातला युवक असलेल्या दीपकने खेळात करियर करण्याची प्रेरणा आपल्या भावाकडून घेतली. आता हे दोन्ही भाऊ, एक क्रीडा प्रशिक्षण आणि फिटनेस केंद्र चालवतात. तिथे ते उदयोन्मुख खेळाडूंना प्रशिक्षण देतात. सरकारच्या पाठिंब्यामुळे, मल्लखांब आज सगळीकडे लोकप्रिय होत आहे. केवळ मुंबईतच आजच्या घडीला, 30 ते 40 मल्लखांब क्लब आहेत, काही वर्षांपूर्वी ही संख्या केवळ पाच ते सहा इतकी होती, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राशी मल्लखांबचे अतूट नाते आहे. बाळभट्ट दादा देवधर, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे क्रीडा आणि व्यायाम प्रशिक्षक होते, त्यांनीच अठराव्या शतकात पेशव्यांच्या सैन्यासाठी प्रशिक्षण पद्धती म्हणून या क्रीडाप्रकाराचे पुनरुज्जीवन केले. त्यामुळे, महाराष्ट्रातून आतापर्यंत काही उत्कृष्ट मल्लखांब खेळाडू उदयास आले आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
या शारीरिक तंदुरुस्तीवर आधारित स्वदेशी खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मान्यता मिळत आहे. 2019 मध्ये, पहिली मल्लखांब जागतिक अजिंक्यपद स्पर्धा मुंबईत आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये 17 देशांनी भाग घेतला होता. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत केवळ आशियाई देशांचेच नव्हे तर युरोपीय देशांचेही खेळाडू सहभागी झाले होते, यातून ह्या खेळाचा जगभर प्रसार होत असल्याचेच दिसत आहे.
* * *
PIB Mumbai | S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1820534)
Visitor Counter : 222