संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदल गोवा महोत्सवात सहभागी

Posted On: 01 MAR 2022 3:46PM by PIB Mumbai

गोवा, 1 मार्च 2022

 

भारतीय नौदलाने 28 फेब्रुवारी 2022 रोजी गोव्यात वास्को-द-गामा येथे सुरु असलेल्या गोवा महोत्सवात भाग घेतला. नौदलाच्या जवानांनी यावेळी चित्ररथ प्रदर्शित करून, छोटेखानी प्रहसन आणि वाद्यमेळ्याचे बहारदार सादरीकरण केले.

भारतीय नौदलाने सादर केलेल्या चित्ररथावर उभय उपयोगासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘आयएनएस जलाश्व’ या मालवाहतूक जहाजाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. कोविड-19 आजाराला गंभीर जागतिक महामारी म्हणून घोषित केल्यानंतर भारतात तसेच भारताबाहेर राहणाऱ्या असंख्य भारतीयांना दिलासा देण्यासाठी, आवश्यक ती सर्व मदत तसेच वैद्यकीय सहाय्य पुरविण्याच्या हेतूने भारतीय नौदलाने सुरु केलेल्या ‘समुद्र सेतू’ अभियानात या जहाजाने महत्त्वाची भूमिका निभावली.

या महामारीच्या काळात  भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणणे, मित्र देशांना वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन पुरविणे तसेच ‘व्हॅक्सिन मैत्री’ उपक्रमाअंतर्गत या देशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या 170 दशलक्ष मात्रा पुरविणे या केंद्र सरकारच्या प्रादेशिक मदत मोहिमेला पाठींबा देण्यात भारतीय नौदलाने दिलेल्या अभूतपूर्व योगदानाला ठळकपणे दर्शविण्यावर या चित्ररथाच्या मांडणीत भर देण्यात आला. नौदलाच्या हवाई सेवा विभागाला मिळालेल्या राष्ट्रपती ध्वजाचे (प्रेसिडेंट्स कलर) देखील यावेळी प्रदर्शन करण्यात आले.  

या चित्ररथाच्या रचनेत नौदल सप्ताह-2021 च्या  ‘भारतीय नौदल-  सदैव सज्ज, विश्वसनीय आणि लवचिक’ ही संकल्पना प्रतिबिंबित करण्यात आली होती.


* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1802092) Visitor Counter : 255


Read this release in: English