इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दूरसंचार विभागाच्या मुंबई परवाना सेवा क्षेत्राद्वारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड किरणोत्सार आणि सार्वजनिक आरोग्य या विषयावर जागरूकता वेबिनारचे आयोजन
मुंबई परवाना सेवा क्षेत्राने एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीत 1,493 बी टी एस यांची चाचणी केली आणि सर्व बी टी एस इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड किरणोत्सार उत्सर्जन हे दूरसंचार विभागाच्या निर्धारितपातळीच्या अधीन असल्याचे आढळले आहे.
मोबाईल/सेल टॉवर्समधून उत्सर्जित होणाऱ्या निम्न पातळीच्या आयनीकरण न करणाऱ्या किरणोत्साराचा मानवी आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही: डॉ विवेक टंडन, न्यूरोसर्जरीचे वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक, एम्स, नवी दिल्ली
Posted On:
25 MAR 2022 2:05PM by PIB Mumbai
दूरसंचार विभाग (DoT), मुंबई परवानाकृत सेवा क्षेत्र (LSA) यांनी आज “इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड उत्सर्जन आणि दूरसंचार टॉवर्स” या विषयावर जागरूकता वेबिनारचे आयोजन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ग्राहकांसाठी विश्वासार्ह दूरसंचार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि मोबाईल टॉवर्सच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड सान्निध्याचा आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी आणि मोबाईल टॉवरच्या वाढत्या गरजेबद्दल जागरूक करण्यासाठी या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

2021-22 मध्ये आत्तापर्यंत, मुंबई परवानाकृत सेवा क्षेत्राने एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत 1,493 बेस ट्रांसीव्हर स्टेशन्सची चाचणी केली आहे आणि सर्व बी टी एस इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड किरणोत्सार हे दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार अनुरूप आढळले आहेत. मोबाइल टॉवरच्या किरणोत्साराची सर्व माहिती दूरसंचार विभागाच्या संकेतस्थळावर https://dot.gov.in/journey-emf आणि पोर्टल http://tarangsanchar.gov.in/EMFportal वर उपलब्ध आहे, जिथे कोणताही नागरिक नाममात्र शुल्क भरून त्यांच्या परिसरातील कोणत्याही मोबाईल टॉवरच्या चाचणीसाठी विनंती करू शकतो.
दूरसंचार विभागाच्या मुंबई सेवा क्षेत्र विभागाचे वरिष्ठ उपमहासंचालक अश्वनी सलवान यांनी मोबाईल टॉवर्सचे महत्त्व आणि अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात दूरसंचार विभागाची भूमिका स्पष्ट केली. यासंदर्भातील शंकांचे निरसन करताना, ते पुढे म्हणाले, “सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी, दूरसंचार उद्योग हा कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी मोबाईल टॉवर्सचे मजबूत नेटवर्क प्रदान करून पाया तयार करतो.
उपमहासंचालक (अनुपालन) हौशीला प्रसाद यांनी वेबिनारमधील विविध सत्रांचा आढावा घेत मुंबई परवानाकृत सेवा क्षेत्राची आकडेवारी सांगितली.
एम.के. जैन, संचालक (अनुपालन) म्हणाले, “आम्ही ICNIRP अर्थात आयनीकरण न करणाऱ्या किरणोत्सार संरक्षण संदर्भातील आंतरराष्ट्रीय आयोगाने निर्धारित केलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या नियमांपेक्षा 10 पट कठोर नियमांचे पालन करतो. दूरसंचार विभाग संपूर्ण भारतातील टॉवर्समधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड उत्सर्जन पातळीचे सतत निरीक्षण करते आणि देशभरातील उत्सर्जन नियमांचे पालन सुनिश्चित करते.
दिल्लीच्या एम्स मधील न्यूरोसर्जरीचे वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक डॉ विवेक टंडन यांनीही आपला दृष्टीकोन सामायिक केला आणि ते म्हणाले, “मोबाइल टॉवर्सच्या किरणोत्सर्गाच्या आरोग्यावरील परिणामांसंदर्भातील वैज्ञानिक संशोधनानुसार, असे आढळून आले आहे की सेल टॉवर मधून कमी शक्तीच्या, आयनीकरण न करणाऱ्या किरणोत्साराचा मानवी आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.
कार्यशाळेत सामान्य नागरिक, सरकारी अधिकारी, रहिवासी कल्याणकारी संघटना, विद्यार्थी, डॉक्टर, दूरसंचार सेवा प्रदाते, पायाभूत सुविधा पुरवठादार आणि इतर अधिकारी यांच्यासह 100 हून अधिक जण सहभागी होते.
***
Jaydevi PS/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1809611)
Visitor Counter : 163