वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी निर्यात क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या प्लॅस्टिक उद्योजकांना गौरविले, मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ‘एक्स्पोर्ट एक्सलंस’ पुरस्कारांचे केले वितरण
येत्या 4 ते 5 वर्षांमध्ये प्लॅस्टिक उद्योगाची उलाढाल 3 लाख कोटी रुपयांवरून 10 लाख कोटी रुपयांपर्यंत उंचावण्याचे भारतीय प्लॅस्टिक उद्योगाला केले आवाहन
Posted On:
16 APR 2022 9:11PM by PIB Mumbai
मुंबई 16 एप्रिल 2022
येत्या 4 ते 5 वर्षांमध्ये प्लॅस्टिक उद्योगाची उलाढाल 3 लाख कोटी रुपयांवरून 10 लाख कोटी रुपयांपर्यंत उंचावण्याचे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज भारतीय प्लॅस्टिक उद्योगाला केले. प्लॅस्टिक उद्योग क्षेत्राने केलेली ही एक प्रकारची देशसेवाच असेल आणि यातून देशाला आज अत्यंत गरजेची असलेली किमान एक ते दीड कोटी रोजगार निर्मिती होईल असे ते म्हणाले.
प्लॅस्टिक उद्योग व्यापार क्षेत्रातील मुख्य संस्था असलेल्या ‘प्लेक्सकौन्सिल’ अर्थात ‘प्लॅस्टिक निर्यात प्रोत्साहन मंडळाने’ आज मुंबई येथे आयोजित केलेल्या ‘एक्स्पोर्ट एक्सलंन्स’ 2017-2021 पुरस्कार वितरण सोहोळ्यामध्ये उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, त्त्यांच्या दृष्टीने हा रोजगार निर्मितीला चालना देणारा, विशेषतः एमएसएमई क्षेत्रातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. विकासाच्या चक्रामध्ये मागे पडलेल्या समाजाच्या उपेक्षित घटकांमधील अनेक लोकांना रोजगार पुरविण्याची क्षमता या क्षेत्रामध्ये आहे असे मत केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केले.
प्लॅस्टिक उद्योगाने दर्जाच्या बाबतीत एक महत्त्वाचा मानक म्हणून उदयाला यावे आणि जागतिक बाजार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभाग मिळविण्याच्या दिशेने मार्गाची आखणी करावी असे आवाहन गोयल यांनी या कार्यक्रमात बोलताना केले.
प्लॅस्टिक उद्योग क्षेत्राने आयात करण्यात येत असलेल्या सामग्रीचे प्रमाण कमी करण्याची आणि स्वावलंबी होण्याची गरज आहे असे ते म्हणाले. सध्या या क्षेत्रात होत असलेली 17 अब्ज डॉलर्सची आयात, आपल्यासाठी किती मोठा बाजार वाट पाहत आहे आणि आपल्याला किती वाव आहे हे दर्शविते असे मत केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “आगामी 25 वर्षांमध्ये आपली अर्थव्यवस्था 7% ते 8% दराने विकसित होईल असा अंदाज केला तर येत्या 4 -5 वर्षांमध्ये 100 अब्ज डॉलर्सचा पल्ला गाठणे प्लॅस्टिक उद्योगाला सहज शक्य आहे अशी खात्री मला वाटते. त्या पातळीपर्यंत पोहोचण्याची आकांक्षा आपण ठेवायलाच हवी.”
“आता आपल्याला महत्त्वपूर्ण विकासाकडे लक्ष द्यायला हवे कारण आज लवचिक पुरवठा साखळीचा भाग होण्यासाठी जग भारताकडे आशेने पाहत आहे. भारताकडे प्लॅस्टिक क्षेत्रात आवश्यक असलेली सर्व कौशल्ये आणि क्षमता आहेत; त्यामुळे आपली उत्पादने जगात कोठेही निर्माण झालेल्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करू शकतात,” असे केंद्रीय मंत्री गोयल पुढे म्हणाले.
या उद्योगाने अधिक मोठ्या प्रमाणात विस्तारासाठी विचार करावा आणि जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवावा असे आवाहन त्यांनी केले. “संयुक्त अरब अमिरात आणि ऑस्ट्रेलिया या देशांशी मुक्त व्यापार करारावर आपण नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्यामुळे तुमच्यासाठी जगभरातील या क्षेत्रात मोठ्या संधी खुल्या झाल्या आहेत. मात्र जर तुम्ही आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करत असाल तरच या संधी तुम्हांला मिळणे शक्य आहे. आणि म्हणून विकसित देशांतील अर्थव्यवस्थांमध्ये जम बसवून आपल्याला अधिक फायदा कसा मिळेल याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे.
गोयल यांनी जागतिक दर्जाची गुणवत्ता मानके कायम राखण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी उद्योगांना तंत्रज्ञान अद्ययावत करण्याचे आणि व्याप्ती वाढवण्याचे आवाहन केले. “आपली सर्व उत्पादने जगात कोणाच्याही मागे नसावीत; उच्च दर्जाची मानके अंगिकारण्याची हीच वेळ आहे, ज्यामुळे उद्योग दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होईल. बांधकाम आणि आरोग्यसेवा क्षेत्रात प्लॅस्टिक उद्योगासाठी भरपूर संधी आहेत; ऑटोमोबाईल्स आणि विमानांमध्ये उर्जेचा वापर कमी करण्यास प्लॅस्टिक मदत करू शकते असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदर्भ देत त्यांनी उद्योग क्षेत्राच्या परदेशी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी परदेशातील दूतावासांची मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. “आपल्या पंतप्रधानांनी परदेशातील आपल्या दूतावासांना व्यापार, तंत्रज्ञान आणि पर्यटनाकडे त्यांच्या प्रमुख कामगिरी निर्देशांकांचा भाग म्हणून पाहण्याची सूचना केली आहे; आपले दूतावास प्रमुख तुम्हाला स्थानिक व्यवसायांशी जोडण्यासाठी, तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी,मार्गदर्शन करण्यासाठी आणि सुविधा पुरवण्यासाठी खूप उत्सुक आहेत.’
या क्षेत्रातील शाश्वततेबाबत ते म्हणाले की, आपण जगाला दाखवून दिले पाहिजे की भारतीय पर्यावरणाबाबत जागरूक आहेत. “प्लास्टिक कचऱ्याचे संकलन आणि प्रक्रिया आणि पुनर्वापर करण्याच्या उपाययोजना आखणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते आपल्या पर्यावरणीय परिसंस्थेशी सुसंगत ठरेल. प्लॅस्टिक कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्प्रक्रिया करण्याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे; एकदा आपण हे करू शकलो तर त्यातून प्लास्टिक वापरण्याबाबतची नकारात्मकता लक्षणीयरीत्या कमी होईल.”
कोविड-19 दरम्यान आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या जागतिक परिस्थितीला सामोरे जाऊन आव्हानात्मक उद्दिष्टे साध्य केल्याबद्दल त्यांनी उद्योग क्षेत्राचे विशेषतः प्लास्टिक उद्योगाचे कौतुक केले.
नीलकमल लिमिटेडचे मानद अध्यक्ष वामनराय व्ही. पारेख यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी 95 कंपन्या आणि संघटनांना देखील निर्यात प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महामारीच्या परिस्थितीमुळे दोन वर्षांनंतर प्लेक्सकॉनसिल या भारतातील प्लास्टिक उद्योगातील सर्वोच्च व्यापार संस्थेने ,निर्यात प्रोत्साहन पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले.
***
S.Patil/S.Chitnis/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1817412)
Visitor Counter : 268