विशेष सेवा आणि लेख
सामाजिक, आर्थिक, शारीरिक आव्हानांवर मात करत 'नारीशक्ती'ची यशस्वी वाटचाल!
Posted On:
11 MAR 2022 11:50AM by PIB Mumbai
- सोनल तुपे
'अपयश ही यशाची पहिली पायरी असते', असं खरंतर म्हंटल जातं. पण आपल्यापैकी अनेकांना अपयशाचीच इतकी भीती असते की त्या भीतीपायी आपण काही गोष्टी करायला धजावतच नाही, किंवा त्या मध्येच सोडून तरी देतो. पण काहीजण मात्र हे धाडस करतात आणि त्यात यशस्वी देखील होतात. आणि या यशामागचं कारण म्हणजे भीतीवर धाडसाने केलेली मात! आयुष्यात यशाची पायरी चढण्यासाठी संघर्ष करण्याचे.. मोठी ध्येय साध्य करण्याचे या व्यक्ती धाडस करतात. असंच धाडस करत विविध आव्हानांवर मात करत यशाची वाटचाल केलीय आपल्या नारीशक्ती पुरस्कार विजेत्या महिलांनी!
नुकतंच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती, रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात ‘नारी शक्ती पुरस्कार’ - 2020 आणि 2021 प्रदान केले. महाराष्ट्रातील तीन महिलांना राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सायली नंदकिशोर आगवणे (नारी शक्ती पुरस्कार, 2020) वनिता जगदेव बोऱ्हाडे (नारी शक्ती पुरस्कार, 2020) आणि कमल कुंभार (नारी शक्ती पुरस्कार, 2021) यांनी आपल्या या अतुलनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राची मान आणखी उंचावली आहे.
तीव्र इच्छाशक्ती, निश्चय आणि समर्पण - सायली नंदकिशोर आगवणे
सायली नंदकिशोर आगवणे, या दिव्यांग कथ्थक नृत्यांगनेला 2020 च्या नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अत्यंत विपरित परिस्थितीत, भारतीय शास्त्रीय नृत्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार, प्रसार करण्याच्या कमी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
जन्मतःच डाऊन सिंड्रोम या जनुकीय आजाराने सायली ग्रस्त आहे. हा आजार केवळ शारीरिकच नाही, तर एकूण व्यक्तिमत्वाचा विकास खुंटवणारा असतो. मात्र हा आजार देखील सायलीची नृत्य शिकण्याची जिद्द कमी करु शकला नाही. कदाचित कुणाला नृत्यकला फारशी कठीण वाटणार नाही, मात्र, नृत्य करताना तन आणि मनाचा उत्तम समतोल आणि एकाग्रता हवी असते. त्यांच्यातील आंतरिक शक्तीमुळेच तिला नृत्त्य करण्याची प्रेरणा मिळाली, असे सायली नंदकिशोर हिने पत्र सूचना कार्यालयाशी बोलताना सांगितलं.
सायली जेव्हा केवळ 9 वर्षांची होती. त्यावेळीच तिने, तिची बहीण आणि इतर 200 सर्वसामान्य मुलींसोबत ‘कथ्थक’ शिकायला सुरुवात केली. तेव्हापासून तिने अनेक व्यासपीठांवर नृत्यकला सादर केली आहे, यात टीव्हीवरच्या अनेक स्पर्धात्मक कार्यक्रमांचाही समावेश असून, तिने अनेक बक्षिसेही जिंकली आहेत. “माझ्यासारखी दिव्यांग मुलगी सुद्धा आयुष्यात यश मिळवू शकते, हे मी सिद्ध केले असून दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी माझी जिद्द प्रेरणादायी ठरू शकेल” असे सायली अभिमानाने सांगते.
सायलीने पाश्चात्य नृत्याचेही प्रशिक्षण घेतले असून, हृतिक रोशन, माधुरी दीक्षित आणि शामक डावर हे तिचे आवडते नृत्यकलावंत आहेत. एक नृत्यांगना म्हणून आपल्या कलेत अधिकाधिक प्रावीण्य मिळवण्यासाठी नियमित सराव करण्यावर तिचा गाढ विश्वास आहे. “सरावामुळे व्यक्ती निपुण होते. मी अशा गाण्यांचा सराव करते, ज्यांच्यावर आधीच नृत्ये बसवण्यात आली आहेत. मी दररोज किमान 2 तास तरी नृत्य सराव करते”, असे तिने सांगितले.
सायलीचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, अडथळे पार करण्याची तिची इच्छा आणि क्षमता हेच तिचे संचित नाही, तर तिच्यासारख्या अनेकींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत करण्याची तिची वृत्ती आहे. ती सध्या सुमारे 100 दिव्यांग मुलांना नृत्य प्रशिक्षण देते आहे. काही शाळांशी संलग्न होऊन, तिथेही ती दिव्यांग मुलांना नृत्यप्रशिक्षण देते आहे. “नृत्यामुळे मला समजले की माझ्यासारखी दिव्यांग मुलं देखील नृत्यकला शिकू शकते. म्हणून मी या क्षेत्रात माझे पूर्ण समर्पण दिले. आता मला माझ्यासारख्या दिव्यांग मुलांनाही असा आनंद मिळवताना बघायचे आहे. हे माझे समाजासाठी एक छोटेसे योगदान असेल.“, असे तिने सांगितले.
युवा पिढीला काय संदेश देशील, असे विचारले असता, सायली म्हणाली. “तीव्र इच्छाशक्ती, निश्चय आणि समर्पण खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणतेही करीयर निवडलेत, तरी, त्यात संपूर्ण समर्पण देऊन कष्ट करा आणि आपली स्वप्ने पूर्ण करा.”
पर्यावरण हेच जीवन आहे! चला, त्याचे संरक्षण करूया आणि जोपासना करूया!! - वनिता जगदेव बोराडे
वन्यजीव संवर्धनासाठी, विशेषतः सर्पजातीला सुरक्षित ठेण्यासाठी आणि याविषयी समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल वनिता जगदेव बोराडे यांना नारी शक्ती 2020 या पुरस्काराने गौरविण्यात आले.
समाजात प्रचलित असलेल्या अनेक प्रकारच्या भितींपैकी आपल्या सर्वांच्याच मनात असणारी भीती म्हणजे ओफिडीयोफोबिया म्हणजेच सापांची भीती. अगदी निपचित पडलेला किंवा अजिबात हालचाल न करणारा साप आपल्या दृष्टीस पडला तरी आपण घाबरून जातो. मात्र वनिता जगदेव बोराडे यांच्या बाबतीत ते खरे नाही. सापांना पकडून वाचविणारी जगातील त्या पहिली महिला आहेत आणि त्यांनी आतापर्यंत 51,000 सापांना सुरक्षितपणे वाचवून जीवदान दिले आहे. “मी 10 वर्षांची होते तेव्हापासून सापांना पकडत आहे आणि आतापर्यंत गेल्या 35 वर्षांत मी 51,000 सापांना सुरक्षितपणे पकडून त्यांना जीवदान दिले आहे. जगात सर्वाधिक संख्येने साप पकडण्याचा जागतिक विक्रम माझ्या नावावर आहे. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे,” असे त्यांनी मुंबईच्या पत्रसूचना कार्यालयाशी बोलताना सांगितले.
सापांच्या विषयातील अज्ञान आणि सापांच्या बाबतीत समाजात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा हीच अनेक लोकांनी भीतीपोटी सापांना मारून टाकण्याची मुख्य कारणे आहेत असे त्यांनी सांगितले. “आपली संस्कृती सर्व प्राणिमात्रांप्रती अहिंसा, करुणा आणि जीवदया म्हणजे प्रेम आणि दयाळूपणा दाखविण्याची शिकवण आणि उपदेश देते.” आणि हाच सापांचा बचाव करण्याचे प्रयत्न करण्यामागील मुख्य भाव आहे असे त्या सांगतात. त्या म्हणतात “मी सापांच्या जिवासोबतच लोकांचा जीव वाचविण्याचे कार्य करते.” वनिता सर्पमित्र म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
लहानपणापासून शेतात काम करतच मोठं झालेल्या वनिता यांच्या लहानपणीच्या सवंगड्यांपैकी बहुतेक जण आदिवासी भागातील होते. त्यांच्याकडूनच त्या निसर्गाशी एकरूप होऊन जगायला आणि या धरतीवर असलेल्या प्रत्येक सजीवाला जपायला शिकल्या. “लहानपणी मिळालेल्या धड्यांमुळेच मी निसर्गाचे जतन करायला, विशेषतः आपली राष्ट्रीय संपत्ती असलेल्या सापांचा बचाव करायला शिकले. मी या लहान जीवांसोबतच पर्यावरणालाही सुखी करत आहे असा विश्वास मला वाटतो,” त्या अभिमानाने सांगतात. सापांसोबत त्या मधमाशांचे संरक्षण करण्याचे देखील कार्य करतात. सर्प संवर्धनासंबंधी संशोधन करणारी पहिली महिला या भूमिकेतून त्या साप आणि त्यांचे जतन याविषयी समाजात जागरुकता निर्माण करत आहेत. “भारतातील 90% साप बिनविषारी आहेत. अंधाऱ्या आणि सुरक्षितता वाटेल अशा जागी साप लपून बसतात आणि त्यांना दुखापत केल्याशिवाय ते स्वतःहून कोणावर हल्ला करत नाहीत अथवा दंश करत नाहीत,” अशी माहितीही त्यांनी दिली. आपल्याकडे सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये सर्पदंशावरील औषधे मोफत उपलब्ध असतात अशी त्यांनी सांगितलं. “सर्पदंशावरील औषध साप चावलेल्या रुणाला तातडीने आराम मिळवून देते आणि म्हणून साप चावला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही.”, असा सल्लाही त्यांनी दिला. सापांविषयी समाजात प्रचलित अंधश्रद्धा निपटून काढून लोकांच्या मनातील सापांची भीती घालवता येईल असा त्यांना विश्वास वाटतो. सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे प्रशिक्षण देखील त्या देत आहेत.
आपण एकाच वेळी किमान तीन व्यवसाय केले पाहिजेत - कमल कुंभार
सामाजिक उद्योजिका, कमल कुंभार यांना नारी शक्ती पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले आहे. पशुपालन क्षेत्रात महिला स्वयंउद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी दिलेल्या उत्तम योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. गरिबीशी लढा देत कोमल कुंभार वयाच्या 23 व्या वर्षी उद्योजिका झाल्यात. त्यासाठी त्यांनी स्थानिक स्तरावरील कृषी संलग्न संस्थांकडून प्रशिक्षण घेतले आहे. जेव्हा त्यांनी आपला उद्योग सुरु केला, तेव्हा त्यांना, उद्योग चालवणे, उत्पादनांचे विपणन, जाहीराती आणि त्यात येणारे अडथळे याविषयी काहीही माहिती नव्हती. हे सगळे ज्ञान त्यांनी आपल्या अनुभवातून मिळवले. त्यांनी स्वतःचे एक सूक्ष्म- व्यावसायिक जाळे देखील निर्माण केले आणि त्यांच्यासारख्या महिलांना सक्षम करत स्वयंउद्योजिका होण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्या ‘कमल कुक्कुटपालन आणि एकता शक्ती उत्पादन कंपनी’ च्या संस्थापक असून, या माध्यमातून त्यांनी उस्मानाबाद सारख्या दुष्काळी प्रदेशात 3000 महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. मुंबईच्या पत्रसचना कार्यालयाशी संवाद साधतांना त्यांनी सांगितले की, “कोणत्याही उद्योजकाने केवळ एकच व्यवसाय करू नये, तर एकावेळी किमान तीन तरी व्यवसाय करावेत, म्हणजे प्रत्येक व्यवसायात असणारा नफा-तोट्यातला समतोल साधता येईल.” त्या स्वतः एकावेळी पाच व्यवसाय सांभाळत असून त्यात गांडूळ खत प्रकल्पाचाही समावेश आहे. कमल कुंभार आपले अनुभव सांगतांना म्हणाल्या की, एखाद्याला त्या व्यवसायात रुची असेल, आणि त्याला व्यवसायाचे योग्य नियोजन करता येत असेल, तर त्याला यश नक्की मिळेल. आपल्या स्थानिक प्रदेशातील किंवा गावातील लोकांच्या मागण्या आणि संधी नेमक्या काय आहेत, हे समजून घ्या आणि त्यानुसार बाजाराचा आढावा घ्या, असा सल्ला त्यांनी महिला उद्योजिकांना दिला. नारी शक्ती पुरस्कार मिळाल्याबद्दल, त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्या म्हणाल्या की या पुरस्कारामुळे त्यांना अधिक प्रेरणा आणि उत्तेजन मिळाले असून त्यांचे काम अधिक परिश्रमपूर्वक आणि अधिक उर्जेने करण्याची ताकद मिळाली आहे. तसेच, महिला उद्योजिका होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात त्यांना या पुरस्काराने प्रेरणा मिळाली आहे. भविष्यातील आपल्या स्वप्नांविषयी सांगताना त्या म्हणाल्या, "मला 9000 महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण द्यायचे आहे आणि पुढच्या दोन वर्षात त्यांच्यापैकी 5000 जणींना स्वयंउद्योजिका बनवण्यास प्रोत्साहन द्यायचे आहे.” आपल्या या पुरस्काराचे श्रेय त्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याला दिले असून, त्यांच्यासारख्या अनेक महिलांना उद्योजिका बनवण्याची त्यांची जिद्द त्यांना प्रेरणा देणारी आहे.
***
सोनल तुपे ह्या पत्र सूचना कार्यालय, मुंबई येथे माहिती सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805001)
Visitor Counter : 546