रेल्वे मंत्रालय

कोकण रेल्वेने ‘मिशन 100% विद्युतीकरण’ साध्य केले

Posted On: 29 MAR 2022 6:00PM by PIB Mumbai

मुंबई, 29 मार्च 2022

 

कोकण रेल्वेने आपल्या संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करून लोकांना वाहतुकीचे पर्यावरण-स्नेही, हरित आणि स्वच्छ साधन उपलब्ध करून दिले आहे.

कोकण रेल्वेच्या संपूर्ण  741  किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणाची पायाभरणी नोव्हेंबर  2015 मध्ये करण्यात आली. या प्रकल्पाचा एकूण खर्च 1287 कोटी रुपये आहे. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाची सीआरएस तपासणी मार्च 2020 पासून सहा टप्प्यांमध्ये यशस्वीरित्या करण्यात आली. 

रत्नागिरी आणि थिविम दरम्यानच्या शेवटच्या टप्प्याची  सीआरएस तपासणी 24/03/2022 रोजी करण्यात आली आणि 28/03/2022 रोजी अधिकृत मान्यता मिळाली.  

कोकण रेल्वेचा कठीण भूभाग आणि कोविड -19 महामारीमुळे  प्रतिकूल  वातावरणात हा  विद्युतीकरण प्रकल्प आव्हानात्मक होता. शिवाय कोकण प्रांतात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विद्युतीकरण मोहीम अखंड सुरू राहण्यासाठी अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागली होती.

इलेक्ट्रिक ट्रॅक्शनचे असंख्य उपजत फायदे आहेत- इंधन खर्चात लक्षणीय अर्थात 150 कोटींहून अधिक बचत, पश्चिम किनार्‍यावरील इलेक्ट्रिक ट्रॅक्‍शनवर वेगवान परिचालन, प्रदूषणमुक्त वाहतुकीचे साधन आणि एचएसडी तेलावरील कमी अवलंबत्व.

कोकण रेल्वे हा भारतीय रेल्वेच्या सर्वदूर पसरलेल्या जाळ्यातील सर्वात मोठ्या रेल्वे मार्गांपैकी एक असल्यामुळे विद्युतीकरण केलेल्या नवीन कोकण रेल्वे मार्गावर टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक ट्रॅक्शनसह गाडया  चालवल्या जातील.

'मिशन 100% विद्युतीकरण - निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाकडे वाटचाल' उद्दिष्ट साध्य करण्यासाठी  भारतीय रेल्वे मिशन मोडवर काम करत आहे. या पार्श्वभूमीवर  कोकण रेल्वेने  हरित वाहतुकीच्या दिशेने टाकलेलं हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

* * *

S.Kakade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1811040) Visitor Counter : 235


Read this release in: English