आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

किशोरवयीन वयोगटाचे लसीकरण गरजेचे; कोविड-19 ची लस सुरक्षित


‘किशोरवयीन वयोगट आणि कोविड19 लसीकरण’ या विषयावरील पत्र सूचना कार्यालयाच्या वेबीनार मध्ये तज्ज्ञांनी व्यक्त केले मत

Posted On: 28 FEB 2022 4:45PM by PIB Mumbai

मुंबई, 28 फेब्रुवारी 2022

 

कदाचित आपण  कोरोना महामारीच्या  अंतिम टप्प्यात आहोत, मात्र लोकांनी  प्रतिबंधक लस न घेतल्यास, विषाणू हल्ला करू शकतो; तसेच उत्परिवर्तन होण्याची व रोगप्रतिकारक यंत्रणेपासून बचाव करण्याची संधी या विषाणूला मिळू शकते, ज्यामुळे चौथी लाट येऊ शकते, असे प्रतिपादन डॉ. मृदुला फडके, वरिष्ठ सल्लागार, महाराष्ट्र शासन व युनिसेफ बालआरोग्य यांनी आज केले.

पत्र सूचना कार्यालय, मुंबईने आयोजित केलेल्या ‘किशोरवयीन वयोगट  आणि कोविड19 लसीकरण’ या विषयावरील वेबीनारमध्ये त्या बोलत होत्या.

18 वर्षावरील सर्व पात्र नागरिकांना लस दिल्यानंतर वय वर्ष 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देणे सुरू झाले. आता मार्च नंतर 12 वर्षावरील मुलामुलींना देखील लस दिली जाण्याची तयारीकेली जात असून . यातही सहव्याधी असणाऱ्या, जोखमीच्या मुलांना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती प्रा. प्रवीण कुमार, लेडी हार्डिंज मेडिकल कॉलेज, दिल्ली यांनी या वेबीनारच्या माध्यमातून दिली. प्रा. प्रवीण कुमार देखील तज्ज्ञ मार्गदर्शक  म्हणून या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. 

लसीकरण केले नसले तरीही मुलांसाठी शाळेत जाणे सुरक्षित आहे. आपण आता कोविड19 कमी होण्याच्या टप्प्यात आहोत; तरी ‘एसएमएस’चे पालन केले पाहिजे- शारीरिक अंतर, मास्क घालणे, नियमित हात धुणे, हे झाले पाहिजे. शाळा उघडल्याने होणारे फायदे हे शाळेत जाण्याच्या जोखमीपेक्षा जास्त आहेत असे फडके यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले .

याशिवाय सरकारने अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की किशोरांना कोविड19 लसीकरण करण्यासाठी पालकांच्या संमतीची आवश्यकता नाही. शहर, गाव या ठिकाणी सर्व सरकारी दवाखान्यात मोफत तसेच निवडक खाजगी दवाखान्यात शुल्कासह लस उपलब्ध केलेली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली यावेळी दिली.   

लस घेताना कोणत्याही सांस्कृतिक बंधनात राहू नका. प्राणीजन्य पदार्थांचे सेवन न करणारे (vegans) यांनीही ही लस घेण्यास संकोच करू नये, असे आवाहन डॉ. मृदुला फडके यांनी केले.

मुलांना लशीची ऍलर्जी होऊ शकते का, हे पाहण्यासाठी लस दिल्यानंतर अर्ध तास त्यांना निरीक्षणाखाली ठेवले जाते. गंभीर ऍलर्जी होणार असेल तर, ती अर्ध्या तासातच होण्याची शक्यता असते. पुढील 24 तासात जरी ऍलर्जी झाली तरी, डॉक्टरांना संपर्क साधल्यास मदत मिळू शकते, पण हे अत्यंत दुर्मिळ आहे, अशी खात्री डॉ. मृदुला यांनी दिली.

लशीचे दोन्ही डोस घेऊन  झाल्यानंतर किमान सहा महिन्यासाठी मुलांना संरक्षण मिळणार आहे. कदाचित आठ ते तेरा महीने सुद्धा हे संरक्षण टिकून राहिल. त्यामुळे नि:शंक मनाने लस घ्यावी असे आवाहन डॉ. फडके यांनी केले.

लस दिल्यानंतर ताबडतोब प्रतिकरशक्ती तयार होत नसते. त्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. कोविड होणे , रुग्णालयात दाखल व्हावे लागणे व मृत्यू या तीन गोष्टींविरुद्ध लस मदत करणार आहे. आजारापासून लसीकरण 80 टक्के सुरक्षा देईल, पण मृत्यू व रुग्णालयापासून 90-95 टक्के प्रतिबंध होणार आहे. मुलांचे लसीकरण करून आपण केवळ त्यांचेच नाही तर कुटुंबाचे आणि त्याद्वारे समाजाचेही रक्षण करत आहोत आणि COVAXIN ही मुलांसाठी चांगली लस आहे, असे सांगून डॉ. मृदुला फडके यांनी, पालकांनी पुढे येऊन आपल्या किशोरवयीन मुलांना लसीकरण करण्याचे आवाहन केले.

मुलांना कदाचित त्रास होणार नाही पण, घरातील, जवळील वयस्क, जोखमीच्या मंडळींना सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच स्वत: मुलांना बाधा होऊ नये, म्हणून लस घेणे आवश्यक आहे. या लशीचा प्रभाव मोठ्या काळापर्यंत राहणार आहे. याचे दुष्परिणाम खूप किरकोळ असतील. डोकेदुखी, थोडासा ताप, थोडीशी सर्दी, अंगदुखी अशा स्वरूपाचे त्रास फक्त एक-दोन दिवसासाठी दिसू शकतील. यासाठी काळजी करण्यासारखे काही नाही. लहान मुलांना कोविडचा त्रास दुर्मिळ प्रकरणातच होईल, असे तज्ज्ञ  सांगत असताना त्यांना लस दिली जात आहे, याची भीती पालकांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. फडके यांनी खात्री दिली की लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी आहे. लसीकरणाच्या १५ दिवसांनंतर एखाद्याला कोविड19चा संसर्ग झाला तरीही, रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी असते आणि मृत्यूची शक्यता व्यावहारिकदृष्ट्या नगण्य असते, अशी माहिती डॉ. मृदुला यांनी यावेळी दिली.

कोविडमध्ये लहान मुलांपेक्षा मोठ्यांना त्रास झालेला दिसला. ज्या लहान मुलांना इतर आजार होते, केवळ त्यांना त्रास झाला; त्यामुळे अशा मुलांना आधी लस देणे आवश्यक आहे, अशी माहिती प्रा. प्रवीण कुमार यांनी दिली.

कोविड19 च्या पहिल्या आणि दुसऱ्या  लाटेत लहान मुले देखील बाधित झाली असे दिल्ली, मुंबई मध्ये झालेले सर्वेक्षण सांगते; पण मुलांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आणि रुग्णालयात भरती करण्याची गरज पडली नाही. ही लस विकसित करताना अनेक तपासण्या केल्या गेल्या आहेत. अनेक चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विश्वासाने सांगू शकतो की, लस सुरक्षित आहे, असे प्रा. प्रवीण कुमार यांनी यावेळी सांगितले.

लशीमुळे प्रतिकार शक्ती तयार झालेले लोक आजूबाजूला असतील तर आजार पसरत नाही, यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक ठरते. व्यक्ती, समाज सर्व यामुळे सुरक्षित होतील. आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे, ही विज्ञानचीच कमाल आहे की, इतक्या लवकर आपण लस निर्मिती करू शकलो  आणि कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण  आणू शकलो. सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी लशीची सुरक्षा तपासणी होते, सुरक्षेची हमी आल्यानंतरच लोकांसाठी सरकार अशा लशी वापरात आणते. लहान मुलांसाठी विशेष काळजी घेतली जाते, असेही त्यांनी सांगितले.

पत्रकारितेचे शिक्षण घेणारे, भारतीय जनसंवाद संस्था, अमरावतीचे विद्यार्थी देखील या वेबीनारमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना प्रा. कुमार म्हणाले की, कोविड19 वरील माहितीचा सर्वात योग्य स्त्रोत म्हणजे केंद्र व राज्य सरकारच्या वेबसाइट्स आणि अधिकृत प्लॅटफॉर्म आहेत. इतर कुठल्याही माध्यमातून संभ्रम निर्माण करणारी माहिती घेऊ नये.

कोविडच्या विषाणूचे वारंवार उत्परिवर्तन होते आणि तो  आपले रूप कालांतराने बदलून पुनःपुन्हा येऊ शकतो, असे अभ्यास सांगतो; त्यामुळे कोविड आता निघून जाणार हे आत्ताच म्हणणे घाईचे होईल, असेही ते म्हणाले.

याशिवाय मुलांना आत्तातरी बुस्टर डोसची आवश्यकता नाही, कारण नुकतेच लसीकरण सुरू झाले आहे. पहिले दोन डोस झाल्यानंतरच त्यासाठी विचार करणे शक्य होईल. लस घेतल्यानंतर देखील मास्क लावणे, हात निर्जंतुक करणे, शारीरिक अंतर ठेवणे या गोष्टी करत रहा, असे आवाहन प्रा. प्रवीण कुमार यांनी केले.

सर्व माध्यमातून योग्य माहिती लोकांपर्यंत, पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. किशोरवयीन मुलांसाठी जे लसीकरण सुरू आहे, त्यासंदर्भात पालकांना असलेल्या शंकांचे निरसन व्हावे, हा या वेबिनारचा उद्देश आहे, असे प्रतिपादन पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स यांनी यावेळी केले.

 

* * *

Jaydevi PS/S.Pophale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1801823) Visitor Counter : 469


Read this release in: English