पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताची चैतन्यपूर्ण स्टार्ट-अप परिसंस्था म्हणजे देशातील उद्योजकतेच्या प्रतिभेची साक्ष : केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव


केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते फाल्गुनी नायर यांना ‘(ईओवाय) 2021’ पुरस्कार प्रदान करण्यात आला

Posted On: 13 APR 2022 2:43PM by PIB Mumbai

मुंबई, 13 एप्रिल 2022

केंद्रीय पर्यावरण आणि श्रम तसेच रोजगार मंत्री भूपेंद्र यादव  यांनी मुंबईत मंगळवारी रात्री झालेल्या कार्यक्रमात फाल्गुनी नायर यांना ‘या वर्षीचा अर्नेस्ट अॅंड यंग  सर्वोत्तम उद्योजक (ईओवाय) 2021’ पुरस्कार प्रदान केला. सौंदर्यप्रसाधनांची विक्री करण्यासाठी पारंपारिक पद्धतीने दुकानांच्या मार्फत विक्रीचा मार्ग सोडून देऊन डिजिटल पद्धतीने विक्री करण्याचा मार्ग नायर स्वीकारला आणि त्यातून युनिकॉर्न पातळीचा स्टार्ट-अप उद्योग उभारला. फाल्गुनी नायर आता जून 2022 मध्ये होणाऱ्या  ‘ईवाय जागतिक पातळीवरील या वर्षीचा सर्वोत्तम उद्योजक (ईओवाय)’ 2021’ पुरस्कार सोहोळ्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.

मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, यावर्षीच्या ईओवाय पुरस्कारासाठी 21 उद्योजक अंतिम फेरीत आले आहेत हे जाणून घेणे अत्यंत उत्साहवर्धक असून त्यांच्या उद्योगांतून संयुक्तपणे एकूण 1.87 ट्रिलीयन रुपयांचा महसूल निर्माण होत आहे आणि या सर्व उद्योगांनी देशातील एकूण 2.60,000 लोकांना रोजगार दिला आहे, देशातील उद्योजकतेच्या प्रतिभेची साक्षच यातून मिळते आहे.

भारतातील स्टार्ट-अप क्षेत्राच्या विकासावर अधिक भर देत ते म्हणाले की लोकसंख्याविषयक लाभांशाच्या भांडवलाचा फायदा करून घेण्याचा कल आणि स्टार्ट-अप परिसंस्थेला सक्षम करणारे सरकारचे उपक्रम यांमुळे भारतातील युवावर्गाने स्टार्ट-अप स्थापन करण्याच्या बाबतीत जगातील पहिल्या तीन देशांमध्ये स्थान मिळविले आहे. भारतात युनिकॉर्न प्रकारचे तब्बल 94 उद्योग असून त्यांची एकूण उलाढाल 320 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी आहे अशी माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, अनिश्चिततेच्या काळात देखील भारतीय उद्योजक, कोविड-19 महामारीदरम्यान उभी ठाकलेली आव्हाने आणि बदल यांच्याशी जुळवून घेण्यासाठी काटक लवचिकता आणि उत्कृष्ट क्षमता यांचे दर्शन घडवीत आले आहेत.

देशातील एमएसएमई उद्योगांचा विस्तार करण्यासाठी सरकारने 6,000 कोटी रुपयांच्या खर्चाचा आरएएमपी अर्थात ‘एमएसएमई उद्योगांची वाढ करणे आणि त्यांची कार्यक्षमता अधिक वेगवान करणे’ हा कार्यक्रम जाहीर केला आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री यादव यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, महिला उद्योजकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने त्यांना अधिक प्रोत्साहन देणे हा आरएएमपी कार्यक्रम सुरु करण्यामागील एक मुख्य उद्देश आहे.  केंद्रीय मंत्री यादव पुढे म्हणाले की, 5 जी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच पायाभूत सुविधा यांसारख्या तंत्रज्ञानविषयक उपक्रमांमध्ये गुंतवणूक यावर लक्ष केंद्रित करून आपल्या सरकारने निर्माण केलेली डिजिटल परिसंस्था देशभरात उद्योजकतेच्या विकासाला अधिक बळकटी देणे सुरु ठेवेल.

केंद्रीय मंत्री यादव आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी इतर 9 विभागांतील विजेत्यांना देखील यावेळी पुरस्कार प्रदान केले. लार्सन अँड टुब्रो उद्योगसमूहाचे अध्यक्ष ए.एम.नाईक यांना या कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बँकिंग क्षेत्रातील प्रख्यात व्यक्ती असलेले के.व्ही.कामथ यांच्या अध्यक्षतेखालील 9 सदस्यांच्या परीक्षक मंडळाने या पुरस्कारासाठीच्या विजेत्यांची निवड केली. भारतातील उद्योजकतेच्या उर्जेला साजरे करण्याच्या आणि यशस्वी भारतीय उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा सर्वांसाठी सामायिक करण्याच्या हेतूने वर्ष 1999 मध्ये भारतात ‘ईवाय सर्वोत्तम उद्योजक’ पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली.

स्टार्ट-अप इंडिया, अटल इनोव्हेशन अभियान, ई-बीझ पोर्टल, न्यूजेन नवोन्मेष आणि उद्योजकता विकास केंद्र यांसह अशा इतर अनेक योजनांच्या माध्यमातून भारत सरकार देशातील अभिनव संशोधन आणि उद्योजकतेच्या विकासाला सक्रियतेने पाठबळ पुरवीत आहे. डीपीआयआयटी अर्थात उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने देशातील 633 जिल्ह्यांमध्ये विस्तारलेल्या 55 उद्योगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि  2016 पासून आतापर्यंत सुमारे 6 लाखांहून जास्त रोजगार निर्माण करणाऱ्या 60,000 हून अधिक स्टार्ट-अप्सना मान्यता दिली आहे.

 

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1816341) Visitor Counter : 197


Read this release in: English