वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-संयुक्त अरब अमिराती दरम्यान झालेल्या सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी (सीईपीए) करारामुळे दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार विस्तार 100 अब्ज डॉलर्स होणार-केंद्रीय मंत्री पीयूष गोयल


“भारतीय उद्योगांना निर्यातीचे मोठे क्षेत्र खुले”

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कराराची अंमलबजावणी करण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न

“भारताची युके, ऑस्ट्रेलिया, युरोपीय संघ, इस्त्रायल सोबत मुक्त व्यापार करारासंदर्भात चर्चा”

Posted On: 21 FEB 2022 8:12PM by PIB Mumbai

मुंबई, 21 फेब्रुवारी 2022

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याचे मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबई येथे उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींसमवेत भारत-संयुक्त अरब अमिरात यांच्यादरम्यान झालेल्या सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करारासंदर्भात (सीईपीए) संवाद साधला. उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींशी या करारासंदर्भात वैयक्तिकरित्या संवाद साधून माहिती देणे आवश्यक वाटल्याचे गोयल म्हणाले.  

    

पीयूष गोयल यावेळी बोलताना म्हणाले, केवळ 88 दिवसांच्या कालावधीत सीईपीए आकाराला आला. मंत्रालये आणि भागधारकांची 100% संमती हे या कराराचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कराराची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. आणखी पाच देशांसोबत व्यापार करार बोलणी सुरु आहे, यामुळे मध्य पूर्वेकडील देशांची बाजारपेठ उपलब्ध होईल. युएईसोबत वाढलेल्या व्यापार संधींचा केवळ युएईतील भारतीयांनाच लाभ होणार नाही तर भारतात पाठवल्या जाणाऱ्या रकमेतूनही (रिमीटन्स) लाभ होणार आहे.

कराराची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

  • दोन्ही देशांतील व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचा प्रयत्न. सध्याची सक्षम निर्यातीची स्थिती पाहता केवळ निर्यात 100 अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. 
  • सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारातून क्षेत्रनिहाय फायदे:- रत्ने आणि आभूषणे, वस्त्रोद्योग, औषध आणि वैद्यकीय उपकरणे, प्लास्टीक, अभियांत्रिकी आणि ऑटोमोबाईल्स, चर्मोद्योग आणि पादत्राणे, फर्निचर आणि लाकडी उत्पादने, अन्न प्रक्रिया उद्योग या क्षेत्रांना मोठा वाव 
  • सीईपीएमुळे भारतीयांसाठी आफ्रिकी बाजारपेठेची द्वारे खुली होणार. तसेच भारतीयांना युएईमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील. भारत-युएई शैक्षणिक क्षेत्रातही संयुक्त भागीदारी करण्यासंदर्भात लवकरच निर्णय. 
  • भारतीय स्टार्टअप्सना युएईच्या बाजारपेठेत गुंतवणूकदार मिळतील.
  • भारताकडून संयुक्त अरब अमिरातीला होणाऱ्या निर्यातीपैकी 90% उत्पादनांना मूल्याच्या दृष्टीने शून्य शुल्कावर त्वरित बाजारपेठ उपलब्ध करणार आहे. सीईपीएमुळे युएई बाजारपेठेतील निर्यातीत अंदाजे 1.3 अब्ज डॉलर्स वाढ होण्याची शक्यता आहे. भारताने 2020-21 मध्ये युएईला 418 दशलक्ष डॉलर किंमतीचे प्लास्टीक निर्यात केले. प्लास्टीक क्षेत्रातील उद्योजकांनी कराराबदद्ल मानले सरकारचे आभार.
  • भारताने संयुक्त अरब अमिरातीसोबत करार करण्याचे कारण म्हणजे तिथे कायद्याचे राज्य असून व्यवस्थेत पारदर्शकता आहे. हा करार दोन्ही देशांसाठी लाभदायक आहे. यामळे ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन मिळेल, असे गोयल म्हणाले.
  • आपले ‘आत्मनिर्भर भारत’ धोरण राबवत असताना, हा मुक्त करार म्हणजे अगदी योग्य वेळेत केलेला करार आहे. यासोबतच भारताची युके, ऑस्ट्रेलिया, युरोपीय संघ, इस्त्रायल, या देशांसोबत मुक्त व्यापारी करारासंदर्भात बोलणी सुरु असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली.
  • अपेडा (APEDA), डीपी वर्ल्ड आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अल् दाहरा यांच्यात “अन्न सुरक्षा कॉरीडॉर उपक्रमा”च्या संदर्भात सामंजस्य करार तयार करण्यात आला असून, यामुळे भारत युएईच्या अन्नसुरक्षेत मोठी भूमिका बजावू शकेल, असे गोयल यांनी सांगितले.

 

* * *

PIB Mumbai | R.Tidke/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1800129) Visitor Counter : 182


Read this release in: English