महिला आणि बालविकास मंत्रालय
केंद्रीय महिला आणि बाल विकासमंत्री श्रीमती स्मृती झुबिन इराणी मुंबईत पश्चिम विभागातील 6 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या विभागीय परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार
कुपोषणाच्या समस्येचे उच्चाटन आणि महिला आणि बालकांचा विकास, सक्षमीकरण आणि संरक्षणाच्या मुद्यांवर धोरणात्मक उपाययोजनांबाबत विभागीय परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारे/ केंद्रशासित प्रदेश आणि हितधारकांशी व्यापक विचारमंथन
प्रविष्टि तिथि:
11 APR 2022 11:33AM by PIB Mumbai
केंद्रीय महिला आणि बाल विकासमंत्री श्रीमती स्मृती झुबिन इराणी यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागातील 6 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या विभागीय परिषदेचे 12 एप्रिल 2022 रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव ही राज्ये/ केंद्रशासित प्रदेश या परिषदेत सहभागी होतील.
देशाच्या लोकसंख्येत महिला आणि बालकांचे प्रमाण सुमारे 67.7% आहे आणि त्यांचे सक्षमीकरण आणि संरक्षण आणि सुरक्षित आणि निर्भय वातावरणात त्यांचा समग्र विकास सुनिश्चित करणे, परिवर्तनात्मक आर्थिक आणि सामाजिक बदल साध्य करण्याच्या उद्देशाने देशाच्या शाश्वत आणि समन्यायी विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अलीकडेट पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिशन पोषण 2.0, मिशन शक्ती आणि मिशन वात्सल्य या मोहिमेच्या स्वरुपात राबवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या तीन छत्रधारक योजनांना मंजुरी देण्यात आली. या तीन योजनांची अंमलबजावणी 15व्या वित्त आयोगाच्या काळात 2021-22 ते 2025-26 मध्ये केली जाणार आहे. या छत्रधारक योजनांच्या अंतर्गत असलेल्या योजना या केंद्र पुरस्कृत आहेत आणि त्यांची अंमलबजावणी राज्य सरकारे/ केंद्रशासित प्रदेश प्रशासनांकडून खर्च विभागणी निकषांनुसार केली जाते. महिला आणि बालकांसाठी राज्यांनी केलेल्या कामातील तफावत भरून काढणे आणि लिंग समानतेवर आधारित आणि बालक केंद्रित कायदे, धोरणे आणि कार्यक्रम तयार करणे आणि महिला आणि बालकांना अतिशय सहजसाध्य, परवडण्याजोगे, विश्वासार्ह आणि सर्व प्रकारचे भेदभाव आणि हिंसाचारविरहित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आंतर मंत्रालयीन आणि आंतर क्षेत्रीय एकजुटीला चालना देणे हे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या दिशेने या मंत्रालयाच्या योजनांतर्गत असलेली उद्दिष्टे प्रत्यक्ष जमिनीवर या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी उत्तरदायी आहेत ती राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन यांच्या पाठबळाने साध्य करण्याची अपेक्षा आहे.
मंत्रालयाच्या या तीन महत्त्वाच्या योजनांविषयी राज्य सरकारे/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या विभागीय परिषदेचा प्रमुख उद्देश आहे, जेणेकरून सहकारी संघवादाच्या वास्तविक भावनेने पुढील पाच वर्षात योजनांची सुयोग्य अंमलबजावणी होईल आणि या मोहिमांतर्गत महिला आणि बालकांच्या फायद्यासाठी निर्धारित करण्यात आलेले परिवर्तनात्मक सामाजिक बदल सुनिश्चित होतील.

मिशन पोषण 2.0 हा एक एकात्मिक पोषण पाठबळ कार्यक्रम आहे. बालके, पौगंडावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांमधील कुपोषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी आहारात सुनियोजित बदल करणे आणि आरोग्यदायी जीवनशैली, निरामय जीवन आणि रोगप्रतिकारक्षमतावृद्धी करणाऱ्या पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि तशा प्रकारचे पूरक वातावरण निर्माण करणे हा योजनेचा उद्देश आहे. पूरक पोषण कार्यक्रमांतर्गत अन्नाचा दर्जा आणि पुरवठा सुधारण्यावर पोषण 2.0 चा भर राहील. पोषण 2.0 च्या कार्यकक्षेत प्रामुख्याने अंगणवाडी सेवा, पौगंडावस्थेतील मुलींसाठी योजना आणि पोषण अभियान हे 3 महत्त्वाचे कार्यक्रम/ योजना असतील.
मिशन शक्तीअंतर्गत एकात्मिक निगा, सुरक्षा, संरक्षण, पुनर्वसन आणि जीवनाच्या विविध टप्प्यांमधून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी महिलांना जोखडातून मुक्त करण्यासाठी सक्षम करणे आदींच्या माध्यमातून महिलांसाठी एक एकीकृत नागरिक केंद्रित जीवनचक्र निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. मिशन शक्तीच्या ‘संबल’ आणि ‘सामर्थ्य’ अशा आणखी दोन उप-योजना आहेत. ‘संबल’ ही उप-योजना महिलांची सुरक्षा आणि सुरक्षितता यांच्याशी संबंधित आहे तर ‘सामर्थ्य’ ही उप-योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे. देशातील प्रत्येक बालकासाठी एक निरोगी आणि आनंदी बालपण सुनिश्चित करणे, बालकाच्या विकासासाठी संवेदनशील, पाठबळकारक आणि तादात्म्य असलेली परिसंस्था निर्माण करणे, बालगुन्हेगार कायदा 2015च्या अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना मदत करणे, शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करणे ही मिशन वात्सल्यची उद्दिष्टे आहेत. मिशन वात्सल्य अंतर्गत वैधानिक मंडळे, सेवा पुरवठादार संरचना, संस्थात्मक काळजी/ सेवा, बिगर संस्थात्मक समुदाय आधारित काळजी, आकस्मिक संपर्क सेवा, प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धी या घटकांचा समावेश आहे.
****
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1815553)
आगंतुक पटल : 302
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English