परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहोळ्याचा भाग म्हणून आयसीसीआरने मुंबईत संध्याकालीन उत्सवाचे केले आयोजन
Posted On:
24 FEB 2022 5:15PM by PIB Mumbai
मुंबई 24 फेब्रुवारी 2022
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीतील आयसीसीआर अर्थात भारतीय सांस्कृतिक नातेसंबंध विषयक मंडळाने मुंबईत नरीमन पॉईंट येथील एनसीपीए अर्थात राष्ट्रीय कला केंद्रामध्ये विविध कलाविष्कार एकत्रितपणे सादर करत नृत्य आणि संगीताने परिपूर्ण संध्याकालीन महोत्सवाचे आयोजन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहोळ्याचा भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात शास्त्रीय नृत्ये, लोककला आणि आदिवासी नृत्यप्रकार तसेच प्रचलित नृत्य प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी महाराष्ट्राचा पारंपरिक नृत्यप्रकार असलेली लावणी, भरतनाट्यम, कथक, भांगडा, गरबा आणि दांडिया या प्रकारांचे नृत्याविष्कार सादर करण्यात आले. देशभरातून आलेल्या नृत्य पथकांनी विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून कार्यक्रमात चैतन्य आणले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आयसीसीआरचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे म्हणाले, “कला हे मुक्त जीवन जगण्याचे साधन आहे आणि म्हणूनच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचा भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.” भारतीय कलाकुसरीचे दर्शन घडविणारा क्राफ्ट मेळा आणि जगभरातील विविध 75 लोकशाही देशांमधून आमंत्रित करण्यात आलेल्या तरुण राजकीय नेत्यांच्या सहभागाने निर्माण झालेले ‘जेन-नेक्स्ट डेमोक्रॅटिक नेटवर्क’ यांसह केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सुरु केलेल्या विविध उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली.
सांस्कृतिक संध्या कार्यक्रमात सादर झालेल्या नृत्य प्रकारांचे आणि नृत्य पथकांचे तपशील:
- मुंबई येथील मुद्रा क्रिएशन्स (लावणी); गुरु:मनीष वाघमारे
- पंजाबी लोककला आणि संस्कृती सोसायटी (पंजाब येथील भांगडा पथक); गुरु: हरदीप सिंग
- बडोदा येथील सिद्धी धमाल पथक; गुरु: बादशाह अल्ताफ
- दिल्ली येथील पंग चोलम पथक; पथक प्रमुख सलाम खोईबा
- अहमदाबाद येथील अविष्कार कलाविष्कार अकादमी (गरबा आणि दांडिया); गुरु:कल्पेश दलाल
- मुंबई येथील नालंदा नृत्य कला महाविद्यालयातील भरतनाट्यम आणि कथक पथके; संचालक: डॉ.उमा रेळे
- मुंबई येथील गौरू शर्मा त्रिपाठी यांचे समकालीन नृत्य पथक
मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती साधना जाधव आणि रेवती डेरे तसेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा प्रगतीशील भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षे आणि भारतातील लोक, संस्कृती आणि यशांचा गौरवशाली इतिहास यांचे स्मरण ठेवून त्यांचा सोहोळा साजरा करण्यासाठी भारत सरकारने सुरु केलेला उपक्रम आहे.
भारतीय सांस्कृतिक नातेसंबंध मंडळ(आयसीसीआर) ही केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था असून स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या हस्ते 1950 मध्ये तिची स्थापना करण्यात आली. भारताच्या सुप्त सामर्थ्याचा परदेशात प्रसार करण्यासाठी ही नोडल संस्था आहे. स्थापनेपासून ही संस्था आपल्या देशाच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक घडामोडींना उर्वरित जगाशी जोडणारी मुख्य सरकारी संस्था म्हणून उदयाला आली आहे.
हा कार्यक्रम आयसीसीआरच्या यू ट्यूब वाहिनीवरून थेट प्रसारित करण्यात आला.
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1800822)
Visitor Counter : 231