सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
खासदार औद्योगिक महोत्सव
Posted On:
13 MAR 2022 7:28PM by PIB Mumbai
नागपूर, 13 मार्च 2022
केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या एमएसएमई- विकास संस्था नागपूर, तर्फे एम.आय.ए. हाऊस, हिंग़णा एमआयडीसी परिसर येथे 12 ते 14 मार्च दरम्यान आयोजित खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसादरम्यान विदर्भातील विविध उद्योग संघटनांच्या संयुक्त विद्यमाने, विदर्भातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य/संचालक आणि प्राध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महाविद्यालयांचा मोठा प्रतिसाद मिळाला. व्हीएनआयटी, वायसीसीई, आरसीओईएम, एसबी जैन महाविद्यालय, सेंट व्हिन्सेंट पलोट्टी, जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय, सीआयपीईटी, औरंगाबाद, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था यांचे प्राचार्य यावेळी उपस्थित होते.

या चर्चासत्रात आणि माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, हेमंत गोडसे, खासदार, नाशिक हे प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पी.एम.पार्लेवार, संचालक (महाराष्ट्र), एमएसएमई-डीआय, नागपूर आणि अध्यक्षस्थानी श्री सी.जी.शेगावकर, अध्यक्ष, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, हिंगणा, नागपूर होते
प्रारंभी श्री.पी.एम.पार्लेवार यांनी याप्रसंगी उद्योग-संस्थांच्या बांधणीमुळे विदर्भाच्या औद्योगिकीकरणात मोठी मदत होऊ शकते. अभियांत्रिकी महाविद्यालयांनी विशेषत: इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि डिझाइन कल्पनांवर भर दिला पाहिजे असे सांगितले. त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना त्यांची मते व सूचना मांडण्यास सांगितले.
डॉ. सुभाष भामरे, म्हणाले की, जीडीपीच्या योगदानाच्या दृष्टीने एमएसएमई हे कृषी क्षेत्रापुढील महत्त्वाचे क्षेत्र आहे. या प्रदेशाच्या विकासासाठी आणि औद्योगिकीकरणासाठी तंत्रज्ञान हस्तांतरण हाच मंत्र असल्याचे ते म्हणाले.
डॉ. पडोळे, प्राचार्य, व्हीएनआयटी म्हणाले की व्हीएनआयटी संस्था गेल्या 10 ते 15 वर्षांपासून एमएसएमई आणि खादी ग्रामोद्योग महामंडळाशी जोडलेले आहे. इन्क्युबेशन हा सर्व संस्थांचा एक महत्त्वाचा पैलू बनवला गेला पाहिजे आणि उद्योजकतेवर एक विषय असला पाहिजे जो पहिल्या वर्षापासूनच अनिवार्य केला पाहिजे, असे त्यांनी सुचवले.
या औद्योगिक महोत्सवादरम्यान विद्यमान आणि संभाव्य उद्योजकांसाठी कर्ज मेळा देखील आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या चार राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रतिनिधींनी गुणवत्तेच्या आधारावर कर्ज प्रकरणांचा विचार केला.
सर्व संभाव्य आणि विद्यमान उद्योजकांना, अभियांत्रिकी महाविद्यालयांचे तसेच स्टार्ट अप मध्ये सहभागी विद्यार्थी या उद्योजकतेच्या संधीचा लाभ घेण्यासाठी या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
S.Rai/D.Wankhede/P.Malndkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805569)
Visitor Counter : 246