परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
एअर इंडिया एक्सप्रेसच्या दोन विशेष विमानांतून बुखारेस्ट आणि बुडापेस्ट येथून 369 भारतीय नागरीक मुंबई येथे दाखल
Posted On:
04 MAR 2022 5:25PM by PIB Mumbai
मुंबई, 4 मार्च 2022
एअर इंडियाची दोन विशेष विमाने आज (शुक्रवार, 4 मार्च 2022) रोजी 369 भारतीय नागरिकांना घेऊन मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल झाली.
पहाटे 2 वाजता एअर इंडियाच्या IX 1204 विमानातून दाखल झालेल्या 185 प्रवाशांचे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी स्वागत केले. हे विमान बुखारेस्टवरुन शुक्रवारी मुंबईसाठी रवाना झाले होते.
विमानतळावर रावसाहेब पाटील दानवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी सरकारतर्फे विमानतळावर विविध राज्यांकडून स्थापन करण्यात आलेल्या मदतकक्षांची माहिती दिली. तसेच रेल्वेने विद्यार्थ्यांना आपापल्या गावी परतण्यासाठी रेल्वे आरक्षणाची सुविधाही विमानतळावर उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले. सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांवर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केल्याचे रावसाहेब दानवे यांनी ट्वीट संदेशातून सांगितले.
बुडापेस्टवरुन 184 प्रवाशांची दुसरी तुकडी दुपारी 12.00 वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाली. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी प्रवाशांचे स्वागत केले. सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी सुरक्षित परत आणणे, याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे नक्वी यांनी ट्वीट संदेशातून सांगितले.
ऑपरेशन गंगा मोहिमेअंतर्गत विमानांची संख्या वाढवण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने C-17 ग्लोबमास्टर या विमानाच्या 7 उड्डाणांनातून 1,428 भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले आहे. हवाई दलाची सर्व विमाने दिल्लीनजीकच्या हिंडन हवाई तळावर उतरली.
पराष्ट्र व्यवहार मंत्रालायाचा नियंत्रण कक्ष, तसेच युक्रेन, पोलंड, रोमानिया हंगेरी आणि स्लोव्हाक गणराज्य येथील भारतीय दूतावासांद्वारे संचालित नियंत्रण केंद्रे 24x7 कार्यरत आहेत.
***
PIBMum/Jaydevi PS/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1802971)
Visitor Counter : 235