परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी पुणे येथे साधला संवाद


युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील - व्ही. मुरलीधरन

पुणे येथील “दिशा” बैठकीत घेतला केंद्र पुरस्कृत योजनांचा राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी घेतला आढावा

Posted On: 02 MAR 2022 7:13PM by PIB Mumbai

पुणे, 2 मार्च 2022

 

 

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी पुणे येथे  संवाद साधला. सर्व भारतीयांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि या प्रयत्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बारकाईने लक्ष आहे, असे त्यांनी सांगितले. युक्रेनमधून भारतीयांची सुटका करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांची विद्यार्थ्यांच्या पालकांनीही प्रशंसा केली.  

युक्रेनमध्ये सुमारे 20,000 भारतीय  नागरिक अडकून पडले होते. त्यापैकी 4,000 नागरिक 24 फेब्रुवारीपूर्वी भारतात परत आले. मंगळवारपर्यंत अतिरिक्त 2,000 विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आले असून तेथे अडकलेल्या उर्वरित भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. अडकून पडलेल्या नागरिकांची  संख्या मोठी असल्याने, युक्रेनच्या  शेजारील देश रोमानिया, पोलंड, हंगेरी आणि स्लोव्हाकिया यांच्या मदतीने या नागरिकांना  भारतात परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या विमानांचा वापर केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले. 

केंद्र शासनाच्या निधीतून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावाही राज्यमंत्री तथा पुणे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे (दिशा) अध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांनी आज पुण्यात घेतला. 

केंद्रपुरस्कृत 54 योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये पुणे मेट्रो, भारतमाला, प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजना, गरीब कल्याण अन्न योजना, अमृत योजना, नदी सुधार प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रामीण अभियान, भारत नेट, जलजीवन मिशन, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, बेटी बढाओ बेटी पढाओ, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना, मुद्रा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी सिंचन योजना, सर्व शिक्षण अभियान, राष्ट्रीय हरित भारत अभियान आदी योजनांचा समावेश आहे.

स्मार्ट सिटी योजनेच्या आढावा घेताना स्मार्ट सिटीच्या कामांच्या अंमलबजावणीमध्ये लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेतल्या जाव्यात. त्यातून चांगली कामे सुचवली जातात. त्यामुळे बोर्ड बैठकीला महत्व देतानाच सल्लागार समितीची बैठकही नियमितपणे घेण्यात यावी, असे निर्देश मुरलीधरन यांनी दिले.

बैठकीसाठी खासदार, श्रीरंग बारणे, ऑनलाईन माध्यमातून प्रकाश जावडेकर, गिरीष बापट, श्रीमती सुप्रिया सुळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

 

* * *

DIO | PIB Pune-M.Iyengar/S.Thakur/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1802414) Visitor Counter : 172


Read this release in: English