शिक्षण मंत्रालय

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 1 एप्रिल 2022 रोजी 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमाच्या 5 व्या भागात जगभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत.


परीक्षेचा ताण आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या  अन्य संबंधित  प्रश्नांना पंतप्रधान उत्तर देतील.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून  गेल्या चार वर्षांपासून हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केला जात आहे

Posted On: 30 MAR 2022 3:16PM by PIB Mumbai

 

मुंबई दि. मार्च 30,2022 

कोविड महामारीनंतर  जवळपास दोन वर्षानंतर आपले आयुष्य पूर्वपदावर येत आहे यापार्श्वभूमीवर ‘ परीक्षा पे चर्चा’  या एका आगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची यंदाची पाचवी आवृत्ती ही नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम इथे  1 एप्रिल 2022 रोजी प्रत्यक्ष उपस्थितीत होत आहे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी  देशातील निवडक विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांच्याशी  संवाद साधणार आहेत असे पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाच्या अतिरिक्त महा संचालक स्मिता वत्स -शर्मा सांगितले . ‘परीक्षा पे चर्चा’  या उपक्रमाच्या  पाचव्या आवृत्तीच्या वैशिष्ठ्यासंदर्भात  माहिती देण्यासाठी दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेत त्या आज बोलत होत्या.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून  गेल्या चार वर्षांपासून हा कार्यक्रम  यशस्वीपणे  आयोजित केला जात आहे. परीक्षेचा ताण आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या संबंधित  प्रश्नांना पंतप्रधान  या कार्यक्रमात उत्तर देतील असे वत्स- शर्मा यांनी सांगितले.  या कार्यक्रमाला लोक चळवळ बनवण्यासाठी प्रसारमाध्यमांचे सहकार्य अपेक्षित आहे कारण मुलांसाठी तणावमुक्त वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे असे सांगत उपस्थित पत्रकारांना या उपक्रमाची माहिती यांच्या माध्यमाद्वारे अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन  वत्स- शर्मा यांनी केले.

यंदा प्रथमच, देशातील विविध राजभवनात, निवडक विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या समवेत हा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे अशी माहिती पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक डॉ. राहुल तिडके यांनी यावेळी  दिली . यानिमित्ताने   विद्यार्थ्यांना   राजभवनाला भेट देता येईल असे तिडके म्हणाले. .

येत्या   1 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथून इंटरएक्टिव्ह  अर्थात परस्पर संवाद  स्वरूपात  होणाऱ्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात इयत्ता 9 ते 12 चे शालेय विद्यार्थी, त्यांचे शिक्षक आणि पालक  यांना पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. या सर्वाना  सहभाग  प्रमाणपत्र आणि पंतप्रधानांनी लिहिलेल्या एक्साम  वॉरियर्स पुस्तकाचा समावेश असलेले विशेष “परीक्षा  पे चर्चा” किट दिले जाणार आहे.

 यातील  एकूण सहभागींपैकी, 2,050 सहभागींची निवड ही  MyGov  या संकेत स्थळाकडून विविध संकल्पनांवर  ऑनलाइन सर्जनशील लेखन स्पर्धेच्या आधारे करण्यात आली आहे असे यावेळी वत्स- शर्मा यांनी सांगितले .

 या स्पर्धेचे आयोजन 28 डिसेंबर 2021 ते 3 फेब्रुवारी 2022 या कालावधीत  करण्यात आले होते.  या सर्जनशील लेखन स्पर्धेसाठी  एकूण 15.7 लाख जणांनी  नोंदणी केली होती, त्यात  12.1 लाखांहून अधिक विद्यार्थी, 2.7 लाख शिक्षक आणि 90,100 हून अधिक पालक  यांचा समावेश होता. यात महाराष्ट्रातील 47,265 विद्यार्थी, 4,998 पालक आणि 13,834 शिक्षकांचा समावेश आहे; तर गोव्यातील 1,749 विद्यार्थी, 46 पालक आणि 316 शिक्षक सहभागी झाले होते, अशी माहिती डॉ. तिडके यांनी दिली.

• ऑनलाइन स्पर्धा खालील संकल्पनांवर  आयोजित करण्यात आली होती:

विद्यार्थ्यांसाठी संकल्पना :

a कोविड -19 दरम्यान परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन संबंधी रणनिती

b स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव

c आत्मनिर्भर भारतासाठी आत्मनिर्भर शाळा

d स्वच्छ भारत, हरित भारत

e वर्गात डिजिटल सहाय्य

f पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाला अनुकूल लवचिकता

 

शिक्षकांसाठी संकल्पना :

a नवीन भारतासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP).

b कोविड-19 महामारी: संधी आणि आव्हाने

 

पालकांसाठी संकल्पना :

a बेटी पढाओ, देश बढाओ

b लोकल टू ग्लोबल - व्होकल फॉर लोकल

c विद्यार्थ्यांची शिकण्यासाठीची आजन्म तळमळ

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भात राज्यांना  पत्रे लिहिली आहेत. तसेच त्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला माध्यमांना संबोधित करताना,  21 व्या शतकातील ज्ञान-आधारित अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी “परीक्षा पे चर्चा” सारख्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले होते . 

‘परीक्षा पे चर्चा’ ही एक औपचारिक संस्था बनत असून यात पंतप्रधान  विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधतात असे ते म्हणाले होते.  देश-विदेशातून  कोट्यवधी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यात सहभागी होणार आहेत  अशी माहिती प्रधान यांनी दिली. (पत्रकार परिषदेची लिंक: https://youtu.be/QQjchQUp1bw ).

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1811435) Visitor Counter : 257


Read this release in: English