खाण मंत्रालय

देशांतर्गत दागिन्यांवरील नागरिकांचा विश्वास आंतरराष्ट्रीय दागिन्यांच्या विश्वासाच्या पातळीवर न्या: केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे


केंद्रीय खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते भारतीय रत्ने आणि दागिने याविषयीच्या व्यावसायिक प्रदर्शन 2022 (GJS) चे उद्घाटन

Posted On: 03 APR 2022 4:07PM by PIB Mumbai

मुंबई, 3 एप्रिल 2022

 

केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री, रावसाहेब पाटील दानवे यांनी आज मुंबईत अखिल भारतीय रत्ने आणि दागिने देशांतर्गत परिषदेद्वारे (GJC) आयोजित केलेल्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी शो (GJS 2022) B2B ज्वेलरी एक्स्पो अर्थात भारतीय रत्न आणि दागिने याविषयीच्या व्यावसायिक प्रदर्शनाचे उद्घाटन केले. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे 3 एप्रिल ते 6 एप्रिल दरम्यान या व्यावसायिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्ने आणि दागिने प्रदर्शन 2022 मध्ये सोने, रत्नजडित, हिरे, अतिशय उच्च दर्जाचे महागडे दागिने, रत्न, मोती, सुटे हिरे, अलाईड आणि मशिनरीमधील सर्वोत्कृष्ट उत्पादक/घाऊक विक्रेते तसेच संपूर्ण उद्योगातील डीलर्सचा समावेश आहे. रत्ने आणि दागिने प्रदर्शनामध्ये भारतभरातील मोठ्या संख्येने प्रदर्शकांचा सहभाग आहे.

एक्स्पोचे उद्घाटन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री दानवे यांनी विश्वासाचे महत्त्व आणि ते रत्न आणि दागिने क्षेत्रासाठी कसे महत्त्वाचे आहे हे अधोरेखित केले. ज्या प्रकारे लोकांचा आंतरराष्ट्रीय सोन्यावर विश्वास असतो, तशाच प्रकारचा विश्वास देशांतर्गत उत्पादित सोन्यावरही निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले.

मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या शासन तत्त्वज्ञानातही विश्वास हा पाया आहे. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाचे स्मरण करून आपण देशाला स्वावलंबी बनवायला हवे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

अखिल भारतीय रत्ने आणि दागिने देशांतर्गत परिषदेचे अध्यक्ष आशिष पेठे म्हणाले, “आम्हाला या प्रदर्शनासाठी प्रदर्शकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जडजवाहीर उत्पादक आणि किरकोळ विक्रेत्यांनी वजनाने हलक्या आणि आकर्षक दिसणाऱ्या दागिन्यांवर अधिक भर देऊन खास डिझाइन्स तयार केली आहेत. आम्हाला विश्वास आहे की प्रदर्शक या कार्यक्रमात नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट दागिन्यांच्या विक्रीसह चांगले व्यावसायिक सौदे करतील.”

जडजवाहीर मूल्य साखळीतील सहभागींच्या मागणीनुसार GJS चे आयोजन केले जात आहे ज्यांना त्यांच्या समकालीन दागिने डिझाईन्सचे प्रदर्शन करण्यासाठी आणि उद्योगातील अन्य व्यक्तींसोबत व्यवसाय कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता वाटली.

आयोजकांचे उद्दिष्ट हे व्यवसाय करण्यासाठी अंतिम संसाधन मंच बनवण्याचे आहे आणि आशा आहे की हे प्रदर्शन किरकोळ विक्रेत्यांना विविध विशेष आणि ट्रेंडसेटिंग दागिन्यांचा शोध घेण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करेल, तसेच मजबूत व्यावसायिक संबंधांना प्रोत्साहन देईल.

रत्न आणि दागिने उद्योग देशाच्या एकूण जीडीपी मध्ये सुमारे 7% योगदान देतो आणि 5 दशलक्षाहून अधिक लोकांना रोजगार देतो. मूल्याच्या 10% योगदान देऊन 400 अब्ज डॉलर व्यापारी माल निर्यातीचा टप्पा गाठण्यातही या क्षेत्राने महत्त्वाची भूमिका बजावली.

सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 साठी 50 अब्ज डॉलर्स चे उद्दिष्ट ठेवले आहे आणि संयुक्त अरब अमिरात आणि ऑस्ट्रेलिया सोबत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA) अंमलात आणून वाढीसाठी नवीन मार्ग देखील उघडले आहेत ज्याचा भारतीय रत्न आणि दागिने उद्योगासाठी मोठा फायदा होईल. 

कापलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या निर्यातीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे आणि सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 

* * *

JPS/S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1812961) Visitor Counter : 235


Read this release in: English