संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डेझर्ट कोअरकडून कश्मीरविषयक वेबिनार

Posted On: 06 APR 2022 9:40PM by PIB Mumbai

पुणे, 6 एप्रिल 2022

 

जम्मू  काश्मीरमधल्या सध्याच्या सुरक्षाविषयक परिस्थितीबद्दल पूर्ण कल्पना येण्याच्या उद्देशाने पुणेस्थित दक्षिण कमांडच्या कक्षेतील डेझर्ट कोअरने परम विशिष्ट सेवा पदक प्राप्त, अति विशिष्ट सेवा पदक प्राप्त लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल राज्यपाल जे एस नैन यांच्या अध्यक्षतेखाली वेबिनार आयोजित केला होता.

कलम 370 रद्द केल्यानंतर आणि त्यानंतर जागतिक व राष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीत झालेला  आमूलाग्र बदल आणि त्यामुळे काश्मीरच्या सामाजिक, राजकिय आणि आर्थिक परिस्थितीवरील परिणाम यावर हा वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर भावी वाटचालीबाबत चर्चासत्र झाले.

प्रशासनाशी विविध महत्वाच्या स्तरांवर संबधित आणि काश्मीरशी संबधित अनेक प्रख्यात व्यावसायिकांनी सध्याच्या परिस्थितीवर आपली परखड मते मांडली.

मुख्य वक्त्यांमध्ये GOC चिनार कोअरचे लेफ्टनंट जनरल डी पी पांडे, पुलवामा घटनेच्या वेळी कारभाराचे सुकाणू हाती असलेले GOC चिनार कोअरचे माजी लेफ्टनंट जनरल के जे एस धिल्लन (निवृत्त),  जम्मू काश्मीरचे माजी पोलिस  महासंचालक राजेंद्र कुमार, पाकिस्तानातील माजी उच्चायुक्त आणि परराष्ट्रनीतीमधीत तज्ञ टी सी ए राघवन  यांचा समावेश होता. या विषयातील जाणकार असलेले अदित्य राज कौल, प्रसिद्ध पत्रकार बशीर अस्सद, लेखक आणि कार्यकर्ते असलेले ऐजाज वाणी व राजा मुनिब, IDSA चे दक्षिण आशिया विषयक तज्ञ अशोक बेहुरिया यांनी या संदर्भातील आपली मते मांडली व आशादायी विचार व्यक्त केले.

काश्मीरच्या बदलत्या आयामांबद्दल आणि सुरक्षा परिस्थितीवर त्याचे होणारे परिणाम या संदर्भात आपले विचार वक्त्यांनी मांडले. जागतिक, राष्ट्रीय आणि  स्थानिक स्तरावरील धोकादायक घटक व त्यांचे जम्मू काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीवर होणारे परिणाम याबद्दल विवेचन करण्यात आले. अनेक सत्रे झाली त्यापैकी एकात आंदोलने व पांढरपेशा दहशतवाद याबद्दल सविस्तर विवेचनातून  आपल्या विरोधकांच्या छुप्या उद्देशांवर प्रकाश टाकला गेला.

काश्मीर व काश्मीरींच्या भावी स्वास्थ्याबद्दलच्या अनुमानाची विविधस्वरुपी मांडणी व्हावी म्हणून वेगवेगळ्या संबधितांना एकत्र आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न या वेबिनारमधून केला गेला. याशिवाय प्रशासनाच्या विविध स्तरांवर अधिपत्य मिळवण्यासाठी ‘संपूर्ण राष्ट्र’ या ठोस आणि संयुक्तिक भूमिकेचा अवलंब करण्याच्या गरजेवर भर दिला गेला.

या वेबिनार मधून मिळालेला मुख्य दृष्टीकोन आर्मी कमांडरने त्यांच्या समारोपाच्या प्रास्ताविकात अधोरेखित केला आणि देशातील सध्याची परिस्थिती व धोरणात्मक पातळीवर काश्मीरच्या बदलत्या परिस्थितीला समजून घेण्यासाठी तरुण अधिकाऱ्यांनी सज्ज रहावे यावर भर दिला.

युवावर्गाने मुख्य धारेशी एकरूप व्हावे यासाठी शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, तसेच अंमलीपदार्थाशी संबधित दहशतवाद रोखणे व प्रमुख संस्थांमध्ये घुसखोरी  होऊ नये म्हणून काळजी घेण्यावर भर दिला. कलम 370 रद्द करणे, राज्य म्हणून जम्मू काश्मीर संदर्भात टप्प्याटप्प्याने घातलेल्या मर्यादा यासारखे गेल्या काही वर्षांमध्ये  घेतले गेलेले निर्णय यातून धर्मनिरपेक्ष, बहुसंख्यावादी धोरण राबवणारे निर्णयक्षम नेतृत्वाचे निदर्शक आहे आणि ते जम्मू काश्मीरच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे यावर आपल्या समारोपाच्या भाषणात भर दिला. आधिक उत्तम धोरणात्मक निर्णयांसाठी पायाभूत सुविधांचा विकास आणि  सामाजिक –आर्थिक परिणाम याच्या विश्लेषणाची दखल घेतली गेली पाहिजे असे ते म्हणाले.

पाकिस्तानच्या आगामी धोरणात्मक डावपेचाच्या दृष्टीने अगोदरच तयार राहण्याची सूचना आर्मी कमांडरनी सर्व संबधितांना केली. शांतता आणि समस्यांवर तोडगा यासाठी भारताला धोरण आणि चर्चा या मार्गानेच जायचे आहे, पण त्यासाठी परिस्थिती योग्य असणे आणि पाकिस्तानने भारताशी छुपे युद्ध थांबवणे या आवश्यक अटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दक्षिण कमांडच्या 32 विविध स्थानांवरून सुमारे 1100 अधिकारी या वेबीनारमध्ये सहभागी झाले होते.

तज्ञांनी श्रोत्यांबरोबर केलेल्या सविस्तर चर्चेमुळे सक्षमता आणि ज्ञान वाढल्यामुळे या उपक्रमाची प्रशंसा झाली.


* * *

PIB Pune | S.Patil/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1814284) Visitor Counter : 184


Read this release in: English