सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते कुडाळ येथे आयोजित “कोकण काथ्या महोत्सवा”चे उदघाटन

Posted On: 25 FEB 2022 7:12PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते कुडाळ येथे आयोजित कोकण काथ्या महोत्सवाचे आज उदघाटन करण्यात आले. काथ्या मंडळाच्या वतीने कुडाळ येथे 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात कोकणातील काथ्या कलाकारांच्या कलाविषयक क्षमतांचे प्रदर्शन करण्यासोबतच संपूर्ण भारतातील काथ्या कारागीरांच्या कलेचे देखील दर्शन घेता येईल. काथ्या मंडळ या प्रदर्शनात विविध उत्पादने, त्यांचे उपयोग आणि त्यांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारी यंत्रे यांच्याविषयी माहिती देखील सादर करत आहे. काथ्या उद्योगाविषयी कोकणात अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी काथ्या मंडळाच्या वतीने महोत्सव कालावधीत विविध कार्यशाळा, चर्चासत्रे, प्रदर्शन फेरी, उद्योजकता विकास कार्यक्रम यांचे आयोजनही करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार आणि केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे आणि काथ्या मंडळ यांच्या दिशानिर्देशांना अनुसरून कोकण विभागात काथ्या उद्योगाचा विकास करण्यासाठी कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

एमएसएमई उद्योग रोजगार संधींची निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असून  देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात मोठे योगदान देत आहेत. काथ्यापासून तयार केलेल्या विविध उत्पादनांच्या उपयोगाबाबत काथ्या उद्योग नवनवे मार्ग शोधून काढत असून संबंधित योजना आणि सेवा लोकप्रिय करून आता या उद्योगाचा विस्तार संपूर्ण देशात होत आहे आणि त्यातून अधिक रोजगार संधींची निर्मिती होत आहे.

 

काथ्या मंडळाविषयी

देशातील काथ्या उद्योगाच्या समग्र शाश्वत विकासासाठी भारत सरकारने काथ्या उद्योग कायदा 1953 अन्वये काथ्या मंडळाची स्थापना केली. या कायद्याअंतर्गत नेमून दिलेल्या मंडळाच्या कार्यामध्ये शास्त्रीय, तंत्रज्ञानविषयक आणि आर्थिक संशोधनासाठी अधिग्रहण, मदत आणि प्रोत्साहन देणे, आधुनिकीकरण, दर्जात्मक सुधारणा, मनुष्यबळ विकास, विपणन प्रोत्साहन आणि या उद्योगाशी संबंधित असलेल्या सर्वांचे कल्याण यांचा समावेश आहे. केरळमधील कोची येथे एम.जी.रस्त्यावरील काथ्या भवन येथे काथ्या मंडळाचे मुख्य कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या अखत्यारीत देशभरातील 29 दुकानांसह एकूण 48 आस्थापना सध्या कार्यरत आहेत. गेल्या 60 वर्षांहून अधिक काळात काथ्या मंडळ, या उद्योगाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत असून, हा उद्योग आज देशातील ग्रामीण भागात आर्थिक विकास घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. अनेक वर्षांपर्यंत काथ्या उद्योग केरळ राज्यात एकवटलेला होता मात्र आता काथ्या मंडळाच्या प्रयत्नांमुळे या उद्योगाची वाढ देशाच्या इतर भागात देखील होताना दिसत आहे.

***

S.Tupe/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1801168) Visitor Counter : 278


Read this release in: English