पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे दौऱ्यात उद्घाटन केलेल्या प्रकल्पांविषयी

Posted On: 06 MAR 2022 3:41PM by PIB Mumbai

 

पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

पंतप्रधानानी आज सकाळी सर्वप्रथम पुणे महानगरपालिकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. सुमारे 9.5 फूट उंची असलेला  हा पुतळा बनवण्यासाठी 1850 किलोग्रॅम गन मेटलचा वापर केला आहे.

 

पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन- मेट्रोचे पुणेकरांचे स्वप्न पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे आज  उद्घाटन झाले.

एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे  उद्घाटन आज  पंतप्रधानानी  केले .  संपूर्ण प्रकल्प 11,400 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून बांधला जात आहे.

खालील टप्पे  आज सुरु करण्यात आले

वनाझ - गरवारे कॉलेज (5 स्थानकांसह  5 किमीचा  उन्नत मार्ग)

पीसीएमसी  - फुगेवाडी  (5 स्थानकांसह 7 किमीचा  उन्नत मार्ग)

उल्लेखनीय बाब म्हणजे, गरवारे स्थानक  ते आनंद नगर दरम्यान मेट्रो  प्रवास सुरू करण्यापूर्वी पंतप्रधानांनी पुणे मेट्रोचे पहिले तिकीट देखील काढले

या प्रवासादरम्यान त्यांनी युवा विशेषतः दिव्यांग  मुला मुलींशी संवाद ही साधला.

24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती.

पुण्यातील नागरी वाहतुकीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे.

देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरी भागांपैकी एक असलेल्या पुणे महानगर क्षेत्रात मेट्रोमुळे शहरी वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल

 

मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारण प्रकल्प

मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारण प्रकल्पाची  पायाभरणीही  पंतप्रधानांच्या हस्ते झाली. या नद्यांच्या 9 किमी लांबीच्या  पट्ट्याचे  1080 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पुनरुज्जीवन केले जाणार आहे.  यामध्ये नदीकाठाचे  संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन (इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क), सार्वजनिक सुविधा, नौकाविहार सुविधा इत्यादी कामांचा समावेश आहे.

मुळा-मुठा नदीचे  प्रदूषण कमी करण्यासाठी एक शहर एक ऑपरेटर या संकल्पनेवर आधारित प्रकल्पासाठी 1470 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाची तरतूद केली असून यात  बांधकामपरिचालन खर्चआणि 15 वर्ष कालावधीसाठी  देखभाल दुरुस्ती यांचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 11 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जाणार आहेत. यात सुमारे  55 किमी लांब सांडपाणी वाहक पाईपलाईनचा समावेश असून त्यांची एकत्रित क्षमता सुमारे 400 एमएलडी  तर प्रत्येक सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची क्षमता 396 दशलक्ष एमएलडी इतकी आहे. अहमदाबादमधील  साबरमती रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या धर्तीवर पुणे महानगरपालिका  रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प राबवणार आहे.

जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी, JICA द्वारे निधी पुरवठा केला जाणारा हा प्रकल्प अंदाजे 3 वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 

पुणे शहराच्या स्वच्छ आणि हरित वाहतुकीच्या दिशेने

पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातील हरित शहरी  गतिशीलतेला चालना देत 150 इलेक्ट्रिक बसेसच्या ताफ्याचे लोकार्पण केले.  बाणेर येथे चार्जिंग स्टेशनसह सुसज्ज इलेक्ट्रिक बस डेपोचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.

आर के लक्ष्मण आर्ट गॅलरी

पुण्यात बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले . या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण म्हणजे मालगुडी गावावर आधारित छोटेखानी प्रतिकृती (मॉडेल) आहे जी ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून जिवंत केली आहे. व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनी काढलेली व्यंगचित्रे संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आली  आहेत.

 

सिम्बॉयसिस आरोग्य धामचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

सिम्बॉयसिस  विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आणि त्यांनी  सिम्बॉयसिस आरोग्य धाम या  एकात्मिक आरोग्य संकुलाचे उद्घाटन केले. डॉ. एस बी मुजुमदार यांनी स्थापन केलेल्या सिम्बॉयसिसची सुरुवात ,ही आंतरराष्ट्रीय समज आणि बंधुत्वाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनेपरदेशी आणि भारतीय विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने, एक छोटे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र म्हणून झाली होती. आज या एका  बहु-स्थानीय शैक्षणिक संस्थेचे जाळे  पुणे, नाशिक, नागपूर, बंगळुरू, हैदराबाद आणि नोएडा  र्यंत  पसरले आहे. सिम्बॉयसिसमध्ये भारतातील सर्व राज्यांमधील आणि 85 विविध देशांतील 45,000 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

'सिम्बॉयसिस आरोग्य धाम', हे लव्हाळे, पुणे येथील सिम्बायोसिस आंतराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) विद्यासंकुलात 70 एकर जागेवर उभारण्यात आले आहे. आरोग्य धाममध्ये; सिम्बॉयसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन; या महिला  वैद्यकीय महाविद्यालयाचा  समावेश आहे, हे महाविद्यालय महाराष्ट्र राज्यातील,

पहिले मुलींसाठीचे पूर्णतः निवासी वैद्यकीय महाविद्यालय आहे. 900 खाटांचे सिम्बॉयसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र (एसयूएचआरसी) या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न आहे.आरोग्य विज्ञान, जीवशास्त्र, क्रीडा विज्ञान, नर्सिंग, योग आणि भावनिक आरोग्य इत्यादी संस्था/ विद्याशाखा देखील एकात्मिक आरोग्य धाममध्ये आहेत.

'मोबाइल मेडिकल व्हॅन' या फिरत्या वैद्यकीय वाहनाच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी आणि सिम्बॉयसिस ग्रामीण डिजिटल साक्षरता प्रयोगशाळेद्वारे डिजिटल साक्षरता प्रदान करण्यासाठी विद्यापीठ परिसराच्या आसपासची 23 गावे सिम्बॉयसिसने दत्तक घेतली आहेत.

***

JPS/SK/SC/PK

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1803353) Visitor Counter : 275


Read this release in: English