अर्थ मंत्रालय
सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाने बनावट आयटीसी आणि खोटे बिलिंग करणाऱ्या व्यावसायिकाला केली अटक
Posted On:
10 MAR 2022 3:14PM by PIB Mumbai
मुंबई, 10 मार्च 2022
बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या एका व्यावसायिकाला सीजीएसटी मुंबई विभागाच्या भिवंडी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. अद्वैत, ई-वे बिल पोर्टल इत्यादी विविध डेटा अॅनालिटिक्स टूल्सचा वापर करून मुंबई सीजीएसटी विभागाच्या भिवंडी सीजीएसटी कर चुकवेगिरी प्रतिबंधक विभागाने हे उघडकीस आणले. तपासादरम्यान आढळून आले की, व्यावसायिकाने त्याच्या नावे दोन कंपन्या उघडल्या, ज्याद्वारे त्याने एकूण 20.44 कोटी रुपयांच्या आयटीसीचा लाभ घेतला आणि त्याचा वापर केला. आतापर्यंत केलेल्या प्राथमिक तपासात एकूण 32.5 कोटी रुपयांच्या मालाची वाहतूक न करता बनावट आयटीसी वापरून 5.74 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवल्याचे उघड झाले आहे.
खोटे बिलिंग आणि बनावट आयटीसी इतरांना देऊन सरकारचा महसूल बुडवणाऱ्या करदात्याच्या निवासी जागेची झडती घेण्यात आली. प्राथमिक तपासात असे दिसून आले की कंपनीने फसवणूक करून अस्तित्त्वात नसलेल्या/बनावट पुरवठादारांकडून प्रत्यक्ष माल न घेता 5.74 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवले होते. मेसर्स एनएस फार्मा केम आणि मेसर्स निऑन फार्मा केम या दोन कंपन्यांचा तो मालक आहे. करदात्याने कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत ज्यानुसार आयटीसीचा दावा केला गेला आणि इतरांना देण्यात आला. सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 अन्वये 9.03.2022 रोजी त्याला अटक करण्यात आली आणि आज अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, फोर्ट, मुंबई, यांच्यासमोर हजर करण्यात आले. आरोपीला 22.03.2022 पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
देशाच्या आर्थिक परिसंस्थेला हानी पोहोचवणाऱ्या आणि सरकारी तिजोरीची फसवणूक करत बनावट आयटीसी मिळवणारे जाळे उध्वस्त करण्याचे सीजीएसटी मुंबई विभागाकडून प्रयत्न सुरु असून ही मोहीम त्याचाच एक भाग आहे. गेल्या सहा महिन्यांत भिवंडी आयुक्तालयाने केलेली ही सातवी अटक आहे. येत्या काही महिन्यांत विभाग बनावट आयटीसी जाळे आणि जीएसटी चुकवणाऱ्या इतरांविरोधात मोहीम अधिक तीव्र करेल.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804725)
Visitor Counter : 170