सांस्कृतिक मंत्रालय
राष्ट्रीय दिनदर्शिका या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या पूर्वतयारीबाबत माहिती देणाऱ्या एका विशेष कार्यक्रमाचे मुंबई विद्यापीठात आयोजन
Posted On:
11 APR 2022 9:44PM by PIB Mumbai
मुंबई, दि.11 एप्रिल 2022
राष्ट्रगीत हे जसे राष्ट्रीय अस्मितेच्या प्रकटीकरणाचे प्रतीक आहे तसेच राष्ट्रीय दिनदर्शिका हे देखील विस्मृतीत गेलेले प्रतीक आहे. त्याची वैज्ञानिकता लक्षात घेता मुंबई विद्यापीठाने आपल्या सर्व अधिकृत व्यवहारांमध्ये राष्ट्रीय दिनदर्शिकेचा वापर करण्याचे ठरविले आहे, अशी घोषणा मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी आज येथे केली.

राष्ट्रीय दिनदर्शिका या विषयावरील देशव्यापी परिषदेची माहिती देण्याकरिता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज विद्यापीठाच्या कलिना संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी सेंटरच्या सभागृहात करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्रोत्यांना संबोधित करताना डॉ. कुलकर्णी यांनी ही घोषणा केली.

विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव जयंत सहस्रबुद्धे, विज्ञान प्रसारचे ज्येष्ट वैज्ञानिक डॉ. अरविंद रानडे, राष्ट्रीय दिनदर्शिका प्रचार मंचच्या पदाधिकारी माजी सनदी अधिकारी लीना मेहेंदळे, विद्यापीठाच्याच सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेसचे संचालक डॉ. व्ही के जैन आणि याच केंद्रातील प्राध्यापक डॉ. आनंद होता यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.

परकीय आक्रमकांनी देशाला गुलामगिरीच्या बेड्यांत जखडून टाकताना देशाची अस्मितादर्शक प्रतिके नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच ग्रेगरियन कॅलेन्डरसारखी अवैज्ञानिक प्रतिके रूढ केली गेली. परकीय राज्यकर्त्यांच्या या व्यूहातून बाहेर पडण्याकरिता स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकनियुक्त सरकारने शास्त्रज्ञांची समिती नियुक्त करून शास्त्रशुद्ध दिनदर्शिका तयार करून घेतली. संसदेने तिचा स्वीकार करताना तिच्यावर अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणून मान्यतेची मोहोर उमटवली. या घटनेला ६५ वर्षे पूर्ण झाली तरीही ती दिनदर्शिका अद्याप सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरात आलेली नाही, ही खेदाची बाब आहे, असे जयंत सहस्रबुद्धे म्हणाले आणि या दिनदर्शिकेच्या प्रसाराच्या मोहिमेत सर्वांनी सामिल होण्याचे आवाहन केले.

22 मार्च (1 सौर चैत्र) रोजी नववर्ष सुरू होणाऱ्या भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या शास्त्रीय बाबी तसेच अन्य वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा करण्याकरिता २२ व २३ एप्रिल २०२२ (म्हणजेच २ व ३ सौर वैशाख १९४४) या दिवशी मध्यप्रदेशातील उज्जैन येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेबद्दल अधिक माहिती bharatcalendar.in या संकेतस्थळावर मिळू शकेल, तसेच तिथेच या परिषदेसाठी नावनोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे, असेही सहस्रबुद्धे म्हणाले.
***
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1815803)
Visitor Counter : 191