रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज धुळे येथे 1791कोटी रुपये खर्चाच्या 261 किमी लांबी असलेल्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण / पायाभरणी


धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी आणि रोजगारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध - नितीन गडकरी

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता बनला पाहिजे यादृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील - नितीन गडकरी

Posted On: 22 APR 2022 3:57PM by PIB Mumbai

मुंबई - धुळे दि. 22 एप्रिल 2022

 

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी आणि रोजगारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

खानदेशातील महत्वाच्या  धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, आज धुळे येथे 1791 कोटी रुपयांच्या  261  किमी लांबीच्या दोन  राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण / पायाभरणी गडकरी यांच्या हस्ते आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. आगामी तीन ते चार वर्षात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील  रस्त्यांची  कामे पूर्ण होऊन हे रस्ते जागतिक दर्जाचे होतील असा विश्वास  गडकरी यांनी व्यक्त केला.

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर गरीबी दूर करणे आवश्यक आहे, यासाठी धुळे आणि नंदुरबार सारख्या देशातील मागास भागांचा विकास करावा लागेल  यादृष्टीने या भागात पाणी, रस्ते, दळणवळण , वीज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, यामुळे गुंतवणूक वाढून उद्योग येतील परिणामी बेरोजगारी आणि गरीबी दूर  होण्यास मदत होईल आणि या भागात विकासाचे  चित्र दिसेल असे गडकरी यांनी सांगितले.

जिल्ह्यांच्या विकासात लॉजिस्टिक पार्क मोठी भूमिका बजावतात असे सांगत नंदुरबारमध्ये रस्त्याच्या बाजूला ज्या जागा उपलब्ध असतील त्या महाराष्ट्र सरकारकडून घेऊन  लॉजिस्टक पार्क बनवण्यासाठी प्रस्ताव द्या  अशी  सूचना  त्यांनी लोकप्रतिनिधींना केली आणि   यासाठी  आवश्यक निधी पुरवला जाईल  असे ते म्हणाले

राष्ट्रीय महामार्गांवर शौचालयासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच देशभरात  650 ठिकाणी अन्य सोयी सुविधा रस्त्याच्या शेजारी उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले. पथकर नाक्यांऐवजी आता पथकरासाठी जीपीएस  यंत्रणा सुरु करणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. रस्ते बांधत असतानाच  नदी नाले खोलीकरण करून, त्यातील गाळ काढून त्याचप्रमाणे नवे जलस्रोत निर्माण करून  जलसंवर्धनाचे काम करण्याच्या सूचनाही  गडकरी यांनी यावेळी केल्या.

 

या कार्यक्रमाला  खासदार सुभाष भामरे , खासदार हीना गावीत यांच्यासह स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते

महाराष्ट्रात धुळे येथील 48.6 किमी लांबीच्या आणि  509.18 कोटी रुपये खर्चाच्या  राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण गडकरी यांनी केले यासोबतच 145.3 किलोमीटर लांबीच्या 1282.28 कोटी रुपये खर्चाच्या सात प्रकल्पांची पायाभरणी  त्यांनी  केली.  प्रकल्पांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

प्रकल्पाचे लाभ

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना आधुनिक तसेच उच्च प्रतीचे रस्ते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भारतमाला योजनेंतर्गत नियोजित या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राची गुजरात, कर्नाटक आणि  इतर राज्यांशी कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होईल त्याचप्रमाणे  धुळे, चाळीसगाव शहरांतील वाहनांची रहदारी कमी होण्यास मदत होईल.  मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध धुळे जिल्ह्यातील शेतीमालाची वाहतूक सुरळीत करण्यासाठी हे रस्ते प्रकल्प उपयोगी ठरतील.

या रस्ते प्रकल्पांमुळे नागरिकांना पितळखोरा लेणी आणि  गौताळा अभयारण्य या पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल.याचप्रमाणे  जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आणि दौलताबाद किल्ला तसेच चाळीसगाव रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होईल. धुळे तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.  शेवाळी-नंदुरबार रस्ते प्रकल्प हा या परिसरातील आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. यापैकी काही प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत आहेत .

उद्योग प्रबोधिनीच्या कार्क्रमात नितीन गडकरी यांनी केले मार्गदर्शन

त्यानंतर धुळे येथील उद्योग प्रबोधिनीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी  मार्गदर्शन केले. शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता बनला पाहिजे यादृष्टीने केंद्र सरकार विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे  असे गडकरी यांनी संगितले. पेट्रोलचा वापर कमीत कमी होण्याच्या दृष्टीने फ्लेक्स इंजिन असलेल्या आणि ४० टक्के विजेवर आणि जैव इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या भविष्यात येणार आहेत यामुळे इथेनॉलचा वापर वाढून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असे ते म्हणाले. हरित हायड्रोजन हे आपले भविष्य आहे त्यादृष्टीनेही आपले कार्य सुरु असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

तंत्रज्ञानातही आता मोठे परिवर्तन झाले आहे. हे नवीन तंत्रज्ञान उद्योजकांपर्यंत पोहोचायला हवे अशाप्रकारचे ग्रामीण , कृषी , वनवासी क्षेत्रासाठीचे तंत्रज्ञान उद्योजकांपर्यंत पोहोचवले पाहिजे तर धुळे आणि नंदुरबारचे मागासलेपण दूर व्हायला नक्कीच मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रस्ते बांधणीसाठी आता पोलादाचा वापर न करता स्टील फायबरचा वापर केला जाणार असून यामुळे 40 टक्के खर्चाची बचत होईल असे गडकरी म्हणाले.

पदवी आणि ज्ञानापेक्षा उद्यमशीलता महत्वाची असल्याचे सांगत समाजातली उद्यमशीलता वाढवण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केला. नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे व्हा असे आवाहन नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात केले.

 

JPS/SC/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1819008) Visitor Counter : 188


Read this release in: English