दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
महाराष्ट्राच्या मुख्य पोस्ट मास्टर जनरल यांनी ‘फ्लेमिंगो’पक्ष्यांवर आधारित विशेष टपाल तिकिटाचे केले अनावरण
Posted On:
22 MAR 2022 9:49PM by PIB Mumbai
मुंबई, 22 मार्च 2022
आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त महाराष्ट्र मंडळाच्या मुख्य पोस्ट मास्टर जनरल वीणा आर.श्रीनिवास यांनी आज ‘फ्लेमिंगो’ पक्ष्यांवर आधारित ‘फ्लेमिंगोज- मुंबईचे विलोभनीय हिवाळी पाहुणे’ या विषयावरील विशेष टपाल तिकीट जारी केले. मुंबईच्या खारफुटी विभागाचे अतिरिक्त मुख्य वन संवर्धन प्रमुख वीरेंद्र तिवारी हे देखील या वेळी उपस्थित होते.

प्रत्येक हिवाळ्यात एक लाखाहून अधिक लहान मोठे फ्लेमिंगो पक्षी स्थलांतर करून मुंबईत येतात. मोठे फ्लेमिंगो 5 फुट उंच आणि पांढरट-गुलाबी रंगाचे असतात तर लहान फ्लेमिंगो 3 फुट उंचीचे आणि गडद गुलाबी रंगाचे असतात.

तसेच, ‘महाराष्ट्र आणि गोव्यातील पक्षीविषयक वैविध्य’ या विषयावरील 10 चित्रांच्या पोस्टकार्डचा समावेश असलेला विशेष संग्रह, बिबट्याच्या पाच चित्रांची पोस्टकार्डे आणि दृक्श्राव्य तथ्ये यांचे देखील यावेळी अनावरण करण्यात आले. हे सर्व संग्रह फिलाटेलिक ब्यूरॉक्स ऑफ मुंबई जीपीओ, पणजी मुख्यालय (गोवा), नाशिक मुख्यालय, औरंगाबाद मुख्यालय, पुणे मुख्यालय आणि नागपूर जीपीओ येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
मुंबई विभागाच्या मुख्य पोस्ट मास्तर स्वाती पांडे, आणि मुंबईच्या खारफुटी संवर्धन पथकाचे वन उप-संवर्धन अधिकारी आदर्श रेड्डी तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकार्जुन हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
R.Aghor/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1808424)
Visitor Counter : 185