अल्पसंख्यांक मंत्रालय
मुंबईतील 40 व्या हुनर हाटचा भव्य सांगता सोहळा
सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत आणि लेझर लाइट्स शो हे भव्य समारोप सोहोळ्याचे आकर्षण
Posted On:
26 APR 2022 9:57PM by PIB Mumbai
मुंबई, 26 एप्रिल 2022
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज सांगितले की, 40 वा हुनर हाट देशातील लोप पावत चाललेल्या पारंपरिक कलांचे प्रदर्शन करण्याचे व्यासपीठ बनले आहे. मुंबईतील 40 व्या "हुनर हाट" च्या औपचारिक समारोप समारंभाला संबोधित करताना, नक्वी म्हणाले, 'सर्कस असो किंवा पारंपारिक हस्तकला, हातमाग, आम्ही देशाच्या विविध भागांतील कलाकारांना एकत्र आणण्यात यशस्वी झालो आहोत. मुंबईतील वांद्रे -कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत आणि लेझर लाइट शो हे या भव्य समारोप सोहोळ्याचे आकर्षण होते.
भव्य सोहोळ्याचा एक भाग म्हणून "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर" विविध सांस्कृतिक संगीत कार्यक्रम आणि लेझर लाइट शोचे आयोजन करण्यात आले होते.
पंकज उधास, अन्नू कपूर, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड, तलत अजीज, अल्ताफ राजा, शब्बीर कुमार, शैलेंद्र सिंग, साधना सरगम, दिलबाग सिंग, नूरन भगिनी, एहसान कुरेशी, भूपिंदर सिंग , साबरी बंधू, कविता पौडवाल, रेखा राज, ज्युनियर मेहमूद आणि देशातील अन्य नामवंत कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
या कलाकारांनी देशभरात आयोजित केलेल्या वेगवेगळ्या “हुनर हाट” मध्ये सादरीकरण केले आहे. या कलाकारांचे सांस्कृतिक आणि सांगीतिक कार्यक्रम यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रदर्शित केले जातात जे लाखो लोक थेट पाहतात.
"हुनर हाट" च्या यशस्वी आणि गौरवशाली प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे माजी आणि आजी वरिष्ठ अधिकारी आणि नामवंत कलाकारांचा औपचारिक सांगता समारंभात सत्कार करण्यात आला.
अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे माजी सचिव राकेश गर्ग, अमेझिंग लुइखम, शैलेश आणि पी.के. दास; मंत्रालयाचे माजी अतिरिक्त सचिव आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सचिव एस.के. देव वर्मन, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या सहसचिव निगार फातिमा साहिबा, निरुपमा कोटरु, सी.पी.एस. बक्षी आणि श्रीनिवास दंडा, मंत्रालयातील माजी सहसचिव राखी गुप्ता भंडारी आणि मनोज कुमार सेठी, राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाचे माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक शाहबाज अली, मंत्रालयाचे माजी संचालक पी. के. ठाकूर आणि इतरांचा सत्कार करण्यात आला.
हुनर हाट उद्या 27 एप्रिल 2022 पर्यंत जनतेसाठी खुले आहे.
* * *
PIB Mumbai | S.Kakade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1820312)
Visitor Counter : 121