वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सरकारी ई-मार्केट पोर्टलद्वारे वार्षिक खरेदीने 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला


चालू आर्थिक वर्षात 22% वृद्धीदरासह मागण्यांची संख्या 31.5 लाखांच्या पुढे गेली आहे

5 वर्षांच्या अल्पावधीत, जीईएम हे जगातील सर्वात मोठ्या सरकारी ई-खरेदी मंचांपैकी एक बनले आहे

Posted On: 24 MAR 2022 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 मार्च 2022

 

सरकारी ई मार्केटप्लेसने  (GeM)  आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये  1 लाख कोटीं रुपये  वार्षिक खरेदीचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ 160% आहे.  या प्रसंगी माध्यमांना संबोधित करताना जीईएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार सिंग म्हणाले की, स्थापनेपासून एकत्रित सकल व्यापार मूल्य  (GMV) साडेचार वर्षात  23 मार्च 2021 रोजी 1 लाख कोटींवर पोहोचले आहे, तर चालू आर्थिक वर्षात जीईएमचे सकल व्यापार मूल्य  एका वर्षापेक्षा कमी कालावधीत 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.  गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ 160% आहे.  आज सकाळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल ट्विट केले होते.

सिंग पुढे म्हणाले की पोर्टलने भारतातील सार्वजनिक खरेदीचे तीन स्तंभ -समावेशकता , वापर क्षमता  आणि पारदर्शकता तसेच कार्यक्षमता आणि खर्चात बचत यात मोठे परिवर्तन घडवून आणले आहे. चालू आर्थिक वर्षात पोर्टलवरील मागण्यांची संख्या 22% वाढीसह 31.5 लाखांच्या पुढे गेली आहे. 5 वर्षांच्या अल्पावधीत,जीईएम हे जगातील सर्वात मोठ्या  सरकारी ई-खरेदी  मंचांपैकी एक बनले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या हिश्शाबाबत सिंह म्हणाले की, अंदाजे  43,000 कोटी रुपये किमतीची खरेदी  (एकूण जीएमव्हीच्या ~ 43%) सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांद्वारे जीईएमवर केली गेली, जी गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत अंदाजे 508% अधिक आहे. त्यांनी असेही नमूद केले  की एकूण जीएमव्हीच्या 30%  योगदानासह राज्ये आजही महत्वपूर्ण हितधारक  आहेत.

सरकारी खरेदीमध्ये समावेशकता आणण्यात जीईएमने  बजावलेली  भूमिका अधोरेखीत करत सिंह म्हणाले की, जीईएमने बचत गट  (SHGs), आदिवासी समुदाय, कारागीर, विणकर आणि एमएसएमईची उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.  जीईएमवरील एकूण व्यवहारांपैकी 57% व्यवहार एमएसएमई कंपन्यांच्या माध्यमातून झाले आहेत. आणि  6% पेक्षा जास्त महिला उद्योजकांचे योगदान आहे. जीईएमवर महिला विक्रेते आणि उद्योजकांची संख्या एका वर्षात 6 पटीने वाढली आहे.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1809393) Visitor Counter : 220


Read this release in: Telugu , English , Hindi